27 September 2020

News Flash

थ्री बकेट्स

रेमंड जे. लुसिआ यांनी त्यांच्या ‘बकेट्स ऑफ मनी’ या पुस्तकात हा विषय खूप चांगल्या पद्धतीने मांडला आहे.

|| जयंत विद्वांस

निवृत्तीनंतरची गुंतवणूक करण्यापूर्वी आपले उत्पन्न-खर्च, मालमत्ता-देणी यांची मांडणी कशी करावी येथपर्यंत आपण या स्तंभातील लेखांमधून आजवर आलो आहोत. आता प्रत्यक्ष गुंतवणूक कशी करावी हे पाहू या.

रेमंड जे. लुसिआ यांनी त्यांच्या ‘बकेट्स ऑफ मनी’ या पुस्तकात हा विषय खूप चांगल्या पद्धतीने मांडला आहे. विषयाचे भारतीयीकरण करून आपल्या येथील गुंतवणूक संधी विचारात घेऊन मांडणी करतो. आपण गुंतवणूक करताना तीन प्रकारांत करतो. (अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन) आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर हे अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन आवश्यक आहे. रेमंड लुसिआ याला थ्री बकेट्स म्हणतात. या तीन बास्केटमध्ये तुमच्या गुंतवणुका विभागून ठेवा. गुंतवणूक विभाजन (अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन) अजून वेगळे काय? निवृत्तीनंतरसुद्धा काही भाग ‘अ’ प्रकारात आवश्यक आहे. नव्वद टक्के निवृत्ती नियोजनासाठी येणारे लोक, ‘‘आमच्या आयुष्यभर कमाईची पुंजी आहे, आम्हाला कसलीच जोखीम घ्यावयाची नाही.’’ सर्व पसे ‘ब’ बास्केटमध्ये गुंतवा,’’ असे सांगतात. वयपरत्वे औषधोपचारासाठी लागले तर म्हणून मोठी रक्कम बचत खात्यावर ठेवतात.

माझ्याकडे आलेल्या सत्तर वष्रे वयाच्या गृहस्थाने एका लहान सहकारी बँकेत सत्तर लाख ठेव स्वरूपात ठेवले होते. बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले आम्ही डिपॉझिटवर ९ टक्के व्याज देतो; पण लाभांश १२ टक्के देतो- म्हणून १५ लाख रुपयांचे शेअर्स घेतले होते. शेअर्सवर कर कापला जात नाही म्हणून खुशीत होते. मिळणाऱ्या एकरकमी दीड लाख परताव्यावर भारतदर्शनाची सहल बेतलेली असे. यात जोखीम काय? असे मला विचारत होते. आपल्या दुर्दैवाने बँक बुडाली तर! असे विचारल्यावर. ‘डिपॉझिट इंशुरन्स असतो ना?’ म्हणाले. फक्त एक लाखाचा असतो म्हटल्यावर हृदयाचे ठोके वाढायला लागले.

बहुतेक लोकांना दरमहा मिळणाऱ्या पगाराइतके व्याज पेन्शन स्वरूपात मिळावे, ही अपेक्षा असते. पूर्वी करत असलेल्या एसआयपी तशाच चालू ठेवायच्या असतात. ट्रिपला जाण्यासाठी बँकेत एक वर्षांचे आवर्ती जमा खाते उघडलेले असते आणि या व्यापातून बाहेर पडण्याची तयारी नसते.

याऐवजी गुंतवणूक करताना आपल्या मासिक खर्चाचा अंदाज घ्या. पूर्वीच्या गुंतवणुकांचा आढावा घ्या आणि येणारी ग्रॅच्युइटी, प्रॉव्हिडंड फंड, शिल्लक रजेची रक्कम या सर्व रकमा अधिक पूर्वीची गुंतवणूक तीन बास्केटमध्ये अ-३० टक्के, ब- ४० टक्के, व क- ३० टक्के  अशी गुंतवा.

समजा निवृत्तीच्या क्षणी तुमच्या जवळ येणारी रक्कम व पूर्वीच्या गुंतवणुका मिळून तुमच्याजवळ एक कोटी पुंजी आहे. तुमचा निवृत्तीनंतरचा मासिक खर्च अंदाजे ३५,००० रुपये असेल तर, ब प्रकारातील गुंतवणुकांचा विचार करता रु. १५ लाख ज्येष्ठ नागरिक गुंतवणूक योजनेत गुंतवा. त्यावर दर तीन महिन्यांनी व्याज ८.५ टक्के (वार्षकि) दराने मिळेल. (साधारणत: दरमहा रु. १०,६००) केंद्र सरकारच्या ‘वरिष्ठ वयवंदन योजना’ पेन्शन पॉलिसीमध्ये रु. १५ लाख गुंतवा. ८ टक्के दराने दरमहा रु. १०,००० खात्यात जमा होतील. ही योजना केंद्र सरकारची असून आयुर्वमिा महामंडळातर्फे राबवली जाते. एजंटना कमिशन फक्त ०.१ टक्के एकदाच मिळत असल्याने कोणीही आपणहून या योजनेबद्दल बोलत नाही. याची जाहिरात एलआयसी करीत नाही की केंद्र सरकार. दहा लाख रुपये सरकारी बँकेत ठेव स्वरूपात ठेवा. यावर साधारणत: ७ टक्के दराने तीन महिन्यांत रु. १७,५०० (साधारणत: दरमहा ५,८०० रुपये) व्याज मिळेल. या ठेवीसमोर गरज नसताना ओव्हरड्राफ्टची सोय करून घ्या. म्हणजे अडीअडचणीच्या वेळेस ही रक्कम काही काळासाठी वापरता येईल. बचत खात्यात रक्कम कमीत कमी ठेवता येईल. (म्हणजे दोन महिन्यांच्या खर्चाइतकी) आपल्या एकूण कॉर्पसच्या ४० टक्के रक्कम मुद्दल जोखीममुक्त स्वरूपात गुंतवल्यावर आता ‘अ’ आणि ‘क’ प्रकाराकडे वळू या.

आपल्याकडे चांगल्या कंपन्यांचे शेअर्स पूर्वी खरेदी केलेले असतील तर त्यावर लाभांश चांगला मिळतो. पूर्वी घेऊन ठेवलेल्या इक्विटी म्युच्युअल फंड योजनांचा लाभांश ३०-३५ टक्क्य़ांपर्यंत सहज मिळतो. याद्वारे तुमच्या गरजेइतकी रक्कम दरमहा मिळत असेल तर काही म्युच्युअल फंडांसाठी ग्रोथ पर्याय निवडा. आपल्या जिव्हाळ्याच्या तळेगाव, पुणे, नाशिक येथील जास्तीच्या घराचे कुलूप काढून तो भाडय़ाने द्या. सध्या शेअर बाजार खूप वर आहे. स्थावर मालमत्तांमध्ये पुढील काही काळ परतावा मिळणे कठीण आहे म्हणून आज नव्याने यात गुंतवणूक करू नका. जास्तीत जास्त गुंतवणूक ‘क’ प्रकारात म्हणजे तरल गुंतवणूक करा. ग्रोथ पर्याय निवडा. लिक्विड म्युच्युअल फंडातील गुंतवणूक २४ तासांत काढता येते. बाजार खाली आल्यावर सिस्टेमॅटिक ट्रान्स्फर प्लानद्वारा ‘अ’ बास्केटमध्ये फिरवा.

बाजारातील तेजीमंदीचा आढावा घ्या. त्यानुसार तेजीमध्ये ‘अ’ गटातील गुंतवणूक ‘क’ गटात फिरवा आणि मंदीमध्ये ‘क’ गटातून टप्प्याटप्प्याने ‘अ’ गटात फिरवा. हे आपल्याला जमेल का? समजेल का? म्हणून चांगल्या सल्लागाराची निवड करा. त्याला योग्य मानधन द्या. सर्व म्युचुअल फंड घराण्याचे अ‍ॅसेट अ‍ॅलोकेटर फंड असतात, ते निवडा. ते वेळ, काळ पाहून ही अदलाबदल करत राहतील.

शक्यतो म्युच्युअल फंडांच्या सर्व गुंतवणुका ग्रोथ पर्यायासह घ्या व गरजेनुसार त्या फंडातून रक्कम काढून घ्या. समजा, तुम्हाला वर्षांतून एकदा चांगल्या संस्थेमार्फत सहलीला जायचे आहे. त्या वेळेस आवश्यक रक्कम लिक्विड फंडातून काढून घ्या. दरमहा जास्त उत्पन्न हातात घेऊन त्यावर २० टक्के आयकर देऊन दर वर्षी बँकेत एक वर्षांचे आवर्ती जमा खाते काढून ट्रिपला जाण्यात नुकसान आहे. इतर गरजांसाठी किंवा मोठय़ा खरेदीसाठी, त्या-त्या वेळेस लिक्विड फंडातून रक्कम काढून घ्या. ‘अ’ गटात होणारा नफा गरजेनुसार लिक्विड फंडात किंवा स्थिर उत्पन्न योजनांत हस्तांतरित करा.

अशा पद्धतीने तुमचे उत्पन्न आयुष्यभर वाढत राहील. वाढणाऱ्या आयुर्मानाची चिंता राहणार नाही व तुमच्यापश्चात तुमची संपत्ती पुढील पिढय़ांकडे हस्तांतरित होईल. लक्षात ठेवा, आपल्या देशात पीपीएफ सोडल्यास शंभर टक्के सुरक्षित असे काहीही नाही. जोखीम समजून घ्या. त्याची भीती राहणार नाही.

बाजार जोखीम मग कशाला घ्या?

मागील लेखावर (अर्थवृत्तान्त, १ एप्रिल २०१९) ‘भक्त’ मंडळींच्या खूप प्रतिक्रिया आल्या. मुख्यत: शेवटच्या मुद्दय़ावर त्यांच्या टीकेचा रोख आहे – ‘‘सत्तारूढ पक्षास संपूर्ण बहुमत मिळणारच मग शेअर बाजार खाली जाईलच कसा..?’’

निश्चलीकरणाचा सर्वात जास्त फायदा म्युच्युअल फंडांना झाला, पर्यायाने शेअर बाजाराला झाला. त्यामुळे म्युच्युअल फंड आणि शेअर दलाल हे आज भक्त आहेत. शेअर बाजाराच्या मंडळींनी आधीच काही गोष्टी गृहीत धरून बाजार वर नेला आहे. हीच मंडळी होणारी गोष्ट घडून गेली (‘जे थवानू हतू, ए थयी गयो, अवे बजारमां काई मजा नथी’) अर्थात आता बाजारात राम नाही म्हणून बाजार आपटवतील.

वॉरेन बफे हे ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’बद्दल सांगतात की, शेअर योग्य किमतीला असेल तरच घेण्यात फायदा आहे. महागात खरेदी करण्यात अर्थ नाही. पी/ई रेशो आज महाग आहे. शेवटी आकडे खरे बोलतात!

बाजारात तेजी आल्यावर सेबीने डेरीव्हेटिजवर मार्जनि वाढवण्यास सुरुवात केली आहे. गुंतवणूकदारांचा स्वभाव विचारात घेता, शेअरची किंमत ठरवताना (खरेदीसाठी ऑर्डर टाकताना) ‘कारण (कॉज) आणि परिणामांचा (इफेक्ट्स)’ विचार केला जातो. बाजारात पसा किती आणि काय दराने मिळणार, हा विचार केला जातो. मार्जनि वाढल्यावर जास्त पसे गुंतवावे लागतात. जास्त व्याज तुटते, मग खरेदी कमी/कमी होत जाते. बाजार डेंजर झोनमध्ये अजून पुढे-पुढे जात राहिल्यास, प्रत्येक टप्प्यावर सेबी मार्जनि वाढवत जाते.

आज बाजार, दरमहा जमा होणाऱ्या आठ हजार कोटींच्या एसआयपीमुळे आणि भविष्य निर्वाहनिधीच्या इंडेक्स फंडांमधील गुंतवणुकांमुळे वर आहे. भविष्य निर्वाहनिधीचा पसा हा दीर्घ मुदतीचा असतो; पण नवगुंतवणूकदार एसआयपी परतावा नाही म्हणून बंद करू शकतात. चीनमध्ये दोन वर्षांपूर्वी बाजार कोसळल्यावर सर्व कामगारांना विशेष कर्जे देऊन बाजार सावरण्यासाठी जबरदस्तीने शेअर्स खरेदी करायला लावले. हे भारतात शक्य नाही. समजा, सर्व गणिते चुकली आणि बाजार वर गेला.. तर किती पुढे जाईल? ४०,०००, ४५,०००, ५०,०००. जर ४०,५०० पर्यंत गेल्यास परतावा आठ टक्के येतो, जो जोखीममुक्त व्याजदर आहे. मग बाजाराची जोखीम घ्या कशाला?

sebiregisteredadvisor@gmail.com

(लेखक सेबीद्वारे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार व सीएफपी पात्रताधारक आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2019 12:05 am

Web Title: three buckets
Next Stories
1 अँटी-ट्रस्ट अ‍ॅक्ट
2 शब्दावाचून कळले शब्दांच्या पलीकडले!
3 उज्ज्वल भविष्यासाठी दीर्घकालीन सोबती!
Just Now!
X