मुंबई : जागतिक बाजारातील कमकुवतकल आणि एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि हिंदुस्थान युनिलिव्हरसारख्या अग्रेसर समभागात नफावसुलीसाठी झालेल्या विक्रीने बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी भांडवली बाजारात घसरण झाली.

निराशाजनक सुरुवातीनंतर दिवसभर नकारात्मक व्यवहार भांडवली बाजारात बुधवारी सुरू होते. परिणामी,  दिवसातील व्यवहार सरताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक – ‘सेन्सेक्स’ ८०.६३ अंशांच्या घसरणीसह ६०,३५२.८२ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक -निफ्टीमध्ये २७.०५ अंशांची घसरण झाली. मात्र दिवसअखेर निफ्टी १८,००० अंशांची पातळी कायम राखत १८,०१७.२० पातळीवर स्थिरावला.

सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँकेचा समभाग ३ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. त्यापाठोपाठ टाटा स्टील, एचयूएल, एशियन पेंट्स, टायटन आणि स्टेट बँकेच्या समभागाने निराशाजनक कामगिरी केली. दुसरीकडे, भारती एअरटेल, महिंद्र अँड महिंद्र, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयटीसीचे समभाग तेजीसह बंद झाले.

अमेरिकेची महागाईविषयक आकडेवारी बुधवारी उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईच्या चिंतेने जागतिक बाजारात गुंतवणूकदार सावध बनले आहेत. तसेच चलनवाढीचा जोखीम चीनला असल्याची आकडेवारी म्हणजे तेथील ग्राहक किंमत निर्देशांक १.५ टक्क्यांनी वाढला, तर उत्पादक किंमत निर्देशांक १३.५ टक्क्यांनी वाढला आहे, असे बाजार स्थितीचे विश्लेषण जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी केले. जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे, त्याचे सावट स्थानिक बाजारावर पडलेले स्वाभाविकच दिसेल, असे त्यांनी सूचित केले. 

भागविक्रीसाठी ‘फार्मईझीचा’चा ‘सेबी’कडे प्रस्ताव

फार्मईझीची प्रवर्तक एपीआय होल्डिंगने भागविक्रीसाठी भांडवली बाजार नियंत्रक सेबीकडे अर्ज केला आहे. डिजिटल आरोग्यसेवा मंच असलेल्या फार्मईझीने ‘सेबी’कडे दाखल केलेल्या ‘डीआरएचपी’ प्रस्तावानुरूप कंपनीचा ६,२५० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा मानस आहे. कंपनीने १,९२९ कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड तर १,२५० कोटी रुपयांचा निधी कंपनीच्या विकासावर आणि खेळत्या भांडवलाची गरज म्हणून १,५०० कोटींच्या भांडवल भागविक्रीतून उभे करण्याचा मानस स्पष्ट केला आहे.