मुंबई : रशिया-युक्रेनमधील वाढलेल्या तणावामुळे जगभरातील भांडवली बाजारात मंगळवारी मोठी घसरण झाली आहे. याच प्रतिकूल प्रभावाखाली देशांतर्गत भांडवली बाजाराने सलग पाचव्या सत्रात घसरण नोंदवली. युद्धाच्या वाढत्या शक्यतेने गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिल्याने सकाळच्या सत्रात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये १,३०० अंशांची मोठी घसरण दिसून आली होती.
युद्धाच्या शक्यतेने धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी मंगळवारी व्यवहाराला सुरुवात होताच गुंतवणूकदारांनी चौफेर समभाग विक्रीचा सपाटा लावला. परिणामी सकाळच्या सत्रात सेन्सेक्स १,१०० अंशांनी खाली येत ५६,३९४.८५ अंशांचा दिवसभरातील तळ गाठला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३८२.९१ अंशांच्या घसरणीसह ५७,३००.६८ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ११४.४५ अंशांची घसरण झाली आणि तो १७,०९२.२० अंशांवर स्थिरावला.
सेन्सेक्समध्ये टाटा स्टील, टीसीएस आणि स्टेट बँक यांच्या समभागात प्रत्येकी ३.६४ टक्क्यांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी २० कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनमधील दोन तुटलेल्या प्रदेशांमध्ये सैन्य पाठवण्याचे आदेश दिल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम सोने आणि खनिज तेलाच्या किमतींवर झाला आहे.
पूर्व युक्रेनमधील दोन प्रदेशांना औपचारिकपणे मान्यता दिल्यानंतर अमेरिका आणि त्याची युरोपीय मित्र राष्ट्र रशियाविरुद्ध नवीन निर्बंध लादण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर आणखी भडकण्याची शक्यता असून तेलाच्या किमतीने ९७ डॉलर प्रतिपिंप असा चिंताजनक स्तर गाठला आहे. यामुळे रिझर्व्ह बँकेला देखील वाढत्या महागाईला नियंत्रणात ठेवण्यासाठी व्याजदर वाढ करावी लागू शकते, असे मत जिओजित फायनान्शियल सव्र्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार व्ही. के. विजयकुमार यांनी सांगितले.
रुपयात घसरण
डॉलरच्या तुलनेत रुपयाने मंगळवारच्या व्यवहारात ३१ पैशांची घसरण नोंदविली. डॉलरसमोर मोठ्या फरकाने कमकुवत होत स्थानिक चलन आठवड्याच्या दुसऱ्या सत्रात ७४.८६ वर स्थिरावले. देशांतर्गत भांडवली बाजारात झालेली घसरण, परदेशी निधीचे अव्याहतपणे सुरू असलेले निर्गमन आणि रशिया-युक्रेनमधील वाढत्या भूराजकीय तणावामुळे खनिज तेलाचे दर वाढल्याने त्याचा रुपयावर प्रतिकूल परिणाम झाला. सोमवारी ७४.५५ वर बंद झालेल्या रुपयाने दुसऱ्या सत्राची सुरुवातही ७४.७१ या नरमाईनेच केली. तर व्यवहारादरम्यान रुपयाने ७४.९९ हा तळ गाठला.