News Flash

तर निफ्टी १०,००० सहज साध्य!

मागील गुरुवारच्या कामकाजाचे सत्र बंद होताना निफ्टी ६२९९.१५ या पातळीवर बंद झाला. गुरुवारचा दिवस हा ऑक्टोबर महिन्यातील फ्युचर्स व ऑप्शन्स सौद्यांचा शेवटचा दिवस तर होताच

| November 4, 2013 12:04 pm

मागील गुरुवारच्या कामकाजाचे सत्र बंद होताना निफ्टी ६२९९.१५ या पातळीवर बंद झाला. गुरुवारचा दिवस हा ऑक्टोबर महिन्यातील फ्युचर्स व ऑप्शन्स सौद्यांचा शेवटचा दिवस तर होताच परंतु त्या महिन्यातील कामकाजाचा शेवटचा दिवस होता. तांत्रिक विश्लेषकांना महिन्याच्या शेवटच्या दिवसाच्या बंद भावाचे विशेष महत्व असते. कारण तांत्रिक विश्लेषकांचे महिन्याचे आलेख या बंद झालेल्या आकड्यावर बनतात. मागील गुरुवारचा बंद हा महिन्याच्या शेवटच्या दिवशी बंद झालेला निफ्टीचा सार्वकालिक उच्चांक होता. या आधीचा उच्चांक डिसेंबर २००७ मध्ये ६१३८.६० होता. पुढे जानेवारीपासून बाजाराची घसरगुंडी सुरू झाली. त्यामुळे बाजार इथून या आधीचे शिखर सर करून नवीन शिखराच्या दिशेने वर जाणार की डिसेंबर २००७ ची पुनरावृती होणार हा प्रश्न अनेकांना सतावत आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधून काढण्यासाठी ‘लोकसत्ता अर्थवृत्तांत’ने तांत्रिक विश्लेषकांशी संपर्क साधला. व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीनुसार जितके विश्लेषक तितकी लक्ष्ये असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
सर्व विश्लेषकांचे एका मुद्दय़ावर एकमत झाले. ते म्हणजे ६३३८च्या पातळीवर निफ्टीला मोठा अडथळा आहे. तो पार करणे महत्वाचे आहे. (हा अडथळा रविवारी होणाऱ्या सायंकालीन मुहूर्ताच्या विशेष सत्रात निफ्टी पार करेल अशी अशा वाटते. (लेखाचा मजकूर त्या आधीचा हे कृपया लक्षात घ्यावे) पुन्हा जेव्हा नवीन वर्षांत (सवंत्सरात) कामकाज सत्राला प्रारंभ होऊन ८ नोव्हेंबरची बंद पातळी पुढील एका महिन्याच्या कामकाजाची दिशा ठरवेल. ६३३८ अडथळा पार करायला निफ्टीला किती कष्ट पडतात हेही पहावे लागेल. बरेचदा मोठा अडथळा पार करताना दोन तीन वेळा प्रयत्न करावे लागतात. निफ्टीला हा अडथळा नुसता नावापुरता पार करून भागणार नाही हा अडथळा पार करायला किती कष्ट पडतात व कितव्या प्रयत्नात हा अडथळा पार होतो हेही अडथळा पार करण्याइतकेच महत्वाचे आहे.
नोव्हेंबर महिन्याचा विचार केला तर बहुसंख्य विश्लेषकांनी ६३३८-६१०० या पट्टयात निफ्टी राहील असे संकेत दिले आहेत. निफ्टीच्या आलेखावर सध्या नकारात्मक उतार दिसत आहे. हे स्वाभाविकच आहे. कारण २८ ऑगस्ट २०१३ रोजीचा ५,११८.८५ बंद ते ३१ ऑक्टोबर २०१३ चा बंद ६२९९.१५ ही ११८०.३० अंशांची कमाई निफ्टीने ज्या वेगात केली ते पाहता निफ्टीने एक डुबकी मारणे स्वाभाविकच आहे. ही डूबकी नक्की केव्हा व किती अंकांची असेल याबद्दल मतमतांतरे आहेत. ही दिवाळी विक्री करून नफा कमावून साजरी करावी. नवीन खरेदीसाठी थोडा वेळ थांबून नंतरच विचार करावा अगदी जवळच्या काळात ५८००-५७०० पर्यंत निफ्टी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर काही विश्लेषकांच्या मते बाजारातील उलाढाल पाच लाख कोटींहून अधिक झाली आहे. तेव्हा अजून ३-५% निफ्टी वर जाण्यास वाव आहे. निफ्टीचा आरएसआय ६७ आहे. त्यामुळे व १५ दिवसांची सरासरी ६१८४ आहे. त्यामुळे एक दोन दिवसात निफ्टी ६३८०-६४०० पर्यंत गेला तरी नफावसुलीमुळे निफ्टी घसरण्याचीच शक्यता अधिक आहे. तर निफ्टीची ५० दिवसांची चलत् सरासरी ८९०५ आहे. सध्याची पातळी धोकादायक नसली तरी नवीन खरेदीसाठी आकर्षक आहे असे म्हणता येणार नाही. शुक्रवारचा बंद हा ५० दिवसांची चलत सरासरीपेक्षा (जी मध्यम काळाची दिशा दर्शवते) ९.३२% वर आहे. या पातळीवर दोन गोष्टी संभवतात. पहिली म्हणजे या पातळीवर निफ्टी दीर्घ काळ रेंगाळत राहील अथवा निफ्टी इथून घसरेल. जेणेकरून ५० दिवसांची चलत सरासरी व निफ्टीची पातळी यांच्यातील अंतर कमी होईल. निफ्टी ६१००-६३०० या पट्टयातच रेंगाळण्याची शक्यता अधिक आहे.  निदान जानेवारी २०१४ पर्यंत तरी ५९००-६३५० या पट्टयात राहील.
सध्या जाहीर झालेल्या चार राज्यांच्या व पुढील सहा आठ महिन्यात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका निफ्टीत मोठे चढ-उतार होण्याचे संकेत देतो. निफ्टीत जसे चढ-उतार होत जातील तशी तांत्रिक परिणामे बदलत जातील तेव्हा एका वर्षांनंतरचे लक्ष्य आजच ठरविणे धाडसाचे ठरेल तरी पुढील दिवाळीत निफ्टी ६५००-६८०० दरम्यान राहील असे म्हटले तर योग्य ठरेल.  
अमेरिकेत ‘क्यूई थ्री’ कार्यक्रमात माघार अथवा टेपिरग, देशांतर्गत निवडणुका या गोष्टी निफ्टीवर परिणाम करतीलच. निफ्टीने या आधीचे नवीन उच्चांक १९९२, २०००, २००८ साली गाठले. आíथक आवर्तन साधारण आठ वर्षांचे असते. २००८ ते २०१३ या काळात भारतीय बाजारांनी मंदी अनुभवली इथून पुढे भारतीय बाजार तेजीच्या दिशेने वाटचाल सुरु करतील. २०१५ किंवा २०१६ च्या दिवाळीत निफ्टी १०,०००ची पातळी सर करताना दिसेल. त्यामुळे गुतवणूकदारांनी थोडा लांबचा विचार करून खरेदी करावी. निफ्टीचे संकेत चांगलेच आहेत असे म्हणावे लागेल.  
२०१६ च्या दिवाळीत निफ्टीने  १०,००० पातळी दाखवायला काहीच हरकत नाही.
– सचिन मुळे,  तांत्रिक विश्लेषक,  मुंबई

निफ्टी या पातळीवर काही काळ रेंगाळेल इथून वर जाण्यापूर्वी पाया मजबुत करण्याचा प्रयत्न करेल लगेच नवीन उच्चांक गाठला नाही तरी जानेवारी पासूनच्या नवीन वर्षांत एकच नव्हे तर अनेक नवीन उच्चांक टप्प्याटप्याने गाठेल.
– संगीता चोप्रा. वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक ,फिनक्वेस्ट सिक्युरिटीज् (प्रा) लिमिटेड

*    विश्लेषकांची   ठळक निरीक्षणे:

–  निफ्टीला ६३३८ च्या पातळीवर मोठा अडथळा
–  नोव्हेंबरमध्ये ६३३८-६१०० या पट्टयात निफ्टी राहील
–  सध्याची पातळी धोकादायक नसली तरी नवीन खरेदीसाठी आकर्षक आहे असे म्हणता येणार नाही.
–   २०१५ किंवा २०१६ च्या दिवाळीत निफ्टी १०,०००ची पातळी सर करताना दिसेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2013 12:04 pm

Web Title: then nifty will also go over 10000
टॅग : Nifty,Sensex
Next Stories
1 गुंतवणूक फराळ
2 सर्वे सन्तु निरामया:
3 गुंतवणूक फराळ
Just Now!
X