सुगंधनिर्मितीचा ९५ वर्षांचा वारसा
मुंबईच्या उपनगरात फळल्या-फुललेल्या जुन्या पिढीजात उद्योग घराण्यांपैकी असलेल्या एस एच केळकर अ‍ॅण्ड कंपनीच्या अभिजात सुवासिकांचा दरवळ भांडवली बाजारात होऊ घातला आहे. प्रारंभिक खुल्या भागविक्रीच्या माध्यमातून ५०० कोटी रुपये उभारण्याचे कंपनीने प्रस्तावित केले आहे.

देशविदेशातील तब्बल १०००हून अधिक ग्राहकोपयोगी ब्रॅण्ड्स, खाद्यपदार्थ, शीतपेय व आईस्क्रीम्स तसेच सौंदर्य प्रसाधनांना सुगंध व स्वाद कंपनीची उत्पादने प्रदान करतात. ९५ वर्षांचा वारसा लाभलेल्या या कंपनीचा भारताच्या सुगंध व स्वाद बाजारपेठेत २०.५ टक्के हिस्सा असून, तिची स्पर्धा जागतिक आघाडीच्या कंपन्यांशी आहे.

एस एच केळकर अ‍ॅण्ड कंपनीने प्रत्येकी १७३ रु. ते कमाल १८० रु. या किंमत पट्टय़ाने येत्या २८ ऑक्टोबरपासून भागविक्री प्रस्तावित केली आहे. भागविक्री ३० ऑक्टोबरला संपुष्टात येईल. भागविक्रीतून उभ्या राहणाऱ्या निधीपैकी अमेरिकास्थित गुंतवणूकदार ब्लॅकस्टोनचा कंपनीतील १० टक्के हिस्सा हा २९० कोटी रुपयांच्या मोबदल्यात सौम्य होणार आहे. ब्लॅकस्टोनने २०१२ सालात २४३ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या मोबदल्यात कंपनीत ३३.२८ भागभांडवली हिस्सा मिळविला होता, तर उर्वरित २१० कोटी रुपयांपैकी मोठा हिस्सा हा कंपनीवरील कर्जाच्या परतफेडीसाठी वापरात येणार आहे.

दादरमधून १९२०च्या सुमारास छोटेखानी स्वरूपात सुवासिकांची निर्मितीने सुरुवात करणाऱ्या कंपनीने पुढे १९५० पासून मुलुंड येथे मोठय़ा जागेत कारभार हलविला. आज कंपनीची धुरा कुटुंबातील तिसऱ्या पिढीकडे आली असून, मुंबईसह, रायगड, वापी (गुजरात) आणि नेदरलॅण्ड असे आणखी तीन उत्पादन प्रकल्प सुरू झाले आहेत, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रमेश वझे यांनी दिली. कंपनीच्या विक्री महसुलापैकी ४३ टक्के हिस्सा हा निर्यातीचा असून, विविध ४९ देशांमध्ये कंपनीची उत्पादने निर्यात होतात.
जेएम फायनान्शियल आणि कोटक महिंद्र कॅपिटल कंपनी या भागविक्रीचे व्यवस्थापन पाहात आहेत.