सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन (एसटीसी)ने सणोत्सवाच्या काळातील सोने खरेदीला पूरक ठरेल असा पुरवठा म्हणून सहा टन सोन्याची आयात करण्याचे ठरविले आहे.
अलीकडे रिझव्‍‌र्ह बँकेने सोने-आयातीवर आणलेल्या र्निबधांमुळे देशात सणांच्या काळात सोन्याचा पुरेसा पुरवठा नसल्याने, येत्या काळात दोन टप्प्यांत सुमारे सहा टन सोन्याची आयात करण्याला आपणास परवानगी मिळाली आहे, असे महामंडळाचे वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. विदेश व्यापार महासंचालनालयाने अलीकडेच अशी परवानगी देणारा आदेश जारी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जागतिक स्तरावर सोन्याचे भाव हे पाच आठवडय़ांच्या नीचांक स्तरावर आहेत, तर मागणीपेक्षा पुरवठय़ात तुटवडा असल्याने देशांतर्गत सोन्याच्या भावाने पुन्हा ३२ हजारांपुढे मजल मारली आहे, असे व्यस्त चित्र दिसून येते. स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशनला सोने आयातीला सरकारने मुभा दिली असली तरी या मंडळानेही यापैकी २० टक्के सोने हे आभूषणांच्या निर्यातदारांकडून वापरात येईल, याची खबरदारी घेण्याची अट ठेवण्यात आली आहे. भारतात एप्रिल ते सप्टेंबर २०१३ या सहा महिन्यांत ३९३.६८ टन सोने आयात करण्यात आली आहे.