गुंतवणूकदारांची रक्कम अदा करू न शकलेल्या ‘एनएसईएल’ या बाजारमंचाशी संबंधित ३२ ब्रोकरेज संस्था आता अधिक व्यवहार शुल्क आकारणीच्या मुद्दय़ावरून नियामकांच्या नजरेच्या टप्प्यात आल्या आहेत. या संस्थांनी त्यांच्या ग्राहकांना सेवा देताना पोर्टफोलिओ व्यवस्थापन तसेच मार्जिन निधी सेवा पुरविताना नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
गुंतवणूकदारांची देणी थकविल्या प्रकरणातील ‘नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड’ (एनएसईएल) हा बाजारमंच गेल्या तीन महिन्यांपासून ठप्प आहे. त्याच्याशी संबंधित या ३० ब्रोकर संस्थांनी बाजारमंचाच्या गोदामांमध्ये प्रत्यक्षात वस्तू आहेत किंवा नाही हे न तपासताच गुंतवणूकदारांना अंधारात ठेवत ग्राहकांना व्यवहार करायला भाग पाडले, असा ठपका ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणात भांडवली बाजार नियामक सेबी तसचे वायदा बाजार आयोग हे या ब्रोकरची नेमकी भूमिका जाणून घेत आहेत. एकूण ३२ पैकी १४ ब्रोकर संस्था या गुजरातमधील तर ७ या राजस्थानमधील आहेत. अन्य ११ संस्था या महाराष्ट्र, दिल्ली, आंध्र प्रदेश आणि पंजाबमधील मिळून आहेत. त्या ग्राहकांकडून प्रति लाख रुपयांच्या व्यवहारामागे २५ रुपये आकारत.
दरम्यान बाजारमंचाचा देणी हप्ता सलग १६ व्या सप्ताहात अपुरा राहिला आहे. मंगळवारी १७४.७२ कोटी द्यावयाचे असताना कंपनीने केवळ ९ कोटी रुपयेच अदा केले. १३,००० गुंतवणूकदारांची ५,६०० कोटी रुपयांची देणी शिल्लक असताना आतापर्यंत २४४ कोटी रुपये परत करण्यातच एनएसईएलला यश आले आहे.