जेव्हा तुम्ही एखादे उत्पादन अथवा सेवा विकत घ्याल तेव्हा मनाशी एक प्रश्न नक्की विचारा ‘आज माझी गरज काय?’ जर विमा ही माझी गरज असेल तर मला नको असलेल्या गोष्टी मी का विकत घेतो? त्यासाठी मी किती शुल्क देतो? शुल्क आकारणीत पारदर्शकता आहे काय? म्हणूनच समर्थानी ‘अंतरपारख’, ‘विद्यावैभव’ व ‘उदासीनता’ या तीन गोष्टींची रामरायाकडे मागणी केली आहे. या तीन शब्दांतच गुंतवणूकदाराची आदर्श आचारसंहिता आहे, असे वाटते.
कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम
प्रसंग ओळख दे रे राम, धूर्तकळा मज दे रे राम
जनसुखकारक दे रे राम, अंतरपारख दे रे राम
बहुजनमत्री दे रे राम, विद्यावैभव दे रे राम
उदासिनतात दे रे राम, मार्गो नेणे दे रे राम
मज न कळेते दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम – समर्थ रामदास

वित्तीय नियोजनात नवीन संकल्पनांशी अनेकांचा प्रथमच परिचय होत असतो. त्या नियोजनात एखादी सेवा किंवा गुंतवणूकविषयक उत्पादनाची नेमकी त्या कुटुंबाला कशाची गरज होती व नेमके हेच उत्पादन का सुचविले याचे कारण ज्ञात झाले तर वाचनाचा आनंद द्विगुणित होईल. दुसरे कारण, अर्थनियोजन उत्सुकांनी या सदराकडे अर्थसाक्षरतेच्या दृष्टीने कसे पाहावे, हे जाणून घेता येईल. उद्या सर्वत्र रामजन्माचा उत्सव साजरा होत आहे. ‘तुजवीण रघुनाथ वोखटे सर्व काही’ अशी भावना असणाऱ्या समर्थानी महाराष्ट्रात रामभक्ती रुजवली. ज्या कुटुंबांत रामाची उपासना चालते, त्यांना वरील पावनभिक्षा नक्कीच पाठ असेल. गुंतवणूकदारांसाठी ‘अंतरपारख’, ‘विद्यावैभव’ व ‘उदासीनता’ हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत.

लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेत ‘हे करू शकता’ व ‘हे केल्यास’ आचारसंहितेचा भंग होतो यांची यादी दिलेली असते. रोजच आचारसंहिताभंगाचे गुन्हे नोंदविले जात आहेत व झालेली घटना कशी आचारसंहिता भंग करते अथवा नाही यावर वाद होत आहेत. अर्थनियोजनाच्या दृष्टीने गुंतवणूकदारांची आचारसंहिता कशी असावी, याचा वेध या सदरातून आपण जानेवारीपासून घेत आहोत. जानेवारीपासून सुरू झालेल्या ‘नियोजनभान’ या सदराने ११ भाग पूर्ण केले असून आजपर्यंत १० वाचकांचे अर्थनियोजन आपण जाणून घेतले.
कुटुंबाचे उत्पन्न व खर्च यांच्यानुसार कोणतेही कुटुंब सोबतच्या आकृतीत दर्शविलेल्या चारपकी एका प्रकारात मोडते. आजपर्यंत ज्यांचे वित्तीय नियोजन जाणून घेतले त्यांची प्रकारानुसार वर्गवारी आकृतीत दर्शविली आहे. ज्यांचे वित्तीय नियोजन करावयाचे ते यांपकी कुठल्या प्रकारात मोडतात हे ठरवावे लागेल. एखादी व्यक्ती सेवानिवृतीला आली असताना त्याचे अपत्याच्या शिक्षणाचे एखाद् दुसरे वर्ष शिल्लक असेल तर ते कुटुंब ‘घटते उत्पन्न – वाढते खर्च’ या प्रकारात मोडते. परंतु सेवानिवृती व त्याच वेळी अपत्य नोकरीला सुरुवात करत असेल तर ‘वाढते उत्पन्न घटते खर्च’ या प्रकारात मोडेल.
अनेक वाचकांचा गुंतवणूक सल्ला व आíथक नियोजन यांची गल्लत होते. उदाहरणार्थ – ‘जीवन सरल’ नोकरीला लागल्यावर लगेच २५व्या वर्षी व नोकरीची २५ वष्रे पूर्ण झाल्यावर वयाच्या ४७व्या वर्षी घेतली तर मुदतपूर्तीनंतर हातात पडणारी रक्कम वेगवेगळी असते. कारण वाढत्या वयात घेतलेल्या पॉलिसीच्या एकूण हप्त्याच्या विभाजनातून विमा व गुंतवणूक याच्यासाठी रक्कम कमी-अधिक होते. सेवानिवृत्तीचे वय ५८ असताना वयाच्या ४७व्या वर्षी १५ ते २० वर्षांची ‘एलआयसी पॉलिसी’ घेणाऱ्या अनेकांची रोजच गाठ पडत असते.
जानेवारीच्या पहिला भागात पुढील वाटचालीचा संकल्प मांडला होता. प्रस्तावनेच्या भागात ‘लोकसत्ता’चा सर्व स्तरांतील वाचकवर्ग समोर ठेवून हे सदर सुरू केल्याचे नमूद केले व वाचकांच्या भरघोस प्रतिसादामुळे ‘लेकरांच्या शिक्षणासाठी बचत करू पाहणाऱ्यां’पासून ते ‘बचतीत रोकड सुविधा असावी’पर्यंत प्रवास पार पडला. कुटुंबाच्या पाश्र्वभूमीनुसार पारंपरिक आवर्ती ठेव योजनांपासून ते आधुनिक ‘क्रिटिकल हेल्थ पॉलिसी’च्या उत्पादनांचा विचार केला. वर्षभरात ४० ते ४४ कुटुंबांचे अर्थनियोजन होईल, असा अंदाज आहे. या कुटुंबांची सामाजिक व आíथक पाश्र्वभूमी वेगवेगळी असेल व त्याला कुठलीही मर्यादा नसेल. फक्त एकच अट आहे ती म्हणजे ते कुटुंब ‘लोकसत्ता’चे वाचक असावे.
पहिले आíथक नियोजन प्रसिद्ध झाल्यापासून अनेक वाचकांची त्यातील संकल्पनांबद्दल विचारण्याने सुरुवात झाली. काहींच्या शंका गुंतवणूकविषयक होत्या तर काहींच्या ‘टर्म प्लॅन’बद्दलच्या. या शंका वाचून वाचकांच्या अर्थविषयक जाणिवा किती प्रगल्भ झाल्या आहेत हे पाहून समाधान वाटले. आलेल्या ई-मेलपकी बहुसंख्य ‘टर्म प्लॅन’ अथवा मुदतीचा विमा म्हणजे काय, याची विचारणा करणाऱ्या होत्या.
‘टर्म प्लॅन’ किंवा मुदतीचा विमा काय समजण्यासाठी एक उदाहरणाने पाहू. आपल्या पकी प्रत्येकाने कधी ना कधी तरी योग्य तिकिटाशिवाय प्रवास केलेला असतोच. शालेय वयात एक धाडस म्हणून, काही वेळेला अनवधानाने तर कधी तरी तिकीटाची लांब रांग टाळण्यासाठी व वेळेत पोहचण्याची घाई म्हणून तर काही वेळेला ‘रिझव्‍‌र्हेशन’ नाही म्हणून योग्य तिकीट काढणे टाळले आहे. अनेकदा विना तिकीट व तिकीट तपासनीसाने पकडल्याशिवाय इच्छित स्थळी पोहचलोही असतो. या प्रवासात अशा वेळी तिकीट नसताना पकडले गेलो तर.. हा विचार केलेला असतो. दंड भरायची मानसिक तयारी असते.
‘टर्म प्लॅन’ अथवा मुदतीचा विमा म्हणजे योग्य तिकीट काढून केलेला प्रवास! प्रवासात तिकीट तपासनीस आला तर योग्य तिकीट काढल्याचा फायदा. न आल्यास तिकीट काढल्याबद्दल प्रामाणिक प्रवासी म्हणून सत्कार वाटय़ाला येत नाही.

‘टर्म प्लॅन’ घेतला व काही दुर्दैवी घटना घडली तर फायदा होतो. जर सरळसोट आयुष्याची गाडी शेवटच्या स्टेशनवर पोहचली तर भरलेला विम्याच्या हप्त्याचा फुकट जातो, असा समज अनेक विमा एजंटानी करून दिला आहे. अनेक विमा एजंट हीच गोष्ट सांगून हा विमा घेण्यापासून परावृत्त करतात. हा विमा सर्वात स्वस्त असतो. ज्याला कोणाला जोखीम कमी करण्यासाठी विमा घ्यायचा असेल तर त्याने हाच विमा घ्यावा म्हणून प्रत्येकाला ‘टर्म प्लॅन’ विमा म्हणून घेण्याचा आग्रह असतो.
बऱ्याचदा विमा एजंट काही योजनांची शिफारस करतो. हल्ली कोणीही विमा व गुंतवणूक सल्लागार बनतो. सेवानिवृत्तीनंतर एक व्यवसाय म्हणून ‘वेल्थ प्लॅनर’ झालेले सल्लागार आजूबाजूला सहज नजरेस पडतात. अशा ‘गुंतवणूक सल्लागारांचा’ सल्ला घेणे म्हणजे ‘वॉर्ड बॉय’कडून शस्त्रक्रिया करून घेण्यासारखे आहे.
तेव्हा आपल्या गुंतवणूक सल्लागाराकडे योग्य अर्हता असल्याची खात्री करा आणि मगच आपले आíथक नियोजन करून घ्या. उदाहरणच द्यायचे तर सतीश पुसाळकरांना सुचविलेल्या १.५ कोटी रुपयांच्या व १२ वर्षे मुदतीच्या विमा छत्राचा वार्षकि हप्ता रु. ४५,०८० होता. तर याच विमाछत्रासाठी ‘न्यू अनमोल जीवन’चा वार्षकि हप्ता रु. ८१,७४२ पडला असता. जर तुमचा ‘वेल्थ प्लॅनर’ एलआयसीचा विमाविक्रेता असेल तर तो ‘न्यू अनमोल जीवन’च देणार. या दोन विमा हप्त्यांमध्ये का फरक आहे, याचा विमेदाराने विचार करायला हवा. ही अर्थसाक्षरतेची पहिली पायरी आहे.
जेव्हा तुम्ही एखादे उत्पादन अथवा सेवा विकत घ्याल तेव्हा मनाशी एक प्रश्न नक्की विचारा ‘आज माझी गरज काय?’ जर विमा ही माझी गरज असेल तर मला नको असलेल्या गोष्टी मी का विकत घेतो? त्यासाठी मी किती शुल्क देतो? शुल्क आकारणीत पारदर्शकता आहे काय? म्हणूनच समर्थानी ‘अंतरपारख’, ‘विद्यावैभव’ व ‘उदासिनता’ या तीन गोष्टींची रामरायाकडे मागणी केली आहे.
या तीन शब्दांत गुंतवणूकदाराची आदर्श आचारसंहिता आहे, असे वाटते. ‘अंतरपारख’ म्हणजे मला नेमकी कशाची गरज आहे? माझ्या फायद्याचे काय व तोटय़ाचे काय हे जाणणे. त्यासाठी ‘अंतरपारख’. माझी गरज भागविण्यासाठी कुठली उत्पादने व सेवा उपलब्ध आहेत व त्यांपकी सर्वात योग्य उत्पादन कोणते यासाठी ‘विद्यावैभव’ व विक्रेत्याच्या कोणत्याही भूलथापेला न भुलणे यासाठी ‘उदासीनता’. म्हणून आजची सुरुवात समर्थाच्या पवनभिक्षेने केली.