मुंबई : देशातील ऊर्जा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून त्यावर आपला ठसा उमटवल्याबद्दल देशाचे माजी ऊर्जामंत्री सुरेश प्रभू आणि देशाचे माजी ऊर्जा सचिव आर. व्ही. शाही यांचा गौरव ‘पॉवरलाइन’ या नियतकालिकाने शुक्रवारी के ला.
ऊर्जा क्षेत्रातील घडामोडींना वाहिलेल्या ‘पॉवरलाइन’ने मागील २५ वर्षांच्या ऊर्जाशील प्रमुख घडामोडी आणि या क्षेत्रावर ठसा उमटवणारे कोण याबाबत देशभरातील या क्षेत्राशी संलग्न १०० तज्ज्ञांची मते मागवली. या १०० जणांमध्ये वीजनिर्मिती, वीज पारेषण, वीजवितरण, नियामक क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश होता. माजी ऊर्जामंत्री सुरेश प्रभू आणि आर. व्ही. शाही हे दोघे ३४ टक्के मते मिळवून पहिल्या क्रमांकावर राहिले.
केंद्रीय विद्युत कायदा २००३ तयार करून तो देशात लागू करत ऊर्जा क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्यात प्रभू यांनी दिलेले योगदान हे उल्लेखनीय होते असे सर्वेक्षणात तज्ज्ञांनी म्हटले आहे. गेल्या २५ वर्षांतील ऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठे यश कोणते या प्रश्नावर केंद्रीय वीज कायदा २००३ ची अंमलबजावणी असे उत्तर बहुसंख्य तज्ज्ञांनी दिले. त्याचबरोबर अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राचा विकास, नियामक प्रणालीत सुधारणा, खासगी क्षेत्राचा वीज व्यवसायात वाढलेला सहभाग हे तीन गेल्या २५ वर्षांतील महत्त्वाचे तीन बदल होते, असे मत सर्वेक्षणात सहभागी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.