मोबाइल, टॅबलेट, लॅपटॉपमुळे आता टीव्हीची गंमत कमी होताना दिसत आहे. हाताच्या तळव्यावर एचडी तंत्रज्ञान उपलब्ध असताना टीव्ही कशासाठी पाहायचा, या प्रश्नावर टाटा स्कायने उत्तर शोधून काढले आहे. नुकतीच टाटा स्कायने आपल्या यूएचडी ४के सेटटॉप बॉक्सचे अनावरण २०१५ च्या सुरुवातीला करण्याची घोषणा केली.
या घोषणेप्रसंगी सोनी सिक्स एचडी टीव्हीवर ४के सेट टॉप बॉक्सचे यूएचडी ४के तंत्रज्ञानासह प्रथमच लाइव्ह प्रदर्शन करण्यात आले. भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असणाऱ्या स्मार्ट आणि एलईडी टीव्हीवर या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दृश्य पाहण्याचा अनुभव सुखकारक असेल असा कंपनीचा दावा आहे. तसेच या तंत्रज्ञानामुळे तरुण वर्ग त्यांचे आवडते कार्यक्रम पाहण्यासाठी पुन्हा एकदा टीव्हीकडे वळेल असा कंपनीला विश्वास आहे.
सध्याच्या एचडी दर्जाच्या तुलनेत ८.३ मेगापिक्सलवर यूएचडी ४ के (३८४० ७ २१६०) मध्ये सर्वसाधारणपणे २केच्या तुलनेत (१९२० ७ १०८०) चारपट पिक्सेलेशन आहे. त्यामुळे टीव्हीवरील चित्र अधिक स्पष्ट आणि विविध रंग त्यांच्या मूळ रूपात अतिशय ठाशीवपणे दिसण्यास मदत होणार आहे. भारतातील प्रमुख शहरांमध्ये सामान्यांना परवडेल, अशा किमतीमध्ये यूएचडी ४के सेट टॉप बॉक्स उपलब्ध असेल असेही कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.
नव्या पिढीला जुने आणि अद्ययावत तंत्रज्ञान यामधील फरक ताबडतोब लक्षात येतो आणि जे सर्वोत्तम ते आपले, असा त्यांचा दृष्टिकोन आहे. त्यामुळेकेवळ जागतिक प्रवाहांचा अवलंब करणे पुरेसे नसते तर त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असं टाटा स्कायचे मुख्य व्यावसायिक अधिकारी विक्रम मेहरा ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले. यूएचडी ४के हे भारतीय प्रेक्षकांचे भवितव्य आहे आणि सोनी सिक्ससोबत हे दृश्य भारतात प्रथमच आणताना आम्हाला आनंद होत असल्याचीही भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली.
विशेष म्हणजे ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्डकपच्या फ्रान्स आणि जर्मनी यांच्यामधील उपांत्यपूर्व फेरीचा सामना या वेळी यूएचडी ४के तंत्रज्ञानासह लाइव्ह दाखविण्यात आला.
टाटा स्कायने यापूर्वी एच डी पीव्हीआर (पर्सनल व्हिडीओ रेकॉर्डर), व्हिओडी (व्हिडीओ ऑन डिमांड) सेवा, आगळ्यावेगळ्या संवादात्मक सेवा, कराओके सेवा बाजारात आणल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata sky to launch 4k dth set top boxes at start of
First published on: 08-07-2014 at 03:02 IST