मुंबई : निर्देशांकात दबदबा राखणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा स्टील आणि आयसीआयसीआय बँक या आघाडीच्या समभागात घसरण झाल्याने भांडवली बाजारावर मंगळवारी पुन्हा मंदीवाल्यांनी ताबा मिळविला. बाजारात नफावसुलीसाठी विक्रीला जोर चढल्याचे दिसून आले.

दिवसअखेर सेन्सेक्स १०९.४० अंशांच्या घसरणीसह ६०,०२९.०६ वर बंद झाला. तर माहिती-तंत्रज्ञान, धातू आणि ऊर्जा कंपन्यांच्या समभागात घसरण झाल्याने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ४०.७० अंशांची घसरण झाली. हा निर्देशांक १७,८८८.९५ अंशांवर स्थिरावला.

अमेरिकी फेडरल रिझर्व्हची येत्या आठवड्यात पतधोरण आढाव्याची बैठक असल्याने गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे. यामुळे बुधवारी देखील बाजारात संमिश्र कल राहण्याची शक्यता आहे, असे मत रेलिगेअर ब्रोकिंगचे संशोधन विभागाचे उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी व्यक्त केले. 

सेन्सेक्स निर्धारित करणाऱ्या समभागात टाटा स्टीलने तीन टक्क्यांच्या घसरणीसह निराशाजनक कामगिरी केली. त्यापाठोपाठ टेक महिंद्र, एचसीएल टेक, इंडसइंड बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागात घसरण झाली. दुसरीकडे मारुती सुझुकी, एनटीपीसी, टायटन, स्टेट बँक आणि लार्सन अँड टुब्रोचे समभाग तेजीत बंद झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्षेत्रीय पातळीवर धातू, तेल आणि वायू, प्राथमिक वस्तू, ऊ र्जा, आरोग्य सेवा निर्देशांकात १.९३ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. विश्लेषकांच्या मते, धातू, तेल आणि प्राथमिक वस्तूंशी संबंधित कंपन्यांच्या समभागांमध्ये नफा वसुलीमुळे घसरण झाली. तर गृह निर्माण, सार्वजनिक क्षेत्रातील बँक आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या समभागांमध्ये झालेल्या खरेदीमुळे मात्र निर्देशांक किंचित सावरले.