अ‍ॅसोचॅमच्या मंचावर रिझव्‍‌र्ह बँकेकडून चिंता 

बँकांच्या वाढत्या बुडीत कर्जाचा परिणाम उद्योगांवरही होत असून दुहेरी अंकातील बुडीत कर्ज प्रमाणामुळे बँकांच्या गुंतवणुकीतून मिळणारा परतावाही नकारात्मक बनत चालला असल्याबद्दल रिझव्‍‌र्ह बँकेने शुक्रवारी येथे चिंता व्यक्त केली.

‘असोचॅम’तर्फे आयोजित परिषदेत मार्गदर्शन करताना रिझव्‍‌र्ह बँकेचे कार्यकारी संचालक सुदर्शन सेन यांनी केंद्र सरकारने गुरुवारी तयार केलेल्या बँक कायद्याचे स्वागत केले. वाढत्या बुडीत कर्जामुळे बँका तसेच उद्योगांची वाढ खुंटली असून नव्या कायद्यामुळे ती विस्तारण्यास वाव मिळेल, असा विश्वासही सेन यांनी या वेळी व्यक्त केला.

वाढत्या बुडीत कर्जामुळे उद्योग क्षेत्राला गेल्या काही वर्षांत ३,००० कोटी रुपयांचा फटका बसल्याचेही सेन म्हणाले. काही कालावधीत बँकांनी वितरित केलेल्या एकूण कर्जापैकी ढोबळ बुडीत कर्ज प्रमाण २९ तर निव्वळ बुडीत कर्ज ११ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे सेन यांनी सांगितले.

देशात नव्या बँक कायद्याची अंमलबजावणी होत असताना नव्या बिगर बँकिंग वित्त संस्थांची संख्या ६ झाल्याचे सेन म्हणाले. बँक क्षेत्रातील सुधारणा नव्या नियमांच्या आधारे होत असून यामुळे बँकांची बुडीत कर्जाची समस्या निश्चितच कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बँकांचे निर्ढावलेले कर्जबुडवे निश्चित करण्याबाबतचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असल्याचे नमूद करत सेन यांनी बुडीत कर्जाची समस्या निराकरणासाठीच्या नव्या कायद्यामुळे या क्षेत्रात अधिक सुधारणा होतील, असे स्पष्ट केले.