‘लोकसत्ता – अर्थब्रह्म’च्या प्रकाशनानिमित्त आयोजित गुंतवणूकदार मार्गदर्शक मेळाव्याची हाक!
गुंतवणुकीच्या विविध अंग-उपांगांविषयी परिपूर्ण मार्गदर्शक ‘लोकसत्ता-अर्थब्रह्म’ या वार्षिकांकाचे प्रकाशन शुक्रवारी वाचकांच्या भरगच्च गर्दीत पार पडले. गुंतवणुकीचे पर्याय समजावून सांगण्याबरोबरच, जोखीमेबाबत सावधगिरीचा कानमंत्रही प्रकाशनानिमित्त आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात तज्ज्ञ वक्त्यांकडून देण्यात आला. आजच्या जीवनशैलीचा अत्यावश्यक भाग बनलेल्या कर्ज आणि त्यासाठी आपली पात्रता ठरविणारी पत सांभाळताना करावयाच्या उपाययोजनांचा सार ‘सिबिल’ या ऋण संदर्भ संस्थेच्या ग्राहक संबंध विभागाच्या प्रमुख आणि वरिष्ठ उपाध्यक्षा हर्षदा चांदोरकर यांनी मांडला. गुंतवणुकीसाठी स्वत:चा अभ्यास, त्यासाठीची शिस्त आणि गुंतवणुकीबाबतचा ध्यास अंगिकारला तर आपण यशस्वी होऊ शकू, असा यशाचा फॉम्र्युला ‘फिनिक्स आर्क’चे कंपनी सचिव आणि ‘अर्थ वृत्तान्त’चे स्तंभलेखक अजय वाळिंबे यांनी सांगितला. गुंतवणूक हा एक छंद बनावा; त्याची आवडीने जोपासना केली जावी, असे ‘गोखले अॅण्ड साठे अकाऊंटंट्स’चे भागीदार आणि ज्येष्ठ सनदी लेखापाल जयंत गोखले यांनी उपस्थित श्रोत्यांना सुचविले. ‘लोकसत्ता’च्या वाचकांनीही या मार्गदर्शन मेळाव्यासाठी उत्स्फुर्त गर्दी जशी केली, तशी तज्ज्ञांकडून निरसनासाठी प्रश्नांची सरबत्तीही केली. वक्त्यांनी विविध पैलूंची अभ्यासपूर्ण मांडणी केल्यानंतर विचारलेल्या प्रश्नांना तितकेच अर्थपूर्ण उत्तरे प्रेक्षकांचे उद्बोधन केले. दादरच्या शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात दोन तासांहून अधिक वेळ चाललेल्या या मेळाव्याचा हा वृत्तान्त..

कर्जफेडीची शिस्त महत्त्वाची
–  हर्षला चांदोरकर
एक काळ असा होता की, कर्ज म्हणजे नसते आर्थिक ओझे आणि कर्ज मिळण्याबद्दलही आपल्या मनात शंका असे. पण सध्या कोणत्याही आर्थिक नियोजनात कर्जाचा घटक आता अपरिहार्यच ठरत आहे. गृहकर्जासाठी तर प्राप्तिकरातून वजावटीचे लाभ आकर्षणाची बाब बनली आहे. शिवाय बदलत्या जीवनशैलीत, ग्राहकवादाचा परिणाम म्हणून घराची सजावट, परदेश भ्रमंती, शिक्षण आदींबरोबरच अगदी घरातील छोटय़ा-मोठय़ा चीजवस्तूंसाठीही कर्ज घेणे अनिवार्य होऊन बसले. अशा विविध कर्जदारांची माहिती आता ‘सिबिल’च्या माध्यमातून एकाच अहवालात मिळत असल्यामुळे बँकांही त्वरेने कर्ज मंजूर करतात. कर्जदार म्हणून आपली पत सांगणारा ‘सिबिल रिपोर्ट’ आता लोकांना बऱ्यापैकी परिचित आहे. सर्वच बँका व वित्तसंस्थांनी कर्जविषयक पात्रतेचा निकष म्हणून त्याला मान्यता दिली असल्याने या अहवालातील पत म्हणजे ‘क्रेडिट स्कोअर’ जेवढा चांगला तितकी भविष्यात कर्ज मिळण्याची शक्यता अधिक असते. कर्जदारांच्या परतफेडीत सातत्य असेल तर बँकाही स्वत:हून अनेक लाभ कर्जदारांना देऊ करतात. तुमचे पत गुणांक चांगला नसेल तरी भीतीचे कारण नाही. क्रेडिट कार्डावर केल्या गेलेल्या खर्चाची नियमित भरपाई करून तो वाढविण्याची संधीही असते. मात्र घेतलेले कर्ज वेळेत फेडण्याची, नियमित मासिक हप्ते भरण्याची शिस्त आपण अंगिकारलीच पाहिजे. जमेची बाब म्हणजे खुद्द कर्जदारही आता आपल्या पत गुणांकाबाबत अधिक जागरुक झाला आहे. तो स्वत: गुणांकात सुधार करून घेण्यासही उत्सुक असल्याचे दिसून येते,

जोखीम-परतावा समज हवी
–  अजय वाळिंबे
शेअर बाजारात गुंतवणूक करताना, हा बाजार नेमका कसा चालतो हे समजावून घेतले तर या गुंतवणूक पर्यायाबद्दल आपोआपच आवड निर्माण होईल. बाजारातील खरेदी-विक्री व्यवहारात भावनेला कोणतेही स्थान असता कामा नये. उलट भावनेवर चालणाऱ्या बाजाराचा फायद्यासाठी उपयोग करून घेता आला पाहिजे. एकूणच शेअर बाजारातील गुंतवणूक आणि एक एक शेअर जोडून आपला पोर्टफोलियो तयार करण्याची मानसिकता मराठी माणसाने बनविण्याची गरज आहे. गुंतवणुकीबाबतचे एकदा ‘टार्गेट’ ठरविले तर ते पाळायलाही हवे. अनेकदा मोठय़ा परताव्याची अपेक्षा ठेवली तर त्यासाठी स्वीकारावी लागणारी जोखीमही मोठीच असते. बाजारातील तोटय़ाला पायबंद घालणाऱ्या ‘स्टॉप लॉस’चे कटाक्षाने पालन केले, तर गुंतवणुकीत धोक्याची शक्यता टाळता येईल. जसे चित्र रंगविले जाते तसे शेअर बाजारातील गुंतवणुकीतून नेहमीच मोठी मिळकत झटपट मिळत नसते. वर्षांला २० ते २५ टक्क्यांपर्यंतचा लाभदेखील सरसच म्हणायला हवा. कंपन्यांचे समभाग निवडताना, त्यांची खरेदी अथवा विक्री करताना कुणाचे काही तरी ऐकण्यापेक्षा, स्वत: माहिती घेऊन, त्याविषयीचा अभ्यास करूनच शेअर बाजारात गुंतवणूक करावी. ज्या कंपन्यांच्या समभागांत आपल्याला गुंतवणूक करायची आहे त्यांचा ताजा ताळेबंद नक्कीच डोळ्याखालून घालावा. आपला पोर्टफोलियो तयार करताना कंपन्यांची निवड चोखंदळ असावी. शक्यतो १५ पेक्षा जास्त कंपन्यांचे शेअर्सच नसावेत आणि हे शेअर्सही विविधांगी उद्योगक्षेत्रातील असावेत. मुख्य म्हणजे तुम्हाला परिचित असलेल्या उत्पादन-सेवा देणाऱ्या कंपन्यांचे समभाग निवडल्यास, त्यांच्या व्यावसायिक प्रगतीबद्दल आपोआपच आस्था आणि आवड निर्माण होईल.

केवळ कर वाचविणे गुंतवणुकीचा उद्देश नसावा!
–  जयंत गोखले
गुंतवणूक करताना आपण नेहमी आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर आणि कोणत्या परिस्थितीत आहोत, याची जाणीव ठेवली पाहिजे. वयोमानापरत्वे गुंतवणुकीचे नियोजन बदलत राहिले पाहिजे. सुरुवातीच्या कमावत्या वयात, कुटुंबाची फार मोठी जबाबदारी नसताना शेअर बाजारावर जास्तीत भर असायलाच हवा. मात्र वय जसे वाढत जाते, तशी उत्पन्नाची मात्रा वाढते, बरोबरीने खर्च व जबाबदाऱ्याही वाढतात. अशा वेळी स्थिर उत्पन्न देणाऱ्या विविध कर्जरोख्यांकडे गुंतवणुकीचे वळण महत्त्वाचे ठरेल.  आपल्या गुंतवणुकांना १० ते १५ वर्षांचा कालावधी देण्याचे बंधन आपण पाळायलाच हवे. निश्चित केलेल्या आर्थिक उद्दिष्टानुरूप, काळ लक्षात घेऊन विविध स्थिर प्रकारच्या गुंतवणूक पर्यायांचा विचार करावा व त्यानुरुप निर्णय घ्यावा. एकदा का आपले जीवन आर्थिकदृष्टय़ा स्थिर आहे असे वाटू लागले की, ज्या प्रमाणात कर वाचतो आहे त्याप्रमाणात बचत व गुंतवणुकीची सवय लावून घ्यावी. मात्र कोणत्याही परिस्थितीत केवळ कर वाचविण्यासाठी गुंतवणुकीचा निर्णय घेणे चुकीचे ठरेल. कर वाचविण्याबरोबरच नियोजित खर्चाचा ताळमेळ साधायचा आहे, हे तारतम्य विसरून चालणार नाही. जो प्रकार माहितीचा नाही, जोखमीचा वाटत असेल त्यात गुंतवणूक करण्याचे टाळावे. गुंतवणुकीचे तीन वेगवेगळ्या पर्यायांत विभाजन करून वैविध्य जपल्यास नुकसानीची शक्यता बरीच कमी होते. गुंतवणूक ही कटकटीची न राहता एक छंद म्हणून नक्कीच जोपासायला जायला हवी आणि जो छंद आपण जोपासतो त्याबद्दल आपल्या मनांत जिज्ञासा व ध्यास कायम असतेच. शेअर बाजारात आपण नेहमी गुंतवणूकदाराच्या भूमिकेत असावे, ‘ट्रेडर’ म्हणून भूमिका वटवू नये. या गुंतवणुकीचेही व्यसन होऊ देता कामा नये. संयम, सबुरी कायम हवी. बाजाराच्या अधिक आहारी जाऊ नये. आपल्या उद्दिष्टाबद्दल नेहमी जागरुक राहावे. प्रवाहात वाहत जाणे आपल्याला परवडणारे नाही, हेही जाणून घ्यावे. आपण किती प्रमाणात आणि कुठवर तोटा सहन करू शकतो, याची जाणीव ठेवावी. या गुंतवणुकीत नुकसान होत असेल तर तो भरून काढणारे इतर पर्याय आपण सज्ज ठेवले आहेत काय, हेही पाहिले पाहिजे. व्यक्तिगत आर्थिक नियोजन ज्याला म्हणतात, ते यापेक्षा वेगळे काही नसते. गुंतवणुकीचा छंद जोपासताना आपण त्याला आवर्जून तेवढा वेळही दिला पाहिजे. अपेक्षित तेवढा लाभ झाल्याचे पाहण्यासारखे मग दुसरे सुख नसेल.