News Flash

सोने एक ‘वंडर कमोडिटी’ भाग तिसरा

मागील दोन लेखांवरून लक्षात आले असेल की सोन्यामधील गुंतवणूक किती गुंतागुंतीची असू शकते.

|| श्रीकांत कुवळेकर

सोन्यामध्ये गुंतवणुकीचा कुठला पर्याय योग्य आहे हे ठरवताना आपली जोखीम पत्करण्याची आर्थिक आणि मानसिक क्षमता, परताव्याबद्दलच्या अपेक्षा, गुंतवणूक कालावधी, कर सवलती हे घटक विचारात घ्यावे लागतात.

मागील दोन लेखांवरून लक्षात आले असेल की सोन्यामधील गुंतवणूक किती गुंतागुंतीची असू शकते. खरे तर जगातील प्रमुख विकसित आणि विकसनशील देशांमध्ये सोने खरेदी फारच सुटसुटीत असते. कारण त्यांच्या बाजारपेठा देखील विकसित आणि सुनियंत्रीत आहेत. आपल्या देशात सराफा बाजाराची ओळखच  मुळात काळ्या पैशाचे उगम आणि अंतिम स्थान अशी असल्याने जी काही सरकारी बंधने आहेत त्याचा वापर होण्याऐवजी बरेचदा गैरवापर होताना दिसतो.

आपला सराफा बाजार  इतका अनियंत्रित आहे की नुसत्या सोन्याच्या शुद्धतेच्या कसोटीवर त्याला १०० पैकी ३५ मार्क मिळताना मारामार आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर मागील सरकारमध्ये केंद्रात ग्राहक संरक्षण मंत्री असताना दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच एकदा सांगितले होते की, भारतात विविध प्रांतातील सोने विक्रेत्यांच्या सर्वेक्षणात सोन्याच्या शुद्धतेमध्ये प्रचंड तफावत दिसून आली. म्हणजे २३ कॅरेटचे पैसे घेऊन विकलेल्या सोन्याची शुद्धता १६ ते २२ कॅरेट एवढी आढळली. यावरून ग्राहकांची किती फसवणूक होते हे कळेल. तसेच मंदीच्या काळातही एखादा विक्रेता पाच वर्षांत एका दुकानाची तीन—चार दुकाने कशी करतो हे कळेल.

थोडक्यात शुद्ध सोने हे गुंतवणुकीसाठी सर्वात मोठे आव्हान आहे. आजकाल संघटित क्षेत्रामधील बरेच दुकानदार शुद्धतेची गॅरंटी देतात, शिवाय स्पर्धात्मक भाव आणि पुनर्खरेदी त्या दिवसाच्या भावांमध्ये घट न कापता करण्याचे आश्वासन देतात. मात्र शेजारी शेजारी वडील आणि मुलाचे स्वतंत्र व्यवसाय असल्यास बापाच्या दुकानातील सोने मुलगा घटीशिवाय पुनर्खरेदी करण्याची शक्यता नाही. गमतीचा भाग सोडा पण अशा दुकानात सोने खरेदी केल्यास शुद्धतेची गॅरंटी मिळून घट वाचल्याने परतावा तुलनेने बरा मिळेल.

मात्र ज्यात या पर्यायाचे सर्व फायदे आहेत आणि त्याचबरोबर साठवणूक खर्च, चोरी किंवा हरविणे अशा जोखमा आणि त्यावरील खर्च देखील नाहीत असा पर्याय असेल तर त्याचा विचार करूया.

आजच्या डिजिटल युगात  सोन्यात गुंतवणूक करण्यास असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. किंबहुना पाऊस पडल्यावर भूछत्र उगवावीत तसे डिजिटल गोल्ड विक्रेते निर्माण होत आहेत.  त्यातील बरेच जण सराफा बाजारापेक्षा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पारंगत आहेत. त्यामुळे सोने व्यवसायातील खाचाखोचांची त्यांना कितपत जाण असेल ते सिद्ध होण्यास अजून थोडा कालावधी लागेल.

काही अपरिहार्य कारणांमुळे नावे देणे शक्य नसले तरी मुंबई जव्हेरी बाजारातील काही प्रथितयश  कंपन्यांच्या व्यावसायिक पाठिंब्याने चालू झालेले ऑनलाइन बुलिअन खरेदी विक्री मंच किंवा संकेतस्थळे याद्वारे सोने खरेदी ‘रिअल टाइम’ पद्धतीने होऊ शकेल.

सर्वात मोठा फायदा म्हणजे लॅपटॉप अथवा मोबाइल फोनद्वारे घरबसल्या सोने खरेदी होते. आणखी एक बरी गोष्ट म्हणजे भाव अगदीच स्पर्धात्मक असतो. आपल्याला फक्त एकदा खाते उघडावे लागते. नंतरचे व्यवहार ऑनलाईन पद्धतीने होतात. सोने एका क्षणात आपल्या अकाउंटमध्ये येते.  या पद्धतीत अगदी एक मिलिग्राम म्हणजे एक ग्रामचा दहावा भाग एवढे कमी सोने घेता येत असल्याने ३५० रुपयांमध्ये आपण सोने व्यवहार करू शकता. सोने आपल्या अकाउंटमध्ये असेपर्यंत वस्तू सेवा कर भरावा लागत नाही, मात्र आपल्याला सोन्याची गरज लागेल तेव्हा आपण ते कर आणि डिलिव्हरी चार्ज देऊन सोने मागवता येते.

विकायचे झाल्यास केव्हाही आपल्या अकाउंटमध्ये जाऊन विक्री करता येते व आपल्याला क्षणार्धात पैसे मिळतात. यात दुकानच्या फेऱ्या, पैशाची देवाण घेवाण इत्यादी गोष्टींपासून सुटका मिळत असली तरी घेतलेले सोने विकताना थोडी कमी किंमत येते. हा एकमात्र तोटा सोडून दिला तरी ‘सोयीस्करता’ अमाप आहे. शिवाय सोन्याचे भाव जागतिक बाजाराशी ‘रिअल टाईम’ निगडित असल्यामुळे जेव्हा बाजारात प्रचंड चढ उतार असतात तेव्हा पडलेल्या भावात खरेदी करून चढय़ा भावाने विकून प्रत्यक्ष सोन्याची देवाण घेवाण न करता देखील भावातील फरकापासून फायदा करून घेता येईल.

‘गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड’ म्हणजे गोल्ड ईटीएफ हाही एक पर्याय आहे. म्हणजे सोन्याची युनिट रूपाने विक्री करणे. साधारणपणे एक ग्राम सोन्याच्या समतुल्य एक युनिट असते. हा पर्याय म्हणजे पेपरगोल्ड म्हणजे युनिटच्या रूपामध्ये सोने खरेदी करणे. प्रत्यक्ष सोन्याऐवजी आपल्या डिमॅट खात्यात सोने नावावर जमा होते.  म्हणजे सोने घरात बाळगण्याची जोखीम टळते. अजून एक फायदा म्हणजे या युनिट्सचे शेअर बाजारात शेअर्सप्रमाणेच व्यवहार होतात. त्यामुळे या प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये बऱ्यापैकी लिक्विडिटी किंवा रोखसुलभता असते.

गोल्ड ईटीएफवर म्युच्युअल फंड आणि आणि शेअर बाजार नियंत्रकांचे बारीक लक्ष असल्यामुळे या गुंतवणुकीमध्ये घोटाळे वगैरे जोखीम जवळपास शून्य असणे हा सामान्य गुंतवणूकदारांसाठी मोठ्ठा फायदा असतो. परंतु दर वर्षांला निदान एक टक्का एवढे शुल्क हे म्युच्युअल फंड युनिटच्या मालमत्ता मूल्यामधून वजा करीत असल्यामुळे तेवढा तोटा होतोच. म्हणून एक ग्राम सोन्याची किंमत देऊन खरेदी केलेले युनिट आज एक ग्राम सोन्याच्या भावापेक्षा खुपच कमी भावात विकले जात आहेत.

वस्तुत: पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये ईटीएफ अत्यंत लोकप्रिय असून सुमारे २५०० टन एवढे सोने या फंडांमध्ये ईटीएफ च्या माध्यमातून जमा झाले आहे. त्यामुळे १० वर्षांपूर्वी गाजावाजा करून भारतात देखील गोल्ड इटीएफ आणले गेले. सुरुवातीची २-३ वर्षे याला चांगला प्रतिसाद मिळाला तरी २०१४ पासून त्याला ग्रहण लागून लोकांनी त्यातून सतत काढता पाय घेतल्याचे चित्र आहे. सुमारे  १० कंपन्यांच्या गोल्ड ईटीएफ चे सोने एकत्रित केले तरी ते अगदीच नगण्य आहे.

एवढे सर्व पर्याय अभ्यासल्यावर सर्वात किफायतशीर आणि जास्तीत जास्त परतावा देणारा पर्याय पाहूया.  गेल्या २-३ वर्षांत सरकारने प्रत्यक्ष सोन्यातील गुंतवणूक कमी करून ती सरकारी रोख्यांमार्फत अर्थव्यवस्थेमध्ये येण्यासाठी सुवर्णारोख्यांची सार्वजनिक विक्री करण्याचे धोरण अवलंबिले आहे. भारतीय गुंतवणूकदारांच्या विशिष्ट मानसिकतेमुळे त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसला तरी सामान्य गुंतवणूकदारांना, किंवा ज्यांना वायदे बाजार, ऑनलाईन पर्यायांची भीती वाटते त्यांच्यासाठी हा सर्वात उत्तम पर्याय आहे.

प्रथम याचे अनेक फायदे पाहू. आठ वर्षे कालावधीच्या आणि एक ग्राम समतुल्य अशा या रोख्यांवर दरवर्षांला २.५ टक्के व्याज मिळते, पाच वर्षांनंतर विकण्याची मुभा, शिवाय विकत घेताना बाजारभावावर ५० रुपये डिस्काउंटदेखील मिळतो. आपल्या डिमॅट अकाउंटमध्ये येत असल्यामुळे साठवणूक खर्च नाही. आठ वर्षांनी हे रोखे त्या वेळच्या सोन्याच्या किमतीत विकत घेतले जातात. मुख्य म्हणजे ही वस्तू आणि सेवा करमुक्त सोने गुंतवणूक असते आणि गुंतवणूक सरकारी असल्यामुळे पुरेशी सुरक्षित आहे.

हे रोखे शेअर बाजारात व्यवहार होत असल्यामुळे रोकडसुलभता देखील आहेत. एवढे फायदे असल्यामुळे मध्यम ते दीर्घ कालावधीसाठी सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी याहून दुसरा चांगला पर्याय नाही. सध्या तर हे रोखे शेअर बाजारात सोन्याच्या भावापेक्षा सात आठ टक्के कमी भावाने उपलब्ध असल्यामुळे यातील गुंतवणूक म्हणजे ‘सोने पे सुहागा’ म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण कुठल्याही रुपात प्रत्यक्ष सोने घेऊन जेवढा परतावा मिळतील त्यापेक्षा खूप जास्त परतावा रोख्यांमध्ये नक्की मिळेल. सध्या एकच काळजी करण्यासारखी गोष्ट यात आहे ती म्हणजे शेअर बाजारात या रोख्याचे व्यवहार फारच कमी होत असल्यामुळे कमी भावाचा फायदा घेऊन एकदम मोठी गुंतवणूक करणे कठीण असून रोज थोडे थोडे रोखेच घ्यावे लागतील.

शेवटच्या भागामध्ये आपण वायदे बाजाराचा वापर करून सोने खरेदी विक्रीतून चांगला नफा कसा मिळवू शकतो हे पाहू.

ksrikant10@gmail.com

(लेखक वस्तू बाजार विश्लेषक )

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2018 3:31 am

Web Title: gold a wonder commodity 3
Next Stories
1 तेजीची झुळूक की शाश्वत तेजी?
2 नाही कशी म्हणू तुला, घेते तुझे नांव..
3 शतदा प्रेम करावे..
Just Now!
X