डिमॅटची कार्यशाळा घेण्यासाठी एका बँकेच्या प्रशिक्षण केंद्राला गेलो होतो. बहुतेक कर्मचारी मध्यमवयीन होते. पण त्यांच्या चेहऱ्यावर एक अनामिक भीती आणि दडपण जाणवत होते. एखाद्या दशग्रंथी पुरोहिताला जबरदस्तीने ताडी प्यायला सांगितले तर त्याच्या चेहऱ्यावर कशी चिंतेची छटा दिसेल तसेच सर्वाचे चेहरे होते. दुपापर्यंत सर्वाचे चेहरे मख्ख! जेवणाची सुटी झाली आणि अनौपचारिक त्यांच्याशी गप्पा मारताना याचे इंगित कळले. ते तर थक्क करणारे होते.
एका सर व्यवस्थापकाने त्यांना सांगितले होते की ‘डिमॅटचे काम करताना खूप काळजी आणि जबाबदारी असते तेव्हा सावध राहा. खातेदाराने दिलेली Delivery instruction slip  (सूचना पत्र ) जर fail’ गेले, खात्यात तितके शेअर्स नसल्याने डेबिट होऊ  शकले नाही तर ती तुमची जबाबदारी असते व होणाऱ्या संभाव्य नुकसानीला तुम्ही जबाबदार असता!’
काय अगाध ज्ञान आहे पाहा. मी त्या कर्मचाऱ्यांना म्हटले की जेव्हा तुमचा कुणी खातेदार कुणाला तरी धनादेश देतो, जो त्याच्या खात्यात डेबिट होण्यासाठी तुमच्याकडे येतो; समजा त्या ग्राहकाच्या खात्यात पुरेसे पसे नसतील तर तुम्ही तो धनादेशपरत पाठविता. म्हणजेच return  करता. यात जबाबदारी कुणाची? अर्थात संबंधित खातेदाराचे कारण पुरेसे पसे (शिल्लक) बचत खात्यात किंवा चालू खात्यात ठेवणे ही त्याची जबाबदारी असते. तसेच डिमॅटबाबतदेखील आहे.
मी माझ्या डिमॅट खात्याची Delivery instruction slip  (सूचना पत्र) तुम्हाला दिली आणि जर का माझ्या डिमॅट खात्यात तितके शेअर्स नसतील तर ती स्लिप return होईल. यात तुमची जबाबदारी कशी काय? ती माझी जबाबदारी आहे. हे ऐकून ती सर्व मंडळी हायसे वाटून शांत झाली. ‘इतके दिवस आम्ही उगाच काळजीत होतो त्यामुळे नको ते डिमॅटचे काम अशीच आमची धारणा होती. आता बोला.
एक चुकीचे विधान केल्याने किती दूरगामी परिणाम होतात. पुरेशी माहिती नसताना त्या सर व्यवस्थापकाने असे चुकीचे विधान का बरे करावे? बरे त्या कर्मचाऱ्यांना मनमोकळेपणाने मी बोलते केले म्हणून. अन्यथा आयुष्यात त्यांनी डिमॅटच्या खात्याला हातही लावला नसता. रामदास स्वामी म्हणतात की ‘जो तो बुद्धीच सांगतो’. अर्थात उंबराला अगदी दुर्मिळपणे फूल येते तसे या बँक अधिकाऱ्यांच्या मांदियाळीत काही अधिकारी असे भेटतात की वाटते यांच्यासारखे सर्व असतील काय होईल!
नुकतेच बँक ऑफ इंडियाच्या कोरेगाव प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य आनंद श्रीमाळी भेटले. खरे पाहता बँकेने त्यांच्याकडे पाठवलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे हे श्रीमाळी यांचे काम. पण चाकोरीबाहेर जाऊन त्यांनी एक अफलातून कल्पना माझ्यासमोर मांडली.
ते म्हणाले की आमच्या प्रशिक्षण केंद्रात ८०-९० व्यक्ती बसू शकतील, असे वातानुकूलित सभागृह आहे. तिथे आपण तुमचा ‘श..शेअर बाजाराचा’ हा व्याख्यानपर कार्यक्रम ठेवला तर कसे होईल? उत्तम कल्पना आहे, मी म्हणालो. म्हणजे सभागृहाचे भाडे वगरे प्रश्नच निकालात निघाले. राहता राहिला प्रसिद्धीचा प्रश्न. स्थानिक वृत्तपत्रातून बातमी दिल्यास नेहमी प्रमाणेच वृत्तपत्रे नक्कीच सहकार्य करतील. शिवाय कोरेगाव आणि आसपासच्या पाच किलोमीटर परिसरात बँकेच्या सहा – सात शाखा आहेत. तिथे आपण फलक लावू आणि ग्राहकाना व्यक्तिश: कर्मचाऱ्यांमार्फत निमंत्रणे देऊ. आणखी काय पाहिजे? असा पुढाकार घेणारी माणसे असतील तर आणखी काय हवे? या प्रकारे विनामूल्य व्याख्यान आयोजित केले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि याचप्रकारे बँकेच्या इतर विभागातूनही अशी व्याख्याने आयोजित करता येतील, असा विश्वास निर्माण झाला. इतरही बँकांनी याचे अनुकरण केले तर हा वटवृक्ष वाढायला कितीसा वेळ लागेल! आज विविध बँकामधून अंदाजे ३६ कोटी बचतखातेदारांची संख्या आहे. त्यातील १० कोटी लोकांची जरी डिमॅट खाती उघडून घेतली तरी पुरेसे आहे. अनेक ग्राहक तर Diamond customers म्हणून ओळखले जातात ज्यांचेकडून बँक डिमॅट खात्यासाठी वार्षकि आकारदेखील घेत नाहीत. इच्छा असली की मार्ग दिसतो हे श्रीमाळी यानी दाखवून दिले आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात गुहागर येथे स्थानिक खरे ढेरे महाविद्यालयाने देखील आíथक साक्षरता व्याख्यान केवळ विद्यार्थीच नव्हे तर सर्व जनतेसाठी आयोजित केले आहे. ग्रामीण भागातील अशा प्रकारचे उपक्रम नक्कीच उत्साहवर्धक आहेत. मी केवळ टीका करतो असे नाही तर जिथे काही चांगले आढळते त्याचाही आवर्जून उल्लेख करतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why not demat account user increasing
First published on: 26-07-2013 at 01:04 IST