करविषयक सर्व वादाची प्रकरणे ही न्याय्य पद्धतीने हाताळली जातील अशी ग्वाही देतानाच कर प्रशासनांतील अनिष्ट घटकांना कठोरपणे हाताळून देशातील गुंतवणुकीचे वातावरण गढूळ करण्याच्या प्रयत्नांना हाणून पाडले जाईल, असे केंद्रीय अर्थ मंत्रालयात महसूल सचिव म्हणून मंगळवारी कार्यभार हाती घेताना हसमुख अधिया यांनी स्पष्ट केले.
अलीकडे करांच्या वसुलीच्या अनेक वादग्रस्त प्रकरणांतून देशात ‘कर दहशतवाद’ माजल्याची भावना गुंतवणूकदार वर्गात निर्माण झाली आहे. ही भावना संपुष्टात आणली जाईल, उलट कर प्रशासनांत माजलेल्या कुप्रवृत्तींचा बंदोबस्त करून कारभारात सुधार आणला जाईल, असे अधिया यांनी स्पष्ट केले.
कर दहशतवाद असा काही प्रकार अस्तित्वात नसल्याचे नमूद करीत ते म्हणाले, ‘प्रशासनाच्या प्रत्येक विभागातच काही चांगले आणि वाईट घटक असतात. कर प्रशासनातही ते जरूर आहेत. या अनिष्ट मंडळींपायी कर विभागाच्या नावाला बट्टा लागला असून, त्यांचा वेळीच बंदोबस्त केला जाईल. जेणेकरून त्यांचा आणखी उपद्रव होणार नाही. करविषयक विवादाच्या प्रत्येक प्रकरणाची न्याय्य पद्धतीने तड लागेल हे आपल्याकडून पाहिले जाईल.’ पत्रकारांशी बोलताना त्यांनी, आधुनिक तंत्रज्ञान साधनांचा अवलंब करून कर विभागाच्या कारभारात पारदर्शकता आणणे आणि नियम व प्रक्रियेत अधिकाधिक सुलभता आणण्याला आपला अग्रक्रम राहील, असेही सांगितले.
केंद्रातील तसेच राज्यांच्या सरकारची वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणालीच्या दृष्टीने सुसज्जता करण्याकडेही आपले लक्ष राहील, असे अधिया यांनी सांगितले. केंद्र सरकारने १ एप्रिल २०१६ पासून जीएसटीच्या अंमलबजावणीचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. पण त्यापूर्वी जीएसटी संबंधाने घटना दुरुस्ती विधेयक संसदेकडून पारित केले जाईल. कर प्रशासनाची त्याआधीच पूर्ण तयारीनिशी सज्जता झाली पाहिजे, हे आपण पाहात असल्याचे त्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Sep 2015 रोजी प्रकाशित
‘कर-दहशतवाद’ नव्हे, कर प्रशासनातील ‘कुप्रवृत्तीं’ना पायबंद!
करविषयक सर्व वादाची प्रकरणे ही न्याय्य पद्धतीने हाताळली जातील अशी ग्वाही देतानाच कर प्रशासनांतील अनिष्ट घटकांना कठोरपणे हाताळून देशातील गुंतवणुकीचे वातावरण गढूळ करण्याच्या प्रयत्नांना हाणून पाडले जाईल,

First published on: 02-09-2015 at 01:56 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will use it to bring transparency in tax department says revenue secretary hasmukh adhia