तीन सत्रांत ‘सेन्सेक्स’ची १,४९३ अंश झेप

मुंबई : सकारात्मक बाह्य संकेतामुळे निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या इन्फोसिस, आयटीसी आणि एचडीएफसीच्या समभागात आलेल्या तेजीमुळे ‘सेन्सेक्स’ने गुरुवारच्या सत्रात ३८५ अंशांची कमाई केली. तेजीवाल्यांनी पकड घट्ट केल्याने सलग तीन सत्रांत सेन्सेक्समध्ये १,४९३ अंशांची फेरउसळी नोंदविली आहे.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३८४.७२ अंशांनी वधारून ५७,३१५.२८ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ११७.१५ अंशांची वाढ झाली आणि तो १७,०७२.६० पातळीवर दिवसअखेर स्थिरावला.

सेन्सेक्समध्ये पॉवरग्रिडचा समभाग ४ टक्के वाढीसह आघाडीवर राहिला. त्यापाठोपाठ आयटीसी, बजाज फायनान्स, इन्फोसिस, एचडीएफसी, एनटीपीसी आणि टेक महिंद्रचे समभाग तेजी दर्शवीत होते. दुसरीकडे, भारती एअरटेल, सन फार्मा, मारुती आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या समभागात गुरुवारच्या सत्रात घसरण नोंदली गेली.

रुपयालाही बळ

डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होत असून गुरुवारच्या सत्रात रुपयाचे मूल्य ३० पैशांनी वधारून ७५.२४ रुपये पातळीवर स्थिरावले. गुरुवारी नव्या व्यवहाराची सुरुवात करताना रुपया ७५.४३ या भक्कमतेसह रुजू झाला. परकी चलन व्यवहारात चलन सत्रात ७५.२२ पर्यंत उंचावले. तर सत्रात ७५.४४ पर्यंत घसरण दर्शविली. मात्र अखेरीस त्यात बुधवारच्या तुलनेत ३० पैशांची वाढ नोंदली गेली. बुधवारच्या सत्रात रुपयाचे मूल्य ५ पैशांनी वधारून ७५.५४ पातळीवर स्थिरावले होते.

जागतिक पातळीवर प्रमुख देशांच्या भांडवली बाजारातील उत्साही वातावरण देशांतर्गत भांडवली बाजारातही प्रतिबिंबित झाले. भांडवली बाजारातील गृहनिर्माण, वित्त आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर बाजारात चैतन्य कायम आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेने तिसऱ्या तिमाहीत अनुमानित अंदाजापेक्षा अधिक २.३ टक्क्यांचा वृद्धीदर गाठला. याचबरोबर करोनाच्या डेल्टा विषाणूच्या तुलनेत ओमायक्रॉनपासून धोका कमी असल्याने बाजाराला अधिक चालना मिळाली आहे.

’ विनोद नायर, संशोधनप्रमुख, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस