दोन कामगारांना निलंबित केल्याच्या कारणास्तव महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रच्या इगतपुरी प्रकल्पात कामगारांनी सुरू केलेले काम बंद आंदोलन सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारीही सुरू राहिले. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गुरूवारी कामगार संघटना व व्यवस्थापन यांच्यात बैठक होणार आहे.
इगतपुरी शहरातील महिंद्रच्या प्रकल्पात सोमवारी कामगार सेनेचे अध्यक्ष सुनील यादव व मदन जाधव यांच्यात काही कारणावरून हाणामारी झाली होती. त्याची गांभीर्याने दखल घेत व्यवस्थापनाने दोघांना निलंबित करण्याची कारवाई केली. या निर्णयामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी त्यांच्यावरील कारवाई मागे घ्यावी म्हणून काम बंद आंदोलन सुरू केले. निलंबित केलेल्या कामगारांना कामावर घेतले जात नाही, तोपर्यंत काम न करण्याचा पवित्रा कामगारांनी घेतल्याने बुधवारी प्रकल्पातील उत्पादन प्रक्रिया ठप्प राहिली. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गुरूवारी बैठक आयोजित करण्यात आल्याचे कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तथापि, या विषयावर व्यवस्थापनाने कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. कराराची मुदत संपुष्टात येऊनही करार न करता व्यवस्थापन कामगारांमध्ये दुही निर्माण करीत असल्याची संघटनेची भावना आहे तर दुसरीकडे व्यवस्थापनाने निलंबनाच्या कारवाईचे समर्थन करत कराराविषयी कामगार प्रतिनिधींशी केव्हाही चर्चा करण्यास तयार असल्याची भूमिका मांडली आहे.