लायटिंग व स्टील पाइप निर्मितीमध्ये आघाडीवर असलेल्या सूर्या ग्रुपने ५० नवीन एलईडी वीज उपकरणे उत्पादने दाखल करण्याची योजना आखली आहे. सुमारे चार हजार कोटी रुपयांच्या हा समूह पारंपरिक बल्ब, टय़ूब आणि सीएफएलच्या निर्मितीमध्ये आघाडीवर आहे.
सूर्याने एलईडी लॅम्प, बॅटन, डाऊन लायटर्स आणि डेकोरेटिव्ह ल्युमिनरीज यांच्यासाठी एलईडी उत्पादनांची एक विस्तृत श्रेणी यापूर्वीच दाखल केली आहे. तसेच आऊटडोअर आणि इंडस्ट्रियल उपयोगांसाठी एलईडी स्ट्रीट लाइट, बाह्य़ सजावट वीजउपकरणे, हाय-बे ल्युमिनरीज यांसाठीही वीज उपकरणे दाखल केली गेली आहेत.
सूर्या रोशनी एलईडी उत्पादनांसाठी कंपनीने नोएडा येथे संशोधन आणि विकास प्रयोगशाळा उभारली आहे. कंपनीचा एलईडी लॅम्प आणि ल्युमिनरीजमध्ये स्वत:चा लायटिंग ब्रॅन्ड असून ही उत्पादने काशीपूर आणि ग्वाल्हेर येथील प्रकल्पामधून उत्पादित केली जातात. कंपनीने ५० हूनही अधिक एलईडी उत्पादने बाजारपेठेत आणली असून पुढील ३ ते ४ महिन्यांमध्ये आणखी ५० नवीन उत्पादने दाखल केली जाणार आहे.
नव्या विस्तार योजनांबाबत सूर्या रोशनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. राजू म्हणाले, एलईडी हे पारंपरिक वीजउपकरण पर्यायांपेक्षा सर्वसाधारणपणे काहीसे महाग असतात. मात्र दीर्घकालीन वापराचा विचार करता ते अत्यंत किफायतशीर ठरतात. ऊर्जा आणि हरित उपकरणांच्या माध्यमातून आर्थिक बचत होते. सूर्या रोशनी देशभरातील आपल्या १५०० विक्रेते व दोन लाखांहून अधिक किरकोळ विक्रेत्यांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत आपली उत्पादने पोहोचवते.