News Flash

थ्री इन वन: संपत्ती उभारणी, आकर्षक व्याज आणि करबचतसुद्धा!

सर्वाच्या आवडीचे आइस्क्रीम वेगवेगळ्या स्वादामध्ये मिळते.

प्राप्तिकर कायद्यातील तरतुदींचा प्राप्तिकर वाचवण्यासाठी तसेच आपल्या आयुष्यातील आíथक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठीसुद्धा उपयोग करून घेता येतो.

ठरलेले खर्च व त्यातून शिल्लक राहणाऱ्या मिळकतीतून बसविलेली आर्थिक नियोजनाची घडी कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या अकस्मात आजारपणाने विसकटून टाकली जाऊ शकते. पण कितीही अडथळे आले तरी निर्धारीत वित्तीय ध्येय गाठता येतेच. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफ हा अडथळ्यांप्रसंगी कामी येणारा रामबाण उपाय आहे. पीपीएफ योजनेचा स्मार्टली उपयोग कसा करून घेता येतो ते समजून घेऊ या..
सर्वाच्या आवडीचे आइस्क्रीम वेगवेगळ्या स्वादामध्ये मिळते. त्याचप्रमाणे ते वेगवेगळ्या प्रकारांतही मिळते. त्यातला एक प्रकार म्हणजे कसाटा! या प्रकारात तीन स्वादांतील आइस्क्रीम एकत्र मिळते. आणि हो, भरीस भर म्हणून त्याबरोबर केकचा एक तुकडासुद्धा (टॉप-अप म्हणून) त्या तीन स्वादाच्या आइस्क्रीमबरोबर मिळतो. प्रथमदर्शी वाचकांना वाटेल प्राप्तिकर नियोजनाच्या स्तंभामध्ये हे आइस्क्रीम पुराण कसे काय? पण आइस्क्रीमच्या कसाटा प्रकारात जसे एकाच आइस्क्रीममध्ये तीन स्वादांचे आइस्क्रीम मिळते तसेच प्राप्तिकर नियोजनामध्येसुद्धा एकाच योजनेमधून तीन प्रकारचे फायदे आणि (टॉप-अप म्हणून) एक जोड फायदाही (केकसारखा) मिळतो.
प्राप्तिकर कायद्यातील तरतुदींचा प्राप्तिकर वाचवण्यासाठी तसेच आपल्या आयुष्यातील आíथक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठीसुद्धा उपयोग करून घेता येतो. अनेक पालकांची अशी इच्छा असते की आपल्या मुला-मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोठी रक्कम उभी करावी. ज्यायोगे अशी रक्कम त्यांच्या उच्च शिक्षणासाठी, करिअर घडवण्यासाठी किंवा अशाच इतर महत्त्वाच्या कारणांसाठी आíथक आधाराची ठरेल. असे प्रामाणिक हेतू डोळ्यांसमोर ठेवून अनेक पालक अज्ञान अपत्यांच्या नावे पसे गुंतवायला सुरुवातही करतात, परंतु अनेक पालकांना कलम ६४(१अ) अंतर्गत तरतूद माहीत नसते. या कलमानुसार अशा गुंतवणुकीमधून निर्माण होणारे उत्पन्न त्या अज्ञान अपत्याचे न धरता ज्या पालकाने त्याच्या नावे गुंतवणूक केली आहे त्याचे धरले जाते. यालाच ‘क्लिबग ऑफ इन्कम’ म्हणतात. ही तरतूद म्हणजे सुक्याबरोबर ओलेही जळते अशा स्वरूपाची आहे. कारण काही अप्रामाणिक करदाते स्वतच्या नावे गुंतवणूक झाल्यास कर भरावा लागेल म्हणून (असा कर चुकवण्यासाठी) ती गुंतवणूक आपल्या अज्ञान अपत्यांच्या नावे वळती करतात. अशा अप्रामाणिक करदात्यांना चाप बसण्यासाठी कलम ६४(१अ) ची तरतूद करण्यात आली आहे.
परंतु हेतू प्रामाणिक असेल तर कितीही अडथळे आले तरी ध्येय गाठता येतेच. ज्या प्रामाणिक पालकांना आपल्या मुला-मुलीसाठी भविष्यात मोठी करमुक्तरक्कम उभारायची आहे पण क्लिबग ऑफ इन्कमची तरतूद कायदेशीररीत्या टाळायची आहे त्यांनी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड या योजनेचा स्मार्टली उपयोग करावा आणि या एकाच योजनेमध्ये पसे गुंतवून चार फायदे मिळवावेत. एक उदाहरण घेऊन हे नियोजन कसे करावे हे स्पष्ट करतो.
अनिरुद्ध साठे यांना त्यांच्या मुलाच्या भविष्यासाठी एक मोठी रक्कम उभी करावी असे वाटते. सध्या त्यांचा मुलगा ३ वर्षांचा आहे. ही रक्कम त्यांचा मुलगा १८ वर्षांचा झाला की त्याला मिळावी, अशी त्यांची इच्छा आहे. ते स्वत: ३०.९% कराच्या टप्प्यात येतात. या माहितीच्या आधारे त्यांनी मुलाच्या नावे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड खाते उघडावे. दर वर्षी या खात्यामध्ये मुलाला भेट म्हणून १५०००० रुपये जमा करावेत. या नियोजनाचे होणारे फायदे :
पीपीएफ खात्यावर सध्या ८.७०% व्याज मिळते. हा दर असाच कायम राहिला असे गृहीत धरले तर १५ वर्षांनंतर त्यांच्या मुलाच्या नावे ४६,७५,९१४ रुपये (सेहेचाळीस लाख पंचाहत्तर हजार नऊशे चौदा रुपये) एवढी मोठी कर मुक्त रक्कम (भांडवल म्हणून) तयार झालेली असेल.
पीपीएफ खात्यावर मिळणारे व्याज कलम १०(११) अंतर्गत संपूर्णपणे करमुक्त असल्याने हे व्याज अनिरुद्ध यांच्या उत्पन्नात क्लब होण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही आणि त्यामुळे त्यांना या व्याजावर कर भरण्याचा प्रश्नच नाही.
अनिरुद्ध यांचा दर वर्षी १५०००० रुपयाच्या गुंतवणुकीवर ३०.९% म्हणजे ४६३५० रुपये एवढा प्राप्तिकरही वाचेल.
अनिरुद्ध यांना ८.७०% व्याज मिळेल ते १५०००० रुपयांच्या दर वर्षीच्या गुंतवणुकीवर. व्याजाची दर वर्षी रक्कम होते १३०५० रुपये. पण कर बचतीची रक्कम वजा जाता प्रत्यक्षात गुंतवणूक असेल १०३६५० रुपये (१५०००० वजा ४६३५०)! म्हणजे प्रत्यक्षात १२.५९% व्याज मिळाले! १३०५० भागिले १०३६५० गुणिले १००!
आणि म्हणून कसाटा आइस्क्रीममध्ये जसे आइस्क्रीमचे तीन स्वाद आणि त्याबरोबर केकचाही आस्वाद एकाच आइस्क्रीममध्ये घेता येतो त्याचप्रमाणे पीपीएफ योजनेमध्ये पसे गुंतवून आपल्या अपत्याच्या नावे करमुक्त भांडवल उभारणी, क्लिबग ऑफ इन्कमची तरतूद लागू न झाल्याने कर भरण्याचा प्रश्नच न उद्भवणे आणि जो गुंतवणूक करतोय, त्याला कर बचत या तीन फायद्यांबरोबर आकर्षक करमुक्त व्याज (१२.५९%) हा टॉप-अप फायदा मिळतो. मग? या थ्री- इन-वन फायद्यांबरोबर बरोबर टॉप-अपचा फायदा देणाऱ्या पीपीएफ योजनेचा लाभ घेणार ना?

– दत्तात्रय (वैभव) काळे
dattatrayakalez@yahoo.in
लेखक मुंबईस्थित प्राप्तिकर नियोजन सल्लागार

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2015 12:04 am

Web Title: articles on wealth building
Next Stories
1 ‘बुलेट’ वृद्धिपथ..
2 ।। नळी फुंकिली सोनारे ।।
3 ‘ये मेरा इंडिया’
Just Now!
X