मूळ स्रोतांसमयीच कर वसुली (टीसीएस) हे खरेदी-विक्रीच्या संपूर्ण व्यवहार रकमेवर नव्हे तर एकूण व्यवहारातील फक्त रोखीतील घटकांवर लागू होईल, असे स्पष्टीकरण करणारे सुधारीत परिपत्रक केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने सोमवारी काढले. या करवसुलीबाबत असंतोष असणाऱ्या सोने-चांदी सारख्या मौल्यवान धातूंचे व्यवहार करणाऱ्या सराफ समुदायाला या स्पष्टीकरणाने बराच दिलासा मिळणार आहे.
विशिष्ट सेवा आणि वस्तूंच्या खरेदीसाठी दोन लाख रुपयांच्या आत रोखीतील व्यवहार झाले असल्यास, मूळ स्रोतांसमयीच कर वसुली (टीसीएस) लागू होईल, अशी यंदाच्या अर्थसंकल्पातून या कराची व्याप्ती विस्तारण्यात आली. कलम २०६ सी (१डी) प्रमाणे, दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रोखीतील खरेदीवर एक टक्का ‘टीसीएस’ची वसुली सुरू झाली. परंतु, दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचा व्यवहार असेल तरी ही करवसुली करता येणार नाही, असे स्पष्टीकरण करणारे सुधारीत परिपत्रक स्पष्ट करते. विशिष्ट खरेदी व्यवहार दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असेल आणि तो अंशत: रोख व अंशत: धनादेशाद्वारे झाला असेल तर, ‘टीसीएस’ वसूल करता येणार नाही, असे सुधारीत परिपत्रक स्पष्ट करते. उदाहरणादाखल स्पष्टीकरण देताना, पाच लाख रुपयांचा विक्री व्यवहार असेल, त्यापैकी चार लाख रुपये धनादेशाद्वारे तर एक लाख रुपये रोख स्वरूपात अदा केले जाणार असेल, तर टीसीएस वसुली करता येणार नाही.