‘लघु व्यवसाय हे दुर्बळ व्यक्तींसाठी नसतात. धाडसी, संयमी व चिकाटी असणाऱ्या आणि बिकट परिस्थितीवर मात करणाऱ्या व्यक्तींसाठी हे क्षेत्र आहे,’ असे समर्पकपणे म्हटले गेले आहे. सरलेल्या २०१६ भांडवली बाजाराच्या ‘एसएमई’ मंचावर नोंदणीकृत सूक्ष्म, लघू व मध्यम (एसएमई) कंपन्यांनाही हे जसे पूर्णपणे लागू पडते, तसेच ते या कंपन्यांबाबत संयम व आस्था दाखविणाऱ्या गुंतवणूकदारांनाही लागू पडते. लक्षणीय परताव्यांसह त्यांनी त्याचे फळही मिळविले आहे. अनेक गुंतवणूकदारांनी एसएमई समभागांमधील उच्च जोखीम पाहून दुर्लक्ष केले, त्यांनी २०१६ तील ५०० ते ८०० टक्क्यांच्या वाढीच्या शक्यतेला मुकावे लागले आहे.
एसएमई मंचाचा लाभ घेणाऱ्या कंपन्यांची संख्या आणखी खूप अधिक वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. बाजारात गुंतवणूकदारांचा सहभाग अधिक व्यापक बनला आहे. हाच प्रवाह पुढे आणखी विस्तारताना, संस्थागत गुंतवणूकदारांनीही एसएमई गुंतवणुकीमध्ये उत्सुकता दर्शवण्यास सुरुवात केली आहे आणि बाजाराला त्यांच्याकडून मोठी आशा आहे. एसएमईच्या या भांडवली जल्लोषात आणि २०१६ मधील बहारदार कामगिरीनंतर, २०१७ सालासाठी दृष्टिकोन अत्यंत उज्ज्वळ व आशावादी आहे. उभरत्या व प्रथितयश व्यवसायांना या बाजाराचा अतिरिक्तलाभ मिळाला पाहिजे. तब्बल २०हून अधिक कंपन्यांनी आपले प्रस्ताव दस्तऐवज दाखल केले असून, लवकरच त्या बाजारात सूचिबद्ध होणे अपेक्षित आहे. नोटाबंदीमुळे मंद पडलेल्या बाजारामध्ये उत्साह आणि मागणीत वाढ परतण्याची काही कंपन्या वाट पाहात आहेत. चालू वर्षांच्या दुसरी तिमाही हा एसएमई भांडवल बाजारासाठी सुवर्ण काळ निश्चितच असेल.
एसएमई भांडवल बाजारासाठी २०१६ हे अनेकांगाने उल्लेखनीय वर्ष ठरले. वर्ष २०१६ एकूण ६६ नव्या छोटेखानी कंपन्यांची या बाजारात नोंद झाली. आधीच्या २०१५ वर्षांत ४३ कंपन्या बाजारात सूचिबद्धतेसाठी भागविक्रीतून भांडवल उभारणी केली होती. शिवाय प्रस्ताव दस्तऐवज (ड्राफ्ट ऑफर) दाखल केलेल्या कंपन्यांची संख्याही २०१५ मधील ५६ वरून २०१६ मध्ये ९० पर्यंत पोहोचली. एसएमई भांडवल बाजाराचे एकूण बाजार भांडवल १५,००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. कंपन्यांची संख्या व त्या गुंतवणूकदारांना प्रदान करीत असलेल्या परताव्यांच्या संदर्भात, भारतीय एसएमई भांडवल बाजार हे जागतिक तुलनेत झपाटय़ाने विकसित होत आहे.
डिसेंबर २०१६ पर्यंत, बीएसईच्या एसएमई मंचावर १६६ कंपन्यांची नोंद झाली आहे. ज्यापकी एकूण २२ कंपन्या मुख्य बाजारात अर्थात ‘बीएसई’वर स्थलांतरित झाल्या. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘एनएसई इमर्ज’ या मंचावर ३२ कंपन्या नोंदणीकृत झाल्या आहेत. ज्यापकी एक कंपनी मुख्य बाजारामध्ये स्थलांतरित झाली आहे.
(लेखक पेन्टोमॅथ अॅडव्हायजरी सव्र्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक, असून त्यांच्याशी mahavir.lunawat@pantomathgroup.com येथे संपर्क साधता येईल.)