News Flash

गणित नवीन ‘उच्चांका’चे?

किराणा व्यापार, विमा, पेन्शन, हवाई क्षेत्रामध्ये विदेशी गुंतवणुकीला चालना काय किंवा ज्याला आर्थिक सुधारणा म्हणता येईल अशा काही रखडलेले निर्णयांबाबत सप्टेंबरपासून केंद्रातील सरकारने धडाडी दाखविली.

| November 26, 2012 12:36 pm

किराणा व्यापार, विमा, पेन्शन, हवाई क्षेत्रामध्ये विदेशी गुंतवणुकीला चालना काय किंवा ज्याला आर्थिक सुधारणा म्हणता येईल अशा काही रखडलेले निर्णयांबाबत सप्टेंबरपासून केंद्रातील सरकारने धडाडी दाखविली. हे केवळ निर्णय त्यांची अंमलबजावणीची हीच खरी कसोटी, या साशंकतेलाही आता फारसा वाव राहिलेला नाही. विरोधकांचा फुसका ‘जोर’ पाहता संसदेच्या विद्यमान हिवाळी अधिवेशनात प्रत्यक्षात या निर्णयांवर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे परदेशस्थ संस्थात्मक गुंतवणुकीवरील करप्रणाली ‘गार’च्या अंमलबजावणीला पुढे ढकलण्यात आले आणि सर्व चांगल्या बातम्यांमध्ये दुग्धशर्करा योग उशिराने का होईना पण पुरेशा झालेल्या पावसाने साधला. या सर्व चांगल्या बातम्यांचा एकत्रित परिणाम म्हणून येणाऱ्या दिवसात निर्देशांकाची वाटचाल कशी असेल, असा वाचकांपुढील स्वाभाविक प्रश्न असेल. तांत्रिक विश्लेषणाच्या अंगाने ते समजावून घेऊ या. ‘ईलियट वेव्ह’ आणि ‘डो थिअरी’ या संकल्पनाच्या आधारे निर्देशांकाचा आगामी प्रवास समजून घेता येईल.
‘डो संकल्पना’
भांडवली बाजारात एखादी धारणा निर्माण झाली मग ती तेजीची असो अथवा मंदीची असली तरी, तिचा परिपाक म्हणून दोन शक्यता दिसून येतात. आगामी १२ महिन्यात आपल्याला तेजीच्या बाबतीत उच्चांक, तर मंदीच्या बाबतीत नीचांक पाहायला मिळतो. तेजीच्या बाबतीत आलेखाची रचना ही चढत्या भाजणीतील उच्चांक व नीचांक (हायर टॉप, हायर बॉटम) दाखवीत जाते. त्याच्या बरोबर उलट मंदीच्या धारणेत उतरत्या क्रमाने उच्चांक व नीचांक ही संकल्पना असते.
बरोबर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये (अचूकपणे सांगायचे झाल्यास २० डिसेंबर २०११ रोजी) निफ्टी निर्देशांकाने ४५३१ चा नीचांक गाठून त्या वर्षीच मंदीचे आवर्तन संपविले आणि बाजाराची तेजीची धारणा सुरू झाली. असे आता ठामपणे सांगता येईल. या तेजीच्या धारणेला पुढच्या महिन्यात एक वर्ष पूर्ण होईल. म्हणजे तेजीच्या प्रवाहाने शेवटच्या टप्प्यात प्रवेश केला आहे, असे म्हणता येईल. तेव्हा सुरुवातीलाच व्यक्त केल्या गेलेल्या शक्यतेप्रमाणे संभाव्य उच्चांक येणाऱ्या दिवसात दिसायला हवा. तो काय असेल ते जाणून घेऊया.
या ठिकाणीही आपण दोन शक्यतांचा विचारात घेऊयात
शक्यता क्रमांक १ :
निफ्टी निर्देशांक ५,५५० चा आधार घेऊन किती वर उसळी मारेल आणि संभाव्य उच्चांक दाखवेल?
शक्यता क्रमांक २ :
गेल्या आठवडय़ातील ५,५५० चा आधार तोडून निर्देशांक ५,४०० पर्यंत घसरला तर अशा स्थितीत त्याचा उच्चांक काय असेल?
निफ्टी निर्देशांकाने ५,५५० चा आधार घेऊन वरची उसळी मारली तर पहिला अडथळा हा ५,८००चा असेल. एकदा का हा अडथळाही दूर झाला, तर निर्देशांक ५,९५० ते ६,०५० पर्यंत मजल मारताना दिसेल. तेजीच्या उधाण वाऱ्यात ६,१५० ची देखील शक्यता नाकारता येत नाही. पण या सर्व पातळ्यांपैकी ५,९५० ते ६,१५० या २०० अंशांच्या फरकात सामान्य गुंतवणूकदारांनी आपल्या पदरात फायदा पाडून घेणे इष्ट ठरेल. कारण सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे तेजीचे अंतिम पर्व आहे आणि त्यापुढे बाजाराला (फेब्रुवारी २०१३ पश्चात) घातकी उतारांना सामोरे जावे लागणार आहे.
दुसऱ्या शक्यतेप्रमाणे सरलेल्या आठवडय़ातील ५,५५० चा भरभक्कम आधार  तोडून, निफ्टी निर्देशांक त्या पातळीखाली आठवडाभर राहिला तर, निफ्टी निर्देशांकाची ५४०० पर्यंत घसरण दिसून येते. त्यापुढे क्षीण स्वरूपातील उसळीतून फार तर ५८०० चा उच्चांक दिसून येतो.
सारांशात, वाचकांनी ५,५५० च्या पातळीवर नजर ठेऊन गुंतवणूक करावी. या पातळीवरच नवीन उच्चांकाचे गणित आधारलेले आहे.
एकूणात, ५८०० च्या आसपास अथवा त्या पुढील उच्चाकानंतर गुंतवणूकदारांना घातक उतारांना सामोरे जावे लागणार, या निष्कर्षांची पुष्ठी करणारे कारणे :
१. तांत्रिक विश्लेषणात ‘इतिहासाची पुनरावृत्ती’ या संकल्पनेला फार महत्त्व आहे. आजवरच्या इतिहासात बाजाराचा उच्चांक अथवा नीचांक साधारणत: नोव्हेंबर, डिसेंबर किंवा जानेवारी या महिन्यांदरम्यान दिसतो असे निरीक्षण आहे. याची ताजी उदाहरणेच पाहा. अमेरिकेतील आणि पर्यायाने जागतिक महामंदीच्या अगोदर बरोबर १० जानेवारी २००८ ला निफ्टी निर्देशांकाने ६,३५७ चा आणि मुंबई शेअर बाजाराच्या ‘सेन्सेक्स’ निर्देशांकाने २१,२०६ चा (सार्वकालिक उच्चांक) स्थापित केला. नेमके त्यानंतर बाजारात घातकी उतार दिसून आला. पुढे ऐन दिवाळीत म्हणजे ५ नोव्हेंबर २०१० रोजी सेन्सेक्सने पुन्हा २१ हजाराला गवसणी घातली आणि २१,१०८ असा उच्चांक मारला. निफ्टीचा ४,५३१ चा आणि सेन्सेक्सचा १५,१३५ चा नीचांकही २० डिसेंबर २०११म्हणजे डिसेंबर महिन्यातलाच आहे.
२. फेब्रुवारी २०१३ चा अर्थसंकल्प हा निवडणूकपूर्व शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. त्यामुळे आर्थिक शिस्त बाजूला ठेऊन लोकानुनन्याच्या योजनांवर सरकारचा भर राहणार. यातून आर्थिक तूट आणखीच वाढणार आणि अर्थव्यवस्थेमागील दुष्टचक्र पुढे चालूच राहणार.
३. डॉलरचा आलेख भारदस्ततेचे संकेत देत आहे. जोवर डॉलर-रुपया विनिमय दर ५५ च्या पातळीवर आहे, तोवर बाजाराची तेजीची धारणा कायम राहणार. जून २०१२ मध्ये डॉलर-रुपया दर ५७ ला पोहचला होता तेव्हाच किती तारांबळ उडाली होती, हे गुंतवणूकदारांच्या स्मरणात असेल. आता तर अनेक विश्लेषकांनी २०१३ मधील रुपयाचा प्रति डॉलर दर ६० असेल असे भाकीत केले आहे. परदेशस्थ गुंतवणूकदारांनी हात आखडता घ्यावा ही याची थेट परिणती असेल.
४. गेल्या दोन-तीन वर्षांत अब्जावधी डॉलरची मदत करूनही आजार बरा होत नाही आणि हात पसरण्याची वृत्तीही संपत नाही, अशी युरोपातील अनेक राष्ट्रांची स्थिती आहे. युरोपचे हे वित्तीय नष्टचर्य नक्की केव्हा संपणार, हे आता ज्योतिषमरतडानेच सांगावयाचे बाकी राहिले आहे, इतकी त्या विषयी संभ्रमाची स्थिती आहे.
५. अमेरिकेची आर्थिक तूट (अर्थसंकल्पीय तूट) कमी करण्यासाठी ओबामा सरकार कठोर आर्थिक-उपाययोजना करण्याची शक्यता आहे. ‘फिस्कल क्लिप’ अशा नामाभिधानाने त्याची सध्या चर्चाही सुरू आहे. याचा फटका अमेरिकेशी संलग्न भारतीय उद्योगधंद्यांना बसण्याची शक्यता आहे.
६. सप्टेंबरमध्ये झालेल्या आर्थिक सुधारणांच्या घोषणांना वास्तविक रूप मिळायचे तर ते सध्या चालू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनातूनच दिले जाईल. आर्थिक सुधारणांच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले हे संसदेचे सत्र आधीच्या अनुभवाप्रमाणेच गोंधळ-गदारोळ-सभात्याग यातच संपुष्टात आले. तर तो बाजारासाठी घोर नकारात्मक संदेश असेल.
७. ऑक्टोबरच्या तिमाही पतधोरण आढाव्यात व्याजदरात कपातीच्या आशा रिझव्‍‌र्ह बँकेने फोल ठरविल्या. यापुढे रिझव्‍‌र्ह बँकेचा हा ‘जैसे थे’ पवित्रा एकूणच न सोसवणारा आणि मुख्यत: बाजारभावनांना गंभीर इजा पोहचविणारा ठरेल.
या विवेचनातील दोन्ही शक्यता जमेच्या असल्या तरी अंतिम परिणाम चिंतीत करणारा आहे. येणाऱ्या दिवसातील नवीन उच्चांक गुंतवणूकदारांना निश्चितच खुणावत आहे. परंतु ती त्याला मिळणारी अमोल संधीही असेल. त्यामुळे आपल्या वित्तीय सल्लागाराशी चर्चा-मसलत करून संभाव्य उच्चांकासरशी हाती असलेले समभाग विकून फायदा पदरात पाडून घ्या. नवीन वर्ष भरभराटीचे असलेच तर प्रसंगानुरूप नवीन गुंतवणूक-संकल्प करता येईल. पण मावळत्या वर्षांला निरोप पदरी काहीसा परतावा घेऊनच करणे इष्ट ठरेल.     
‘अर्थ पूर्ण’ हे जयंत विद्वांस यांचे नियमित सदर काही अपरिहार्य कारणांमुळे आज प्रसिद्ध करता आलेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2012 12:36 pm

Web Title: mathematic of new height
Next Stories
1 माझा पोर्टफोलियो : देशाचे चार-चाकी भवितव्य!
2 गुंतवणूकभान : असला उदासीन बाजार तरीही..
3 मुलाखत / शेअर बाजार : आगामी वर्ष भरभराट आणि नव्या उच्चांकाचे!
Just Now!
X