|| आशीष ठाकूर

अर्थव्यवस्थेत प्राण फुंकण्यासाठी मागील शुक्रवारी अर्थमंत्र्यांकडून काही उपाय योजले गेले. निरंतर पडझडीने भयशंक झालेल्या भांडवली बाजार गुंतवणूकदारांवर या निर्णयांकडे कसे पाहतात, हे या आठवडय़ाच्या व्यवहारांमधून दिसून येईल. तथापि बँकांना ७० हजार कोटी पुन:भांडवलीकरणासाठी दिले जाणार आहेत. या ७० हजार कोटींवर आपण सातपट हे प्रमाण धरले तरी पाच लाख कोटींचा कर्जपुरवठा खुला होईल इतके बँकांना बळ निश्चितच मिळाले आहे.

ज्या कारणांमुळे बाजार कोसळत होता, त्यातील त्रुटी दूर झाल्याने, पुन्हा त्याच कारणांवर बाजार सावरला, असे आपण सरलेल्या आठवडय़ात अनुभवले. या पार्श्वभूमी वर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

  • सेन्सेक्स ३६,७०१.१६
  • निफ्टी १०,८२९.४०

निर्देशांकाचा भरभक्कम आधार सेन्सेक्सवर ३६,४०० आणि निफ्टीवर १०,८०० चा आधार गुरुवारी तोडल्यामुळे तेजीच्या गोटात घबराट पसरली; पण शुक्रवारी अर्थमंत्र्यांनी परदेशी गुंतवणूकदार संस्थांवरील वाढीव कर रद्द करण्याची घोषणा केल्यामुळे बाजार सावरला. आता फिरून ‘तेजीचे काय झाले’ या प्रश्नाने उचल खाल्याने आज त्यासंबंधाने विस्तृतपणे जाणून घेऊ.

येणाऱ्या दिवसांत निर्देशांकांनी सेन्सेक्सवर ३६,४०० आणि निफ्टीवर १०,८०० चा स्तर सातत्याने राखल्यास सेन्सेक्सचे वरचे लक्ष्य ३७,४०० आणि निफ्टीवर ११,१०० असेल व हाच स्तर भविष्यातील तेजीसाठीचा ‘महत्त्वाचा मार्गदर्शक स्तर’ असेल. या स्तरावर निर्देशांक सातत्याने टिकल्यास भविष्यात सेन्सेक्सवर ३७,९०० ते ३८,२०० आणि निफ्टीवर ११,३०० ते ११,४०० चा स्तर दृष्टिपथात येईल.

‘सामना’ चित्रपटात एकच प्रश्न वारंवार विचारला जायचा.. ‘मारुती कांबळेचं काय झालं’ तसं आपल्या बाजारात शाश्वत तेजी कधी येणार? असे विचारले जात आहे. याचे उत्तर.. निर्देशांकांनी सातत्याने सेन्सेक्सवर ३८,८०० आणि निफ्टीवर ११,६०० या स्तरावर टिकणे नितांत गरजेचे आहे. या स्तरावर निर्देशांक सातत्याने टिकल्यास बाजार मंदीच्या विळख्यातून बाहेर आला असे समजण्यास हरकत नाही.

तिमाही निकालांचे विश्लेषण..

आता बहुतांश कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे ‘महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर’ या संकल्पनेची ‘हा सूर्य, हा जयद्रथ’ या न्यायाने चिकित्सा होणे गरजेचे आहे. या संकल्पनेचा मुख्य उद्देश हा कंपन्यांच्या तिमाही निकालाअगोदर वाचकांची मानसिकता तयार करून, प्रत्यक्ष निकालानंतर त्या अनुषंगाने कृती करणे हा आहे. कंपनीचा तिमाही निकाल उत्कृष्ट असेल तर, समभाग महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर राखत आपले वरचे लक्ष्य साध्य करेल. याउलट तिमाही निकाल निराशाजनक असतील तर वाचक समभाग विकून संभाव्य नुकसान/ तोटा टाळू शकतील.

इन्फोसिस टेक्नॉलॉजीज

या स्तंभातील ८ जुलच्या लेखातील समभाग हा इन्फोसिस टेक्नॉलॉजीज लिमिटेड होता. त्याचा बंद भाव त्यासमयी ७१८ रुपये होता व वित्तीय निकाल जाहीर झाल्यानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर ७२० रुपये होता. लेखात म्हटल्याप्रमाणे, जर वित्तीय निकाल उत्कृष्ट असेल तर ७२० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य ७६० रुपये व त्यानंतर ८०० रुपयांचे वरचे लक्ष्य सूचित केले होते.

हे प्रत्यक्ष निकालाअगोदरचे विश्लेषण होते. इन्फोसिसचा प्रत्यक्ष निकाल उत्कृष्ट असल्याने अतिशय सहजगत्या ८०० रुपयांचे इच्छित लक्ष्य २३ जुलला साध्य करून, अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांना (शॉर्ट टर्म ट्रेडर) अल्पावधीत ११ टक्के परतावा मिळविला.

इथे तांत्रिक विश्लेषण शास्त्राची किमया नमूद करावीशी वाटते. आताच्या मंदीच्या दिवसांत, तब्बल दीड महिन्यांनंतर, इन्फोसिसने ७२० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर तर राखलाच, लेखात नमूद केल्याप्रमाणे गेल्या आठवडय़ातील शुक्रवारचा बंद भाव ८०० रुपये राखत वरच्या लक्ष्याकडे प्रवास केला आहे. ‘शब्दावाचून कळले शब्दाच्या पलीकडले’

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.