राज्यात विदेशी भांडवलाच्या भागीदारीने स्टेशनरी उद्योगाला वाढीस प्रचंड वाव असून, मुंबईत झालेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाअंतर्गत राज्य सरकारला ‘स्टेशनरी हब’संबंधी केलेल्या प्रस्तावाचा फेडरेशन ऑफ महाराष्ट्र स्टेशनरी मॅन्युफॅक्चर्स अॅण्ड ट्रेडर्स असोसिएशनने (एफएमएसएमटीए) पाठपुरावा करण्याचे ठरविले आहे. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या ‘स्टेशनरी वर्ल्ड २०१७’ या चार दिवसांच्या प्रदर्शन व परिषदेत हाच विषय चर्चापटलावर असेल.
स्टेशनरी हब स्थापन करण्यासाठी उपनगरांत बीकेसी ते गोरेगावदरम्यान सुयोग्य जागा देण्याची राज्य सरकारला विनंती करण्यात आली असल्याचे, फेडरेशनचे सल्लागार आणि कोकुयो कॅम्लिन लि.चे उपाध्यक्ष श्रीराम दांडेकर यांनी सांगितले. ऑटो क्लस्टरच्या धर्तीवर एकाच जागी स्टेशनरी उत्पादक, वितरक आणि विक्रेते यांचे परस्पर संवाद व सुसूत्रता साधण्यासाठी केंद्रीकरण, तसेच प्रत्येक व्यापाऱ्याच्या स्टेशनरीच्या गरजाही भागविल्या जाव्यात, अशी ही संकल्पना आहे. यातून आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवण्यास मदत होईल. तसेच औद्योगिक आणि रोजगारवाढही होऊ शकेल. अशा आवश्यक त्या पायाभूत सुविधा असलेल्या सुमारे ३०० एकर जमीन सूचित करण्याचा आपला प्रस्ताव असल्याचे दांडेकर यांनी स्पष्ट केले.
स्टेशनरी उद्योगात असंघटित उद्योगाचा वाटा मोठा असून, या क्षेत्रात निकोप स्पर्धेच्या दृष्टीने येऊ घातलेला वस्तू व सेवा कर -जीएसटी प्रणाली ही निश्चितपणे सकारात्मक पाऊल ठरेल, असा विश्वास दांडेकर यांनी व्यक्त केला. कच्च्या मालाच्या किमती वाढलेल्या असल्या, तरी असंघटित क्षेत्राच्या स्पर्धेमुळे उत्पादक आपले दर वाढवू शकत नाही. ‘जीएसटी’ आल्यामुळे या क्षेत्रात संघटित रूप येऊ शकेल, असे ते म्हणाले.
वरळीस्थित नेहरू सेंटरमध्ये १० ते १३ फेब्रुवारीदरम्यान सुरू राहणाऱ्या स्टेशनरी मेळाव्यात विविध प्रकारांतील ५,००० हून अधिक उत्पादने प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यंदा मेळाव्याच्या या पाचव्या आवृत्तीत राज्यभरातून सुमारे ७,००० उत्पादक, घाऊक विक्रेते, वितरक, व्यापारी व किरकोळ विक्रेत्यांकडून भेट दिली जाणे अपेक्षित आहे. बी २ बी धाटणीचे हे प्रदर्शन रविवारी १२ फेब्रुवारीला मात्र सर्वसाधारण लोकांसाठीही खुले असेल.