मुंबई : जगातील निरनिराळे देश पाहण्याची आवड असलेल्या भारतीय पर्यटकांना व्हिएतनामला जाणे-येणे सोपे व्हावे यासाठी भारतातील दिल्ली मुंबईसारख्या महानगरांबरोबरच अहमदाबाद, बंगळूरुसारख्या शहरांमधूनही थेट विमानसेवा सुरू झाली आहे. माफक दरात विमान सेवा देणाऱ्या ‘व्हिएटजेट’ने त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

करोना टाळेबंदी संपुष्टात आल्यावर जागतिक पर्यटन हळूहळू पुन्हा पूर्ववत होत आहे. अशावेळी आंतरराष्ट्रीय पर्यटन करणाऱ्या भारतीयांनी माफक पैशांत नवीन देश पाहण्यासाठी व्हिएतनामला पसंती द्यावी यासाठी त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न तेथील पर्यटन विभाग आणि विमानसेवा कंपन्या करत आहेत. आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी सर्वात महत्त्वपूर्ण थेट विमानसेवा हा त्या प्रयत्नांचाच भाग असून, भारतातून व्हिएतनाममधील प्रमुख शहरांत थेट उड्डाणे वाढवण्यात आली आहेत.

हेही वाचा >>> “आधी खिसा कापणारे मग किराणा वाटणारे महाठग आणि…” बच्चू कडूंची राणा दाम्पत्यावर बोचरी टीका!

आतापर्यंत प्रामुख्याने मुंबई, दिल्लीसारख्या प्रमुख महानगरांमधून व्हिएतनामला थेट विमान सेवा होती. ‘व्हिएटजेट’ने गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांच्या राजधानीच्या शहरांचा समावेश केला आहे. 

‘व्हिएटजेट’च्या माध्यमातून आता दिल्ली, मुंबई, बंगळूरु, हैदराबाद आणि अहमदाबाद अशा भारतातील पाच शहरांमधून व्हिएतनामसाठी विमानसेवा सुरू झाली आहे. राजधानी हनोई, दा नांग, हो चि मिन्ह सिटी आणि फु क्यॉक या व्हिएतनाममधील चार शहरांमध्ये ही थेट विमानसेवा आहे. त्या माध्यमातून उत्तर, मध्य व दक्षिण हे व्हिएतनामचे तिन्ही भाग भारताशी थेट जोडले गेले आहेत.