या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : गुंतवणूकदारांनी केलेल्या नफावसुलीमुळे सलग दुसऱ्या दिवशी भांडवली बाजारात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक- सेन्सेक्समध्ये ४५६.०९ अंशांची घसरण होत तो ६१,२५९.९६ पातळीवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टीमध्ये १५२.१५ अंशांची घसरण झाली. परिणामी हा निर्देशांक १८,३०० अंशांच्या महत्त्वपूर्ण पातळीच्या खाली १८,२६६.६० अंशांवर बंद झाला.

सेन्सेक्समध्ये टायटनच्या समभागाने २.९७ टक्क्यांच्या घसरणीसह निराशाजनक कामगिरी केली. त्यापाठोपाठ हिंदुस्थान युनिलिव्हर, एनटीपीसी, लार्सन अँड टुब्रो, महिंद्र अँड मंहिद्र, बजाज फिनसर्व्ह आणि पॉवर ग्रिडच्या समभागात घसरण झाली. दुसरीकडे भारती एअरटेलचा समभाग ४.०३ टक्क्यांच्या वाढीसह आघाडीवर होता. तसेच स्टेट बँक, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, अ‍ॅक्सिस बँक, आयटीसी आणि एचसीएल टेकचे समभाग चांगली कामगिरी करत स्थिरावले.

जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांच्या मते, उच्च मूल्यांकनामुळे बाजारातील सध्याची घसरण नजीकच्या काळात सुरू राहू शकते. मात्र, सरकारकडून करण्यात येणाऱ्या धोरणात्मक सुधारणांचा भविष्यात कंपन्यांना फायदा होईल. टाळेबंदीच्या शिथिलेनंतर अर्थव्यवस्था पुन्हा खुली झाली असून व्याजदर नीचांकी पातळीवर आहेत. तसेच खासगी क्षेत्राकडून खर्च वाढतो आहे. या सर्वांचा बाजारावर दीर्घकाळात सकारात्मक प्रभाव पडेल.

रुपयाची फेरउसळी

डॉलरच्या तुलनेत रुपया बुधवारी ४७ पैशांनी उंचावत ७४.८८ वर गेला.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex nifty index share market akp 94
First published on: 21-10-2021 at 00:11 IST