वाहने असोत, विध्वंसकारी तोफा अथवा वीजनिर्मिती करणाऱ्या अणुभट्टय़ा, हे सर्व असंख्य सुटय़ा भागांची जुळणी करून बनतात. मग हे सुटय़ा भागांचे तुकडे एकमेकांशी अचूकपणे जोडले कसे जातात? यंत्र बनविताना एखादे छिद्र ठेवावे लागते ते किती व्यासाचे असावे? त्याचा परीघ किती असावा? ते छिद्र मोठे किंवा लहान झाले तर? अपेक्षित यंत्र बनणारच नाही. मग वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये बनणारे चपखल सुटे भाग जुळवून यंत्र आकाराला येते ते अत्यंत अचूक मोजमापाने! हे मोजमाप अगदी मायक्रॉन किंवा नॅनो परिमाणातील असते. अशा अचूक मोजमापाच्या क्षेत्रात औरंगाबादचे लघुउद्योजक रवींद्र कोंडेकर यांची ओळख आहे. अजूक मोजमाप करणारे यंत्र तयार करणे हा व्यवसाय होऊ शकतो असे त्यांनी ठरविले आणि आता जपान, चीन, जर्मनी अशा औद्योगिकदृष्टय़ा प्रगत देशांसह ३५ देशांमध्ये ते वेगवेगळी मोजमाप करणारी यंत्रे पुरवितात.

धान्याच्या तराजूत सोने मोजता येत नाही आणि सोन्या-चांदीच्या दुकानात धान्य मोजता येत नाही. प्रत्येक यंत्र वेगळे आणि मोजमापाचे परिमाणही वेगळे. कुठे द्राव्याचा दाब मोजायचा असतो, कुठे त्याचा प्रवाह मोजायचा असतो. पण बऱ्याच मोजमापात लांबी मोजावीच लागते. मिलीमीटर, सेंटीमीटर ही मापे आपण कधी तरी शिकतो. ती घेताही येतील बहुतेकांना. पण मिलीमीटरचा एक मायक्रॉन मोजता येईल? एका मिलीमीटरचा हजारावा भाग म्हणजे एक मायक्रॉन. एका मिलीमीटरचा दहा लाखावा भाग म्हणजे एक नॅनोमीटर. ज्यांनी कधी तरी विज्ञानाचे शिक्षण घेतले आहे त्यांना फार तर व्हर्निअर, कॅलिपरसारखी मोजमापे माहीत असतील. पण त्यापुढची मापे कशी घेतली जातात?

लहानपणी रवींद्र कोंडेकर यांनाही असे प्रश्न पडत. त्यातूनच पुढे ‘केसीपी रेफरन्स प्रिसिजन इन्स्ट्रमेन्ट्स’ ही कंपनी स्थापन होईल असे त्यांनाही वाटले नव्हते. भोवरा जेव्हा फिरतो तेव्हा त्याचे संतुलन करणारी लोखंडी आरी किती टोकदार असावी हे त्या भोवऱ्याच्या आकारावर ठरते. संतुलन करण्यासाठी असो किंवा यंत्र बनविताना लांबी मोजणे अपरिहार्य असते. पण ही मोजमापे मायक्रॉन किंवा नॅनो परिमाणात एकदा घेऊन चालत नाहीत. ती वारंवार घ्यावी लागतात. त्यामुळे वाहन निर्मितीच्या क्षेत्रात असो किंवा अन्य क्षेत्रात, मोजमाप नीट घेणाऱ्यांची कमतरता असल्याचे अभियांत्रिकीच्या क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या कोंडेकर यांना जाणवत होते.

लातूरमध्ये शिक्षण घेतल्यानंतर नोकरीसाठी औरंगाबादमध्ये आलेल्या कोंडेकर यांना पहिला अनुभव मिळाला तो अशा प्रकारच्या मोजमापाची उपकरणे बनविणाऱ्या कंपनीमध्ये. तेव्हापासून या क्षेत्रात स्वत:चा व्यवसाय उभा राहू शकतो असे त्यांनी मनोमन ठरविले होते.

भागीदारीचा अनुभव वाईट

कंपनीमध्ये काम करताना मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी स्वत:चा व्यवसाय करण्याचे ठरविले. वडिलांचा छोटासा कपडय़ाचा व्यवसाय होता. त्यामुळे नफा, नुकसान असे शब्द कानी पडत. पण एखादी कंपनी सुरू करायची, हे काही घरातील मंडळींना लगेच पटण्यासारखे नव्हते. पण मोजणी यंत्राच्या दुनियेत अधिक वाव असल्याचा ठाम आत्मविश्वास होता. नोकरी सोडल्यानंतर गाठीशी फक्त १६ हजार रुपये होते. घरातून आणखी एक लाख रुपयांची मदत झाली. एक मित्र भागीदार म्हणून घेतला. त्याने स्वत:ची नोकरी न सोडता गुंतवणूक करण्याचे ठरविले. त्याने एक लाख रुपये गुंतविले. १९९७ मध्ये वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये भूखंड विकत घेतला. लघू व मध्यम वित्तीय महामंडळाकडून तेव्हा कर्ज देण्याची योजना निघाली होती. भांडवल गरजेचे होते. त्यामुळे १७ टक्के व्याजदराने १६ लाख रुपयांचे कर्ज घेतले. दोन वर्षे खूप कष्ट घेतले. काही कंपन्यांमध्ये वेगवेगळी मोजमाप यंत्रे बंद पडली की, ते दुरुस्तीचे कामही हाती घेतले. अगदी कंपन्यांनी ज्या यंत्राचा उपयोग होणार नाही म्हणून वापरातून काढून टाकलेली यंत्रे पुन्हा कामात आणली. त्यातून विश्वास निर्माण होत गेला. पण काम करूनही आर्थिक घडी काही बसत नव्हती. २००४ पर्यंत १६ लाख रुपयांचे कर्ज ३२ लाखापर्यंत वाढले होते. आता नव्याने विचार करणे अपरिहार्य बनले होते. भागीदारी व्यवहारातून सुटका करून घ्यायची, असे ठरविले. सगळ्या नातेवाईकांकडून जमेल तसे पैसे उधार म्हणून घेतले आणि पुन्हा मोजणी यंत्राची दुनिया वाढविण्याचे ठरविले.

पैसे आणि मेहनत करून अक्कल विकत घ्यावी, असा अनुभव घेतल्यानंतर यंत्रातील बारकावे आणि बाजारपेठ याचा विचार केला. नवे तंत्रज्ञान स्वीकारले. पण सोबत काम करणारी माणसे बदलली नाहीत. त्यांनाच कौशल्य मिळेल अशी प्रशिक्षणे स्वत: दिली. आज ‘केसीपी’चा प्रमुख अधिकारी व्यक्ती हा केवळ बारावी उत्तीर्ण आहे. महिंद्र सोनपेठकर असे त्यांचे नाव. ग्रामीण भागातून आलेल्या सुमारे ७० शेतकऱ्यांच्या मुलांना कोंडेकर यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. मोजमाप घेण्यात त्यांचा हातखंडा आहे. हवामानामुळे मोजमाप चुकू शकते, त्यामुळे १९.५ ते २०.५ याच तापमानात बनणारी यंत्रे मोजणी यंत्राच्या क्षेत्रात नावारूपाला आली आहेत. जवळपास १८ प्रकारची मोजणी यंत्रे आता ‘केसीपी’मध्ये बनविली जातात. लघुउद्योगाला चालना द्यायची असेल तर पायाभूत सुविधांबरोबरच कर्ज व्याजदरामध्ये सवलती दिल्या गेल्या तरच या क्षेत्रात नवे खूप रोजगार निर्माण होऊ शकतील, असे कोंडेकर यांना वाटते. पुढे कर्ज आणि उलाढाल याचा मेळ बसत गेला. बँकांबरोबरचा व्यवहार नीट होत गेला. आठ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज घेतले. त्याची परतफेडही झाली. आता परिस्थिती अशी आहे की, नव्याने कर्ज घेण्याची आवश्यकता नाही.

छोटीशी सहजासहजी नजरेत न भरणारी एखादी लोखंडी तार धातू कापण्यासाठी उपयोगी ठरते. अशी यंत्रे तयार करण्यासाठी टंगस्टन कार्बाइड, अ‍ॅलॉय स्टील आणि सिरॅमिक हा कच्चा माल लागतो. अलीकडच्या काळात मोजमाप हे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपोआप व्हावे, त्यासाठी स्वतंत्र व्यक्ती किंवा स्वतंत्र यंत्रसामग्री लागू नये, अशी प्रणाली विकसित होत आहे. परंतु, ऑटोमॅटिक गेजेसमध्येही ‘केसीपी’ आता अग्रेसर ठरू लागली असल्याचा दावा रवींद्र कोंडेकर करतात. जागतिक स्पर्धेत मोजमापाची यंत्रे बनविण्याच्या क्षेत्रात औरंगाबादच्या लघुउद्योग क्षेत्रातील ही कंपनी नवे परिमाण निर्माण करत आहे.

सुहास सरदेशमुख

रवींद्र कोंडेकर (केसी प्रिसिजन)

* उत्पादन : मोजणी यंत्रांची निर्मिती

* मूळ गुंतवणूक  : २.१६ लाख रु.

* स्व-भांडवल  : १६ हजार रु.

* सरकारी योजनेचा फायदा? :  लघु व मध्यम उद्योग वित्तीय महामंडळाकडून कर्ज

* सध्याची उलाढाल : ७ कोटी रु.

* रोजगार निर्मिती : ७०

* शिक्षण : अभियांत्रिकी (यांत्रिकी) पदवी

* डिजिटल सक्षमता : संकेतस्थळ : http://www.kcpindia.com

* लेखक ‘लोकसत्ता’चे औरंगाबादचे प्रतिनिधी suhas.sardeshmukh @expressindia.com आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस, सूचना ई-मेल : arthmanas@expressindia.com वर कळविता येईल.