निर्देशांकात सलग तिसरी वाढ
मुंबई : देशव्यापी करोना-टाळेबंदीतून अर्थचक्राची हळूहळू मुक्तता सुरू होत असून, सोमवारपासून देशांतर्गत हवाई प्रवास तसेच रेल्वे प्रवासासाठी आरक्षणही खुले करण्याच्या निर्णयाचे गुरुवारी भांडवली बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून आले. त्याची परिणती म्हणून प्रमुख निर्देशांक सलग तिसऱ्या दिवशी वाढले.
अर्थव्यवस्थेची कोंडीतून मुक्ततेची चाहूल मिळाल्याने, ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रातील कंपन्या, वाहन कंपन्या तसेच माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांना गुरुवारी मागणी राहिली. या खरेदीपूरक वातावरणामुळे सेन्सेक्स ११४.२९ अंश वाढीसह ३०,९३२.९० या पातळीवर दिवसाअखेरीस स्थिरावताना दिसला. दिवसाच्या व्यवहारात सेन्सेक्स ३०० अंशांपर्यंत उसळी घेताना दिसून आला. त्याचप्रमाणे निफ्टीही ३९.७० अंशाची कमाई करून गुरुवारचे व्यवहार आटोपले तेव्हा ९,१०६.२५ पातळी गाठताना दिसून आला.