महिन्यातून चार दिवस टीव्ही पाहायचा आणि महिनाभराचे पैसे भरा या त्रासातून आता टाटा स्काय ग्राहकांची सुटका होणार आहे. ज्या दिवशी टीव्ही पाहायचा आहे त्या दिवशी रिचार्ज करा अशी सुविधा सुरू करण्यात आली आहे. हे रिचार्ज किमान आठ रुपयांचे असून ते कमाल १०० रुपयांपर्यंतचे आहे.
मोबाइलमध्ये ज्याप्रमाणे छोटा रिचार्ज आले आणि ग्राहकांबरोबरच कंपन्यांनाही त्याचा फायदा झाला. याच आधारावर टाटा स्कायने ही सेवा सुरू केली आहे. म्हणजे तुम्ही ज्या दिवशी टीव्ही बघणार नाही त्या दिवसाचे पैसे भरावयाची गरज भासणार नाही. शिवाय तुम्ही घेतलेल्या पॅकमधील सर्व वाहिन्याही पाहता येणार आहेत. डेली रिचार्जसाठी ८, १०, २०, ५० आणि १०० रुपयांचे कुपन्स उपलब्ध आहेत. ही सुविधा पुरविणारी ही एकमेव डीटीएच कंपनी असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकिय संचालक हरित नागपाल यांनी स्पष्ट केले. या योजनेमुळे ग्राहक संख्या वाढविण्यास मदत होईल अशी कंपनीला अपेक्षा असल्याचे मुख्य संपर्क अधिकारी मलाय दीक्षित यांनी स्पष्ट केले. या संदर्भातील जाहिराती आयपीएलमध्ये दाखविण्यास सुरू होणार असून त्या एखाद्या मालिकेप्रमाणे चित्रित करण्यात आल्याचेही दीक्षित यांनी स्पष्ट केले.