scorecardresearch

सेन्सेक्सचा मूडपालट; पडझडीतून सावरून ४९७ अंशांची कमाई

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४९७ अंशांनी वधारून ५६,३१९.०१ पातळीवर स्थिरावला.

Share Market Live Updates Stock market sensex 62000 nifty 18600

मुंबई : जागतिक पातळीवरील भांडवली बाजार सोमवारच्या पडझडीतून सावरून सकारात्मक बनल्याने स्थानिक बाजारातही मंगळवारी मूड पालटल्याचे दिसून आले. दोन दिवसांच्या मोठ्या घसरणीनंतर तेजीवाल्यांनी पुन्हा समभाग खरेदीवर जोर दिल्याने मंगळवारी प्रमुख निर्देशांकांना बळ मिळाले. त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेत रुपया सावरल्याने गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४९७ अंशांनी वधारून ५६,३१९.०१ पातळीवर स्थिरावला. दिवसभरातील चढ-उतारात सेन्सेक्सने ५६,९००.७४ अंशांची उच्चांकी तर ५६,०४७.२२ अंशांची नीचांकी पातळी गाठली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १५६.६५ अशांची वाढ झाली. तो १६,७७०.८५ पातळीवर स्थिरावला.

सेन्सेक्समध्ये एचसीएल टेकचा समभाग ३.९१ टक्के वाढीसह आघाडीवर राहिला. त्यापाठोपाठ विप्रो, टाटा स्टील, टेक महिंद्र, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन आणि सन फार्माच्या समभागात तेजी होती. दुसरीकडे, पॉवर ग्रिड, अ‍ॅक्सिस बँक, बजाज फायनान्स, स्टेट बँक, महिंद्र अँड महिंद्र, कोटक बँक आणि एचडीएफसीच्या समभागात प्रत्येकी १.५० टक्क्यांपर्यंत घसरण झाली.

सेन्सेक्समध्ये आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी २३ कंपन्यांचे समभाग सकारात्मक पातळीवर स्थिरावले. क्षेत्रीय पातळीवर धातू, ग्राहकोपयोगी वस्तू, मूलभूत वस्तू, दूरसंचार, माहिती-तंत्रज्ञान निर्देशांक प्रत्येकी २.९९ टक्क्यांपर्यंत वधारले होते.

जागतिक पातळीवरील सकारात्मक संकेताच्या पार्श्वभूमीवर भांडवली बाजारांनी सोमवारच्या सत्रात झालेल्या घसरणीतून सावरण्याचा प्रयत्ना केला. मात्र ओमायक्रॉन व परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या निधीच्या निर्गमनामुळे बाजारातील चिंता कायम आहे. परिणामी गुंतवणूकदार सावध पवित्रा घेत असले तरी बाजाराबाबत आशावादी आहेत. मंगळवारच्या सत्रात माहिती-तंत्रज्ञान आणि धातू कंपन्यांच्या समभागामध्ये आलेल्या खरेदीच्या जोरामुळे निर्देशांकाला बळ मिळाले, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदविले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-12-2021 at 00:16 IST