जागतिक तेजी, तेलाच्या फेरउसळीने
एकाच व्यवहारातील ४७३ अंशांच्या वाढीने मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने सप्ताहअखेर गेल्या २० महिन्यांच्या तळातून डोके बाहेर काढले. तर जवळपास दीडशे अंश वाढीने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीलाही ७,४०० च्या पार सहज जाता आले.
४७३.४५ अंश वाढीसह सेन्सेक्स २४,४३५.६६ पर्यंत तर १४५.६५ अंश वाढीने निफ्टी ७,४२२.४५ वर पोहोचला. सेन्सेक्सची २०१६ मधील एकाच व्यवहारातील सर्वोच्च निर्देशांक झेप शुक्रवारी नोंदली गेली. डॉलरच्या तुलनेत २९ महिन्यांच्या खोलातून बाहेर आलेल्या रुपयाचा प्रवासही बाजारात उत्साह निर्माण करणारा ठरला.
जागतिक बाजारातील प्रमुख निर्देशांकांच्या तेजीला येथील बाजारांनी आठवडय़ाची सांगता करताना सकारात्मक प्रतिसाद दिला. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या १२ वर्षांच्या तळातून वर आलेले खनिज तेल दरही बाजारातील तेजीकरिता कारणीभूत ठरले.
सेन्सेक्स गेल्या सलग दोन व्यवहारांत मिळून ५१७.६३ अंशांनी घसरला आहे. यामुळे मुंबई निर्देशांकाने त्याचा २४ हजारांचा स्तरही गुरुवारी सोडला होता. तर निफ्टीलाही ७,३०० नजीकची पातळी अनुभवावी लागली होती. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद, वाहन, पायाभूत सेवा, तेल व वायू आदी निर्देशांक वाढले.
व्यवहारअखेर थांबलेला सेन्सेक्सचा प्रवास हा सत्रातील वरचा टप्पा होता. तर निफ्टी सत्रादरम्यान ७,४३३.३० उच्चांकापर्यंत झेपावला होता. साप्ताहिक तुलनेत मात्र सेन्सेक्स अवघ्या १९.३८ तर निफ्टी १५.३५ अंशांनी खाली आले आहेत.

तेल, रुपयात तेजी
आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाचे दर पुन्हा एकदा प्रति पिंप ३० डॉलरकडे वाटचाल करू लागले आहेत. युरोपच्या मध्यवर्ती बँकेने बिकट अर्थस्थितीचा सामना करणाऱ्या युरोझोनकरिता आर्थिक सहकार्याचे सुतोवाच केल्यानंतर खनिज तेल ३० डॉलरनजीक व्यवहार करू लागले. लंडनच्या बाजारात ब्रेंट तेलाचे पिंपामागे २९.३८ डॉलरचे व्यवहार होत होते.
तर भांडवली बाजारातील सप्ताहअखेरच्या उत्साहानंतर चलन व्यासपीठावरही तेजी दिसून आली. डॉलरच्या तुलनेत रुपया ३९ पैशांनी उंचावत ६८च्या खोलातून वर आला. गुरुवारी गेल्या २९ महिन्यांचा तळ राखणारे स्थानिक चलन शुक्रवारी ६७.६३ पर्यंत झेपावले. चलनाची आठवडय़ातील शेवटच्या सत्राची सुरुवातच ६७.८० या वरच्या टप्प्यावर झाली. दिवसभरात तो ६७.६१ पर्यंत झेपावला.

सेन्सेक्स २० महिन्यांपूर्वीच्या तळातून सप्ताहअखेर वर
* साप्ताहिक तुलनेत मात्र सेन्सेक्स अवघ्या १९.३८ तर निफ्टी १५.३५ अंशांनी खाली आले आहेत. निर्देशांकांची ही सलग तिसरी सप्ताह घसरण ठरली.
* मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकांमधील वाढही प्रमुख निर्देशांकांच्या तुलनेत अधिक, तब्बल दोन टक्क्यांपर्यंत राहिली.