स्टार इंडिया या माध्यम समूहाने दक्षिण कोरियातील सीजे ओ शॉपिंग कं. लि. सह समान भागीदारीतून २००९ साली सुरू केलेले आणि देशातील अग्रणी होम शॉपिंग नेटवर्क असलेल्या ‘स्टार सीजे’मधील संपूर्ण भागीदारीतून अंग काढून घेण्याचा स्टार इंडियाने निर्णय घेतला आहे. स्टारने आपला हिस्सा प्रॉव्हिडन्स इक्विटी पार्टनर्सला विकला असल्याचे गुरुवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आले.
हा व्यवहार किती मोबदल्यात झाला हे मात्र स्टार सीजे नेटवर्क इंडिया प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी केनी शिन यांनी सांगण्यास नकार दिला. तथापि २०१४ सालच्या अखेपर्यंत कंपनीच्या भागीदारीतील हे संक्रमण पूर्ण होईल आणि तोवर कंपनीच्या नावात स्टार ही नाममुद्रा कायम राहील, असे शिन सांगितले. नव्या भागीदाराच्या प्रवेशामुळे वर्षभरात नव्या नामाभिधानासहकंपनीचे कामकाज सुरू होईल, असे नमूद करताना नव्या नावाबाबत अद्याप काही निर्णय झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. स्टार सीजेकडून सध्या दिवसाचे २४ तास चालणारी ‘स्टार सीजे अलाइव्ह’ ही टीव्ही वाहिनी त्याचप्रमाणे ऑनलाइन आणि मोबाईलच्या माध्यमातून विविध उत्पादनांची विक्री ग्राहकांनी केली जाते. जगातील दुसऱ्या क्रमांकाची होम शॉपिंग वाहिनी असलेल्या आणि नऊ देशांमध्ये विस्तार असलेल्या कोरियातील सीजे ओ शॉपिंगच्या या भारतातील उपकंपनीने केवळ साडेचार वर्षांच्या कार्यकाळात ५० लाख ग्राहक जोडले आहेत आणि लवकरच ही कंपनी नफाक्षमही बनेल, असा शिन यांनी दावा केला.
येत्या दोन-तीन वर्षांत खुल्या भागविक्रीमार्फत भांडवली बाजारात प्रवेशाचा मानसही शिन यांनी जाहीर केला. भारतात आयडिया सेल्युलर, यूएफओ मूव्हिज्, इंडस टॉवर, हॅथवे या सारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक असलेली अग्रणी प्रायव्हेट इक्विटी कंपनी प्रॉव्हिडन्सला या माध्यमातून सीजेमधील गुंतवणुकीतून निर्गमनाची संधी दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.