News Flash

हायब्रिड फंड

बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व गुंतवणूक पर्यायांमध्ये म्युच्युअल फंड हा तुलनेने सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे.

| October 28, 2013 08:40 am

इक्विटी योजना दीर्घ कालावधीमध्ये मोठा फायदा करून देत असल्या तरी गुंतवणूकदाराकरिता इक्विटीशी संबंधित चढउतार हा इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्यात येणारा मोठा अडथळा वाटतो. अशा परिस्थितीत गुंतवणुकीत वैविध्य साधणारे ‘हायब्रिड फंड्स’ मदतकारक ठरू शकतात.
बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व गुंतवणूक पर्यायांमध्ये म्युच्युअल फंड हा तुलनेने सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे. म्युच्युअल फंड वेगवेगळ्या मालमत्ता वर्गवाऱ्यांमध्ये गुंतवणूक करणारी अनेक उत्पादने देऊ करतात. असे असूनही म्युच्युअल फंडाविषयीची जागरूकता आणि माहिती ही फक्त इक्विटीशी निगडित म्युच्युअल फंड्स इतपतच मर्यादित आहे. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणुकीला नाके मुरडणाऱ्या आपल्यापकी बऱ्याच लोकांना म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणेही धोक्याचे वाटणे साहजिक आहे. पण यात तथ्य नाही. गुंतवणूकदार जी एकूण गुंतवणूक करतात त्यापकी केवळ २२ टक्के गुंतवणूक ही इक्विटीच्या स्वरूपात आहे आणि मजेदार बाब अशी की म्युच्युअल फंडात केलेल्या एकूण गुंतवणुकींपकी ५९ टक्के गुंतवणूक इक्विटीच्या स्वरूपात असते. याचाच अर्थ असा की, गुंतवणूक करताना बऱ्याच भारतीय व्यक्तींना कोणत्याही प्रकारची अनिश्चितता नको असते, पण त्यांच्याच म्युच्युअल फंडातील बचतीदेखील इक्विटीमधील असतात. इक्विटीत गुंतवणूक केल्याने दीर्घ काळात मोठा फायदा होतो. पण अल्प कालावधीत बाजारातील चढउतारांमुळे गुंतवणूकदाराला तोटाही होऊ शकतो. सध्या बाजारातील परिस्थितीत अनेक चढउतार दिसून येत असल्याने गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांविषयी साशंक होऊ लागलेले आहेत. त्यामुळे स्वाभाविकच म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूकही कमी होऊ लागलेली आहे. भारतामध्ये म्युच्युअल फंड लोकप्रिय नसण्याचे हे एक कारण सांगता येईल. ऑगस्ट २०१३च्या अंतापर्यंत इक्विटी म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना १० वर्षांच्या कालावधीत सरासरी १५.४ टक्के दराने वार्षिक परतावा दिलेला आहे. इक्विटीमधील योजना दीर्घ कालावधीमध्ये मोठा फायदा करून देत असल्या तरी गुंतवणूकदाराकरिता इक्विटीशी संबंधित चढउतार हा इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्यात येणारा मोठा अडथळा वाटतो. अशा परिस्थितीत हायब्रिड फंड्स तुमची मदत करू शकतात.
हायब्रिड फंड म्हणजे काय हे ज्यांना ठाऊक नाही त्यांनी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की हे फंड इक्विटी, डेट (कर्ज रोखे) आणि काही वेळा सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. नियमित उत्पन्न पर्यायांत असणाऱ्या धोक्यांपेक्षा इक्विटीसारख्या मालमत्ता वर्गामध्ये धोके जास्त असतात. त्यामुळेच इक्विटी फंडांच्या तुलनेत त्यांच्यात गुंतवणूक केल्यास नुकसान होण्याची शक्यता कमी असते. पण त्याच वेळी गुंतवणूकदाराला परताव्याकरिता दीर्घकाळ वाट पाहावी लागते. उदाहरणार्थ आपण मागे नजर टाकली तर असे दिसते की एकच मालमत्ता वर्गवारी सर्व काळात उत्तम कामगिरी करताना दिसत नाही. एका कालावधीत उत्तम कामगिरी करणारा मालमत्ता वर्ग पुढच्याच कालावधीत अतिशय ढिसाळ कामगिरी करू शकतो. कधी-कधी असेही झालेले आहे की इक्विटी, कर्ज आणि सोने या तिन्ही मालमत्ता वर्गाची कामगिरी उत्तम झालेली आहे आणि मजेदार गोष्ट अशी आहे की सर्वच वेळी किमान दोन मालमत्ता वर्गवाऱ्यांची कामगिरी उत्तम झालेली आहे!
हीच पाश्र्वभूमी हायब्रिड फंडात गुंतवणूक करण्याचे फायदेही दर्शविणारी आहे. हायब्रिड फंड्समध्ये गुंतवणूक करण्याची प्रक्रिया अतिशय शिस्तशीर असते. यांत फक्त मालमत्ता वाटपच दर्शविले जाते असे नव्हे तर पूर्वनिश्चित वेळेस पोर्टफोलियो पुन्हा एकदा संतुलित करण्याचेही काम केले जाते. पुन्हा संतुलित करताना भांडवलात झालेली कोणतीही वृद्धी गुंतवणूकदाराला देऊ केली जात नाही. याचाच अर्थ असा की, गुंतवणूकदाराला व्यवसायांवर कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागत नाही. गुंतवणूकदारांना अनेक मालमत्ता वर्गवाऱ्यांचा शोध घेण्याची, अनेक वर्गवाऱ्यांमध्ये मालमत्ता वाटप करण्याची आणि प्रत्येक मालमत्ता वर्गवारीच्या बदलत्या किमतींचा माग ठेवण्याची गरज नाही. त्याऐवजी गुंतवणूकदाराला त्यांच्या सिंगल अकाऊंट स्टेटमेंटमध्ये नमूद केलेल्या फंडाच्या एकूण मालमत्ता मूल्याचा माग ठेवायचा आहे. त्यामुळे गुंतवणूकदाराला भेडसावणाऱ्या बऱ्याच गुंतागुंती कमी होणार आहेत. हायब्रिड फंड्समध्ये गुंतवणूक करण्याचा अजून एक फायदा म्हणजे की, इक्विटीत गुंतवणूक करणे वाटते तितके धोकादायक नाही हे गुंतवणूकदाराला आपसूकच कळत जाते. या फंडाच्या स्वरूपामुळे गुंतवणूकदार एक धडा शिकतो, तो असा की- ‘‘दीर्घ कालावधीमध्ये इक्विटी आणि इतर मालमत्ता वर्गवाऱ्यांच्या मेळ साधून गुंतवणूक करणे फायद्याचेच असते.’’ हायब्रिड फंड्स ही गोष्ट गुंतवणूकदाराच्या मनावर ठसवण्यास यशस्वी होतात.
(लेखक अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंड एएमसीचे   स्थिर उत्पन्न पर्यायाचे प्रमुख)
हायब्रिड फंड म्हणजे काय?
 हे फंड इक्विटी, डेट (कर्ज रोखे) आणि काही वेळा सोने अशी विविधांगी गुंतवणूक करतात. म्हणजे गुंतवणूकदारांना अनेक मालमत्ता वर्गवाऱ्यांचा शोध घेण्याची, अनेक वर्गवाऱ्यांमध्ये मालमत्ता वाटप करण्याची आणि प्रत्येक मालमत्ता वर्गवारीच्या बदलत्या किमतींचा माग ठेवण्याची गरज नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2013 8:40 am

Web Title: hybrid funds
Next Stories
1 गृहकर्ज हवे आहे? आधी मंजुरीचे निकष समजून घ्या!
2 पावत्या-कागदपत्रे गहाळ
3 पर्व ई-विम्याचे!
Just Now!
X