गुंतवणूकदारांच्या ‘ब्लू आईड’ समभागांचा अखेर खरेदीहात

मुंबई : नव्या आठवडय़ाच्या सुरुवातीलाच गटांगळी खाणाऱ्या भांडवली बाजारात रिलायन्स, टीसीएस, इन्फोसिससारख्या गुंतवणूकदारांच्या ‘ब्लू आईड’ समभागांनी खरेदीहात दिल्याने सत्रअखेर दोन्ही प्रमुख निर्देशांकांना त्यांचे विक्रमी सातत्य राखता आले. सप्ताहारंभ व्यवहारातील मोठय़ा आपटीनंतर शुक्रवारच्या तुलनेत सेन्सेक्स व निफ्टी अवघ्या काही प्रमाणातील वाढीच्या जोरावरही नव्या विक्रमाची नोंद करते झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारी सकाळीच मुंबई शेअर बाजाराचे व्यवहार सुरू झाल्यानंतर ५२ हजाराचाही स्तर सोडणारा सेन्सेक्स सत्रअखेर ७६.७७ अंश वाढीने ५२,५५१.५३ वर बंद झाला. तर व्यवहारात १५,६२५ पर्यंत ठेपणारा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक व्यवहारांती १२.५० अंश वाढीसह १५,८११.८५ पर्यंत स्थिरावला. तिसऱ्या दिवशीही तेजी नोंदवताना दोन्ही निर्देशांक त्यांच्या नव्या विक्रमावर विराजमान झाले.

सेन्सेक्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज १.४६ टक्के वाढीसह प्रमुख ३० कंपन्यांमध्ये अग्रणी राहिला. तसेच टीसीएस, इन्फोसिसबरोबर बजाज फायनान्स, ओएनजीसी, पॉवरग्रिड, लार्सन अँड टुब्रो, इंडसइंड बँक यांचे समभाग मूल्य वाढले. तर सत्रअखेरच्या तेजीनंतरही कोटक महिंद्र बँक, एचडीएफसी लिमिटेड, सन फार्मा, बजाज ऑटो, एनटीपीसी, मारुती सुझुकी, एचडीएफसी बँक घसरणीच्या यादीतच राहिले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान, तेल व वायू निर्देशांक जवळपास एक टक्क्यापर्यंत वाढले. तर स्थावर मालमत्ता, उद्योग, बहुपयोगी वस्तू, भांडवली वस्तू निर्देशांक घसरले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप ०.७ टक्क्य़ापर्यंत वाढले. भांडवली बाजारात पुढील कालावधीत सोमवारी भारतात जाहीर झालेल्या महागाई दर तसेच अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या पतधोरण निर्णयाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

सत्रअखेरच्या निर्देशांक तेजीत जागतिक भांडवली बाजारातील वाढ तसेच भारतात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली घसरण या घडामोडींचा हिस्सा राहिला. डॉलरच्या तुलनेत घसरलेल्या रुपयाचे तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या खनिज तेलाच्या किमतीचे भांडवली बाजारात फारसे विपरीत पडसाद पडले नाहीत. सोमवारच्या बाजारातील अस्वस्थ हालचालींनी प्रारंभिक खुल्या भागविक्री प्रक्रियेतील कंपन्यांकडे गुंतवणूकदारांचे काहीसे दुर्लक्ष झाले.

चालू आठवडय़ात जवळपास अर्धा डझन कंपन्या या माध्यमातून १०,००० कोटी रुपये उभारणार आहेत.

अदानीने मारले, अंबानींनी तारले!

अदानी समूहातील उपकंपन्यांना अर्थसाहाय्य करणाऱ्या तीन विदेशी कंपन्यांचे निधीखाते ‘एनएसडीएल’मार्फत गोठवण्याच्या चर्चेनंतर भांडवली बाजारात सूचिबद्ध अदानी संबंधित कंपन्यांच्या समभाग मूल्यांनी सोमवारी बाजारात त्यांचा किमान स्तरमूल्य अनुभवला. एंटरप्राईजेस (-२४.९९%), अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन (-१८.७५%); अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अदानी पॉवर (प्रत्येकी जवळपास -५%) यांचे मूल्य आपटले. उलट मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स इंडस्ट्रिजचा समभाग १.४६ टक्क्य़ांनी वाढला.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex up by 76 points nifty closes at 15811 zws
First published on: 15-06-2021 at 00:25 IST