भारतातील रोजगार बाजारपेठेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आमुलाग्र बदल घडवून आणणारी योजना महिंद्रा समुहाने सादर केली असून याद्वारे वर्षभरात महाराष्ट्रात एक लाख रोजगार उपलब्ध केले जाणार आहेत.
महिंद्राच्या टेक महिंद्रा या माहिती तंत्रज्ञान कंपनीने ‘सरल रोजगार’ हे मोबाईलद्वारे रोजगार उपलब्ध करून देणारे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यामुळे मोबाईलद्वारे देशात कुठेही सवलतीच्या दरात रोजगार शोधणे सुलभ होईल. या सेवेमुळे भारतातील रोजगार आणि उमेदवार यांचा परस्परसंपर्क मोबाईलच्या माध्यमातून होईल. कंपनीने ‘सरल रोजगार’ हे कार्ड महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण शहरातील एक हजारांहून अधिक रिचार्ज आणि किराणा दालनांमध्ये उपलब्ध करून दिले आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, जालना आणि नागपूर येथे १५,००० हून अधिक नोकरीसाठी रिक्त जागा असून विक्री प्रतिनिधी, लेखापाल, सुरक्षा रक्षक आदी नोकऱ्यांचा यात समावेश आहे, असेही निरिक्षण कंपनीने यानिमित्ताने नोंदविले आहे. या सेवेसाठी बेरोजगारांनी ५० रुपयांचे ‘सरल रोजगार कार्ड’ खरेदी करून तसेच आपल्या आवडीच्या भाषेत १८६० १८० ११०० या क्रमांकावर फोन करून सेवा मिळवता येईल. कंपनी रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांना त्यांचा पहिला स्व-परिचय तयार करून देईल.
टेक मिहद्राच्या मोबाईल व्यवसाय प्रमुख मोबिलिटी बिझनेस प्रमुख जगदीश मित्रा यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांत आम्ही भारतातील ८०० हून अधिक ठिकाणी २ कोटींहून अधिक ग्राहक नोंदवले आहे. सध्या ३७ कोटींहून अधिक अकुशल आणि अर्धकुशल कामगार आहेत. सरल रोजगारअंतर्गत १०० हून अधिक प्रकारचे १.२५ लाख रोजगार खुले आहेत, असेही ते म्हणाले.

भारतातील १५ ते २९ या वयोगटातील पदवीधर बेरोजगारांचे प्रमाण ३३ टक्के आहे. दरवर्षी रोजगार करणाऱ्या १.२० कोटी भारतीयांपकी केवळ ७ टक्के रोजगार करणारी व्यक्ती ही संघटित क्षेत्राशी निगडीत आहे. तर उर्वरित मोठा वर्ग हा सामाजिक सुरक्षा लाभांपासून वंचित आहेत. भारतातील रोजगाराच्या शोधात असणाऱ्या १० जणांपकी एक व्यक्ती ही कमी आवडीच्या कौशल्याचे प्रशिक्षण घेतो. पुढील दोन दशकांमध्ये भारत एकूण काम करणाऱ्या लोकांमध्ये २५ टक्क्यांनी भर घालेल.