सेन्सेक्सची ७६५ अंशांची मुसंडी निफ्टी १७ हजारांच्या वेशीवर
मुंबई : जागतिक बाजारातील सकारात्मक प्रवाहाला अनुसरून, स्थानिक भांडवली बाजारात निर्देशांकांनी नवनवीन शिखरे सर करणारी आगेकूच कायम राखली. परिणामी मुंबई शेअर बाजाराच्या ‘सेन्सेक्स’ने सोमवारी आणखी ७६५ अंशांची मुसंडी घेतली, तर निफ्टी निर्देशांक अभूतपूर्व अशा १७,००० च्या अनोख्या टप्प्याच्या समीप पोहोचला आहे.
तेजीवाल्यांनी संपूर्ण वर्चस्व मिळविलेल्या भांडवली बाजारात, सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक – सेन्सेक्स दिवसअखेर ७६५.०४ अंशांनी वधारून ५६,८८९.७६ या सार्वकालिक अत्युच्च पातळीवर स्थिरावला. सेन्सेक्सने दिवसभरात ५६,९५८.२७ अंशांची उच्चांकी पातळी गाठली. याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २२५.८५ अंशांची वाढ झाली. तो १६,९३१.०५ पातळीवर बंद झाला. निफ्टीने दिवसाच्या व्यवहारात १६,९५१.५० अंशाच्या ऐतिहासिक उच्चांकी पातळीला स्पर्श केला. रिलायन्स, आयसीआयसीआय आणि अॅक्सिस बँकेच्या समभागांनी सेन्सेक्सला उच्चांकी पातळीवर नेण्यात मदत केली.
वित्तीय सेवा आणि धातू क्षेत्रातील सर्वाधिक वाढ दिसून आली. माहिती तंत्रज्ञान वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक वाढीसह बंद झाले.
गुंतवणूकदार मालामाल भांडवली बाजारातील तेजीमुळे मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या बाजार भांडवलात ३.६ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण बाजारभांडवल आता २४७.३४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
तेजीचा बहर कशामुळे?
’ वाहन, धातू समभागांना झळाळी
अमेरिकी विद्युत कार निर्मात्या ‘टेस्ला’ने महत्त्वपूर्ण विद्युत, यांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक सुटे घटक मिळविण्यासाठी भारतातील तीन कंपन्यांशी बोलणी सुरू केल्याच्या चर्चेचे सकारात्मक पडसाद उमटले. परिणामी वाहन उद्योग व धातू क्षेत्रातील समभागांना मोठी मागणी दिसून आली.
’ अमेरिकी ‘फेड’चा आश्वासक पवित्रा
अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्र्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी अर्थव्यवस्थेत दमदार सुधाराबाबत सकारात्मक दर्शवितानाच, अर्थ-प्रोत्साहनपर रोखे खरेदी इतक्या लवकर गुंडाळली जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत हे जगातील सर्वच प्रमुख भांडवली बाजारांसाठी तेजीपूरक ठरले.
’ रुपयाला मजबुती
सोमवारच्या सत्रात रुपयाचे मूल्य अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ४० पैशांनी वधारले. रुपया ७३.२९ रुपये प्रति डॉलर पातळीवर स्थिरावला. अमेरिकी ‘फेड’च्या ‘आस्ते कदम’ भूमिकेनंतर रुपयाला बळ मिळाले. भांडवली बाजारातील खरेदीचा बहर आणि अन्य परदेशी चलनांच्या तुलनेत कमकुवत झालेल्या डॉलरमुळे रुपयाचे मूल्य वधारले. सलग तिसऱ्या सत्रात मजबुतीमुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ९५ पैशांनी वाढले आहे.