रिझर्व्ह बँकेच्या दर-स्थिरतेच्या धोरणाचे स्वागत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : अल्पकालीन अनिश्चितता लक्षात घेता रिझर्व्ह बँकेने व्याजदर ‘जैसे थे’ ठेवल्याचे आणि ओमायक्रॉनबाबतची चिंता कमी झाल्याचे बुधवारी भांडवली बाजारात स्वागतपर पडसाद उमटले. परिणामी सलग दुसऱ्या सत्रात तेजीचा प्रवाह कायम राखत ‘सेन्सेक्स’ १०१६ अंशांनी उसळला. 

करोनाचा नवीन उत्परिवर्तित अवतार असलेल्या ओमायक्रॉनची परिणामकारकता सौम्य असल्याने त्याचा अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची भीतीही टळली आहे. त्यातच कर्जे स्वस्त राखून, रिझर्व्ह बँकेने अर्थव्यवस्थेच्या वाढीला पूरक टाकलेल्या पावलाने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास दुणावला आहे.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १,०१६.०३ अंशांनी वधारून ५८,६४९.६८ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने २९३.०५ अंशांची कमाई केली आणि तो १७,४६९.७५ पातळीवर स्थिरावला.

रिझर्व्ह बँकेने व्याजदर ‘जैसे थे’ राखल्याने व्याजदराशी संबंधित सर्वच क्षेत्रांमध्ये वाढ दिसून आली. विशेषत: गृहनिर्माण आणि वित्त क्षेत्रासाठी सध्याचे रिझर्व्ह बँकेचे व्याजदराशी संबंधित धोरण अनुकूल असून, यामुळे मागणीपूरक वातावरणाला अधिक चालना मिळणे अपेक्षित आहे. बँकांचे गृहकर्जाचे दर सध्या वाजवी पातळीवर असल्याने परवडणाऱ्या घरांच्या मागणीमध्ये पुन्हा एकदा वाढ होण्याची आशा आहे.

सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्सचा समभाग ४ टक्क्यांच्या वाढीसह आघाडीवर होता. त्यापाठोपाठ मारुती सुझुकी, स्टेट बँक, बजाज फिनसर्व्ह, सन फार्मा आणि एशियन पेंट्सच्या समभागात तेजी होती. दुसरीकडे कोटक बँक आणि पॉवर ग्रीडच्या समभागात घसरण झाली.

वाढत्या महागाईमुळे बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. मात्र रिझर्व्ह बँक महागाई आणि वाजवी दरांमध्ये चांगला समतोल राखेल. यामुळे आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये वस्तू आणि सेवांना मोठ्या प्रमाणावर मागणी राहील. 

’ विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेस

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex nifty share market index akp 94
First published on: 09-12-2021 at 00:15 IST