• प्रश्न : मला माझ्या संस्थेकडून, न्यायालयाच्या आदेशानुसार, २००८ ते २०१२ या कालावधीतील प्राचार्य पदावरील सेवेबाबत वेतनापोटी ४,५०,००० रुपये मिळाले आहेत. तरी ही रक्कम २००८ ते २०१२ च्या प्राप्तिकरात दाखवावी लागेल का?    – नरेंद्र पत्रे, लोहा, नांदेड

उत्तर : हे पैसे आपल्याला न्यायालयाच्या आदेशानुसार २०१७-१८ या आर्थिक वर्षांत मिळाले आहेत. यावर आपल्याला २०१७-१८ या आर्थिक वर्षांतच कर भरावा लागेल. परंतु कर भरताना आपल्याला ‘कलम ८९ (१)’नुसार कर सवलत घेता येईल. आपल्याला पगारापोटी मागील काही वर्षांकरिताची थकीत रक्कम एकाच वर्षांत मिळाली असल्यास आपल्याला वाढीव कर भरावा लागू नये म्हणून या कलमानुसार कर सवलत मिळते. आपल्याला ‘फॉर्म १० ई’ भरून या कलमाद्वारे करसवलत घेता येईल. मागील काही वर्षांपासून या सवलतीसाठी ‘फॉर्म १० ई’ ऑनलाइन भरणे बंधनकारक केले आहे.

  • प्रश्न : माझी पत्नी ज्येष्ठ नागरिक आहे. तिचे वार्षिक उत्पन्न पेन्शन आणि मुदत ठेवीवरचे व्याज आहे. हे एकूण उत्पन्न २,९०,००० रुपये आहे. हे उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा कमी असल्यामुळे ती विवरणपत्र भरत नाही. या वर्षी तिला इन्फोसिस कंपनीच्या समभाग फेरखरेदी अर्थात ‘बायबॅक’अंतर्गत ११,४५० रुपये अल्पमुदतीचा भांडवली नफा झाला, त्यामुळे तिचे उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. तिने १५,००० रुपये ईएलएसएस अर्थात करबचतीच्या म्युच्युअल फंड योजनांत गुंतवले तरी तिला भांडवली नफ्यावर १५ टक्के प्राप्तिकर भरावा लागेल का? प्राप्तिकर विवरणपत्र भरावे लागेल का? – विजय भिडे, मुलुंड, मुंबई

उत्तर : आपला पहिला प्रश्न असा आहे की आपल्याला झालेल्या अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागेल का? आपल्याला कर भरावा लागणार नाही. कारण ‘कलम ८० सी’ची वजावट आपल्या एकूण उत्पन्नातून म्हणजेच ३,०१,४५० (२,९०,००० रुपये आणि ११,४५० रुपये) कमी होऊन एकूण करपात्र उत्पन्न २,८६,४५० रुपये म्हणजेच ३ लाख रुपयांपेक्षा कमी आहे. आपला दुसरा प्रश्न विवरणपत्र भरण्यासंबंधी आहे. आपले एकूण उत्पन्न ३,०१,४५० रुपये म्हणजेच कमाल करमुक्त उत्पन्नापेक्षा (आपण ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे ३ लाख रुपये) जास्त होत असल्यामुळे आपल्याला विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे. ‘कलम १३९ (१)’नुसार एकूण उत्पन्न ‘कलम ८०’च्या सर्व वजावटी विचारात घेण्यापूर्वी कमाल करमुक्त मर्यादेपेक्षा जास्त असेल तर विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे.

  • प्रश्न : माझा एक व्यवसाय आहे. मी नियमित विवरणपत्र भरतो. मला माझ्या आत्याकडून मृत्युपत्राद्वारे १५ लाख रुपये रक्कम मिळाली आणि एक घर जे विकून मला ८ लाख रुपये मिळणार आहेत. या रकमेवर मला प्राप्तिकर भरावा लागेल का? – संजय घाटपांडे, पुणे

उत्तर : मृत्युपत्राद्वारे मिळालेली रक्कम किंवा संपत्ती करपात्र नाही, परंतु आपल्याला आत्याकडून मृत्युपत्राद्वारे मिळालेल्या घराची आपण विक्री केल्यास त्यावर होणाऱ्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागेल. त्यासाठी ते घर आत्याने किती किमतीला खरेदी केले हे विचारात घेऊन भांडवली नफा काढावा लागेल. हे घर आत्याने १ एप्रिल २००१ पूर्वी खरेदी केले असल्यास घराच्या १ एप्रिल २००१ रोजीचे वाजवी बाजारभाव मूल्य आणि त्यावर महागाई निर्देशांक विचारात घेऊन भांडवली नफा काढावा लागेल. या भांडवली नफ्यावर २० टक्के (अधिक ३ टक्के शैक्षणिक कर) इतका कर भरावा लागेल.

  • प्रश्न : माझ्या मैत्रिणीच्या वडिलांचे वय ८२ वर्षे असून त्यांच्या डीमॅट खात्यात काही कंपन्यांचे समभाग आहेत. हे समभाग आपल्या हयातीत बक्षीस रूपाने मुलीच्या डीमॅट खात्यात जमा करणे अथवा मृत्युपत्राद्वारे मुलीच्या नावे करणे असे दोन पर्याय त्यांच्यासमोर आहेत, परंतु कर नियोजनाच्या दृष्टीने दोघांसाठीही कोणता पर्याय जास्त लाभदायक ठरेल यावर मार्गदर्शन करावे.   – सुजाता मुणगेकर, मुंबई

उत्तर : आपल्या या दोन्ही पर्यायामध्ये मुलीला कर भरावा लागणार नाही. ठरावीक नातेवाईकांना दिलेल्या भेटी करपात्र नाहीत. प्राप्तिकर कायद्याप्रमाणे मुलीचा ‘ठरावीक नातेवाईकां’मध्ये समावेश होत असल्यामुळे मुलीला हयातीत बक्षीसरूपाने शेअर्स हस्तांतरित केले तरी यावर कर भरावा लागणार नाही. मुलगी सज्ञान (१८ वर्षांपेक्षा जास्त) असल्यामुळे उत्पन्नासाठी ‘क्लबिंग’च्या तरतुदी लागू होत नाहीत. मृत्युपत्राद्वारे मिळालेली संपत्ती करपात्र नाही.

  • प्रश्न : माझ्या वडिलांनी वडिलोपार्जित मालमत्ता विकली आणि त्यांना जुलै २०१७ मध्ये ३४ लाख रुपये मिळाले. यावर भांडवली कर कसा गणावा आणि तो वाचविण्यासाठी काय करावे?   – निखिल करकरे, परतवाडा

उत्तर : वडिलोपार्जित मालमत्ता कधी विकत घेतली हे महत्त्वाचे आहे. जर त्यांच्या वडिलांनी किंवा आजोबांनी १ एप्रिल २००१ पूर्वी खरेदी केली असल्यास त्याचे १ एप्रिल २००१ रोजीचे बाजारभाव मूल्य आणि त्यावर महागाई निर्देशांक विचारात घेऊन आलेली खरेदी किंमत आणि ज्या किमतीला विकली ती किंमत यामधील फरक हा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा असेल. हा कर वाचविण्यासाठी ही मालमत्ता कोणत्या स्वरूपात आहे हे समजणे गरजेचे आहे. आपल्या प्रश्नात याचा उल्लेख नाही. ही मालमत्ता घराच्या स्वरूपात असेल तर ‘कलम ५४’ नुसार भांडवली नफ्याएवढी रक्कम दुसऱ्या घरात गुंतविली तर कर भरावा लागणार नाही. ही रक्कम विक्रीच्या एक वर्ष आधी किंवा विक्री झाल्यानंतर दोन वर्षांच्या आत किंवा तीन वर्षांच्या आत (घर बांधले तर) गुंतविणे बंधनकारक आहे किंवा भांडवली नफ्याएवढी रक्कम ‘कलम ५४ ईसी’नुसार बाँडमध्ये गुंतविल्यास कर भरावा लागणार नाही. ही मालमत्ता घराच्या रूपात नसली तर ‘कलम ५४ एफ’नुसार संपूर्ण विक्री रक्कम (विक्री खर्च वजा जाता) घरात गुंतविली तर कर भरावा लागणार नाही. यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागेल.

  • प्रश्न : मी माझ्याकडील इक्विटी म्युच्युअल फंडातील युनिट्सची या वर्षी विक्री केली, हे मी खरेदी केल्या तारखेपासून एक वर्षांच्या आत विकत आहे. यात मला नफा होत आहे. शिवाय माझ्याकडे काही जुने शेअर्स (एक वर्षांपूर्वी खरेदी केलेले) होते ते शेअर बाजारातर्फे या वर्षी विकले आणि यावर मला दीर्घ मुदतीचा भांडवली तोटा झाला. हा तोटा मी म्युच्युअल फंडाच्या व्यवहारात झालेल्या नफ्यातून वजा करू शकतो का?    – किशोर धाके, डोंबिवली

उत्तर : आपल्याला इक्विटी म्युच्युअल फंडातील युनिट्सच्या विक्रीतून झालेला भांडवली नफा हा अल्पमुदतीचा आहे. आणि शेअर्सच्या विक्रीवर झालेला भांडवली तोटा हा दीर्घ मुदतीचा आहे. ज्या शेअर्सच्या विक्रीवर रोखे उलाढाल कर (एसटीटी) भरला आहे, अशा विक्रीवर झालेला भांडवली नफा हा ‘कलम १०(३८)’नुसार करमुक्त आहे. अशा व्यवहारावरील नफा करमुक्त असल्यामुळे अशा व्यवहारावरील तोटय़ाचा फायदा घेता येत नाही आणि त्यामुळे इतर भांडवली नफ्यातून हा तोटा वजा करता येत नाही.

  • प्रश्न : मी एक सरकारी नोकरदार असून माझा पगार दरमहा २५,००० रुपयांपेक्षा कमी म्हणजेच वार्षिक ३ लाख रुपये आहे. या उत्पन्नावर मला कर भरावा लागत नाही. मी म्युच्युअल फंडात काही गुंतवणूक केली आहे. मला या उत्पन्नावर कर भरावा लागेल का?    – राम मुटकुळे, हिंगोली</strong>

उत्तर : म्युच्युअल फंडाकडून मिळालेला लाभांश करमुक्त आहे. त्यामुळे या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही. इक्विटी म्युच्युअल फंडातील युनिट्सची, खरेदी केल्या तारखेपासून एक वर्षांच्या आत विक्री केल्यास त्यावर १५ टक्के इतका कर भरावा लागेल आणि खरेदी केल्या तारखेपासून एक वर्षांनंतर विक्री केल्यास होणारा नफा करमुक्त आहे. डेट म्युच्युअल फंडातील युनिट्सची, खरेदी केल्या तारखेपासून तीन वर्षांच्या आत विक्री केल्यास त्यावर आपल्या करपात्र उत्पन्नाच्या स्लॅबप्रमाणे कर भरावा लागेल. आणि तीन वर्षांनंतर विक्री केल्यास महागाई निर्देशांकाचा (इंडेक्सेशन) फायदा घेऊन दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर २० टक्के कर भरावा लागेल.

प्रवीण देशपांडे

pravin3966@rediffmail.com

(लेखक मुंबईस्थित सनदी लेखाकार आहेत.)

(वाचकांच्या मनात प्राप्तिकर कायद्याविषयीचे प्रश्न खाली दिलेल्या ई-मेलवर पाठवावेत. प्रश्न विचारताना आपले नाव, गाव किंवा शहराचे नाव याचा उल्लेख असावा. शक्यतो मराठी (युनिकोडमध्ये) टाइप केलेला प्रश्न हा नेमका असावा आणि व्यवहाराची संपूर्ण माहिती द्यावी जेणेकरून शंकेचे निरसन करता येईल.)