लघू व मध्यम उद्योगांना भांडवली बाजारात सूचिबद्धतेचे अनेक फायदे आहेत. दोन्ही राष्ट्रीय शेअर बाजारांनी स्वतंत्र ‘एसएमई एक्स्चेंजेस’ सुरू करून हे फायदे उपलब्ध केले असून, त्याबाबत अपेक्षित जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे.
सूचिबद्धतेचे फायदे
- कार्यसंचालन फायदे : भांडवल व आर्थिक संधींची नव्या स्रोतांची उपलब्धता होते. या संधी भागभांडवल वाढविण्याच्या संदर्भात आणि पर्यायाने खचाच्या संदर्भात फायदेशीर सुविधा देतात, ज्यामुळे कंपनीकडील पैशाच्या ओघात वाढ होऊ शकते. जसे सूचिबद्ध समभाग निधी वाढविण्याकरिता अप्रत्यक्ष तारण म्हणून वापरता येऊ शकतात. अनेकदा धनको संस्थांकडे सूचिबद्ध कंपन्यांचे क्रेडिट रेटिंग जास्त असते व त्यात निरंतर सुधारणा होत असते, ज्यामुळे कमी व्याजदरात अधिक कर्ज रक्कम घेता येऊ शकते.
- भागधारकांसाठी सुविधा: सूचिबद्ध कंपनीचे ग्राहक/ कर्जदाता/ सावकार यांसारख्या भागधारकांसाठी अनेक सुविधांची भर करते, ज्यामुळे ऑर्डर बुकिंगमध्ये वाढ होऊ शकते, व्यवसायामध्ये वाटाघाटीचा उत्तम काळ येऊ शकतो, जसे क्रेडिट कालावधी, मार्जिन आवश्यकता, कमी त्रासदायक कंत्राटी करार इत्यादी.
- कर लाभ : दीर्घकालीन भांडवली लाभ करापासून मुक्तता मिळते. १२ महिन्यांहून अधिक काळासाठी धारण करून ठेवलेल्या समभागांच्या व्यवहारांवर दीर्घकालीन भांडवली लाभ करा माफ करण्यात आला आहे. तसेच, अल्पकालीन भांडवली लाभांसंदर्भात लिस्टेड शेअर्सवरील कर १५ टक्के इतक्या कमी दरामध्ये देय आहे. कंपनीमधील इक्विटी गुंतवणुकीवर कोणतेच करदायित्व येत नाही. वित्त कायदा, २०१२ नुसार, जर इक्विटी शेअर्स योग्य मूल्यापेक्षा अधिक प्रीमियममध्ये जारी करण्यात आले असतील, तर कंपनी इक्विटी गुंतवणुकीवरील कराकरिता पात्र असते. अशा स्थितीत, जर शेअर्स लिस्टेड नसतील, तर कर लागू होत नाही.
- इतर फायदे : ईसॉप हे गुणवान कर्मचारी वर्ग बांधून ठेवण्याचे साधन म्हणून वापरात येते आणि कर्मचाऱ्यांसाठी मालमत्ता निर्माता म्हणूनसुद्धा ते कार्य करते. लिस्टिंगच्या लाभांमुळे कंपनीचे मूल्य अस्सल रूपात पुढे येते, ज्यामुळे अशा कंपनीचे भागधारक असणे कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.
- व्हिजिबिलिटी : चाणाक्ष गुंतवणूकदार व विश्लेषक सूचिबद्ध कंपन्यांना प्राधान्य देतात. कंपनीच्या लिस्टिंगमुळे मान्यता व दृश्यमानता प्राप्त होते.
- कॉर्पोरेट गव्हर्नन्स : एसएमई एक्स्चेंजवर लिस्टेड कंपनीला अंतर्गत नियंत्रण प्रणाली व कॉर्पोरेट गव्हर्नन्सवर लक्ष ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
एकुणात, वर्ष २०१६ मधील एसएमई भांडवल बाजाराची उल्लेखनीय कामगिरी पाहता, एसएमईंसाठी वर्ष २०१७ सालासाठी दृष्टिकोन खूपच उज्ज्वल व आशादायी आहे.
महावीर लुनावत
mahavir.lunawat @pantomathgroup.com
लेखक पेन्टोमॅथ कॅपिटल अॅडव्हायजर्सचे समूह व्यवस्थापकीय संचालक आहे.