आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटी फंड
फंडाची मालमत्ता आणि फंड देत असलेला परतावा यांच्यातील प्रमाण बरेचदा व्यस्त असल्याचे दिसून येते. फंडाचा परतावा समाधानकारक असल्यामुळे गुंतवणूकदार त्या फंडाला पसंती देतात. फंडाची मालमत्ता वाढते परंतु परतावा घसरल्यामुळे गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग होतो. ही गोष्ट अपवाद ठरावी असा फंड म्हणजे आदित्य बिर्ला सनलाइफ फ्रंटलाइन इक्विटी फंड होय. या फंडाच्या मालमत्ता वाढूनही परतावा कमी न झाल्यामुळे गुंतवणूकदारांचा या फंडावर विश्वास दिवसेंदिवस वाढत असल्याचे या फंडाच्या मालमत्तेवरून लक्षात येईल. ऑक्टोबरअखेर या फंडाची मालमत्ता १९,७९९ कोटी रुपये होती. नोव्हेंबर महिन्याची आकडेवारी जेव्हा जाहीर होईल तेव्हा आदित्य बिर्ला सनलाइफ फ्रंटलाइन इक्विटी फंडातील गुंतवणूकदार फंड मालमत्तेने २० हजार कोटींचा टप्पा पार केलेला पाहतील तेव्हा या फंडात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिल्याबद्दल आपल्या म्युच्युअल फंड विक्रेत्यांना नक्कीच धन्यवाद देतील. एचडीएफसी इक्विटी फंड हा २० हजार कोटींची मालमत्ता पार करणारा पहिला तर आदित्य बिर्ला सनलाइफ फ्रंटलाइन इक्विटी हा दुसरा फंड असेल. वीस हजार कोटींहून अधिक मालमत्ता असलेल्या फंडापैकी ‘एसबीआय निफ्टी ५० ईटीएफ’ हा सर्वाधिक मालमत्ता असलेला फंड असला तरी त्यातील बहुतांश मालमत्ता कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी संघटनेची (ईपीएफओ) आहे.
आदित्य बिर्ला सनलाइफ फ्रंटलाइन इक्विटी फंडाची ३० ऑगस्ट २००२ रोजी पहिली एनएव्ही जाहीर झाली. या फंडाला २० हजार कोटीचा टप्पा पार करण्यास १५ वर्षे आणि तीन महिन्यांचा कालावधी लागला. पहिल्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार एक लाखाच्या गुंतवणुकीचे २४ नोव्हेंबर २०१७ रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार २१.७३ लाख रुपये झाले असून परताव्याचा वार्षिक दर २२.३८ टक्के आहे. या फंडात पाच हजारची दरमहा नियोजनबद्ध गुंतवणूक केलेल्या ९.१५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे ४६.६० लाख रुपये झाले आहेत. नियोजनबद्ध गुंतवणुकीचा परताव्याचा वार्षिक दर १९.२२ टक्के आहे. फंडाची रेग्युलर ग्रोथ एनएव्ही डिसेंबर २०१२ मध्ये पहिल्यांदा १०० रुपये झाली. मे २०१७ मध्ये फंडाच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीने २०० रुपयांचा टप्पा गाठला. आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटी फंड हा परताव्याच्या दरात सातत्य राखणारा फंड आहे. मागील दहा वर्षांतील ४० तिमाहींमध्ये फंडाने संदर्भ निर्देशांकापेक्षा सरस कामगिरी केली आहे. तीन आणि पाच वर्षांच्या चलत सरासरी संदर्भ निर्देशांकाच्या चलत सरासरीपेक्षा तीन ते सात टक्के अधिक आहे. मागील पाच वर्षे (२०११ ते २०१६) हा फंड लार्ज कॅप फंडाच्या क्रमवारीत ‘टॉप क्वारटाइल’मध्ये आहे. या फंडाचे मॉर्निगस्टार रेटिंग ‘फाइव्ह स्टार’ असे आहे.
आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटी हा फंड मुळात अलायन्स म्युच्युअल फंडाचा होता. अलायन्स म्युच्युअल फंडाचे आदित्य बिर्ला म्युच्युअल फंडाने अधिग्रहण केल्यानंतर हा फंड आदित्य बिर्ला म्युच्युअल फंडाचा एक भाग बनला. हा फंड आदित्य बिर्ला म्युच्युअल फंडाकडे आल्यापासून महेश पाटील हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. ते आदित्य बिर्ला सनलाइफ या फंड घराण्याचे सहमुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत. या फंडाच्या गुंतवणुकीत ८१.१६ टक्के लार्ज कॅप, १५.२७ टक्के मिड कॅप, ०.१२ टक्के स्मॉल कॅप प्रकारच्या गुंतवणुका आहेत. मागील वर्ष – एका वर्षांत फंडाच्या गुंतवणुकीत ७५ ते ८० समभागांचा समावेश राहिला आहे. फंडाच्या गुंतवणुकीत बँका, गैरबँकिंग वित्तीय कंपन्या, ग्राहकोपयोगी वस्तू, वाहन उत्पादक आणि वाहन उत्पादनासाठीची पूरक उत्पादने, तेल आणि वायू उद्योगांना प्राधान्य दिले आहे. फंडाने गुंतवणुकीत बचावात्मक समजल्या जाणाऱ्या माहिती तंत्रज्ञान (७.७ टक्के), आरोग्य निगा (५.७ टक्के), उपभोग्य वस्तू (११.३ टक्के) उद्योग क्षेत्रातील कंपन्यांतून गुंतवणूक केली आहे. फंडाच्या गुंतवणुकीत एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, इन्फोसिस आणि मारुती हे सर्वाधिक गुंतवणूक असलेले समभाग आहेत. फंडाची गुंतवणूक समभागकेंद्रित नसून वैविध्य राखणारी आहे. ऑक्टोबरच्या फंड फॅक्टशीटप्रमाणे पहिल्या पाच गुंतवणुका एकूण गुंतवणुकीच्या २३.५६ टक्के, पहिल्या दहा गुंतवणुका ३५.२६ टक्के आहेत. फंडाने ऑक्टोबर महिन्यांत भारती इन्फ्राटेल विकून भारती एअरटेलचा गुंतवणुकीत नव्याने समावेश केला आहे.
या फंडाने गुंतवणूकदारांच्या पदरात भरभरून परताव्याचे माप टाकले आहे. या फंडाची पहिल्या दिवसापासूनची वाटचाल अनुभवली आहे. ज्या वेळी भरत शहा बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी असताना बिर्ला फंड घराण्याची ओळख ही बिर्ला सन लाइफ अॅडव्हान्टेज (त्या वेळी बिर्ला अॅडव्हान्टेज) अशी होती. आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटी फंडाने बिर्ला म्युच्युअल फंडाची आधीची ओळख पुसून टाकली. आज बिर्ला म्युच्युअल फंडाची ओळख आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटीने होते. ही ओळख मिळवून देण्यात महेश पाटील यांचे भरीव योगदान आहे. फंडासोबत महेश पाटील यांचा निधी व्यवस्थापक ते सह मुख्य गुंतवणूक अधिकारी हा प्रवास जवळून पाहता आला. गुंतवणुकीत झालेले बदल, २००२ ते २००७ या काळात निधी व्यवस्थापकांची शैली आणि २००८ मधील बाजाराच्या पडझडीपश्चात फंडाच्या गुंतवणूक धोरणात झालेले बदल, भरत शहा यांच्या काळातील आक्रमकतेकडून महेश पाटील यांच्या काळात फंडाने संतुलित धोरण राबविले. एक यशस्वी पोर्टफोलिओ मॅनेजर कसा परिपक्व होत जातो याचे उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहावे लागेल. सोदाहरण सांगायचे तर योग्य वेळी राष्ट्रीयीकृत बँका वगळण्याचे कौशल्य महेश पाटील यांनी दाखविले. आजही आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटी फंडाच्या गुंतवणुकीत राष्ट्रीयीकृत बँका नाहीत. या बँकांना वगळताना उत्तम वृद्धीदर असलेल्या येस बँक, बजाज फायनान्स, एचडीएफसीसारख्या तर कमी अनुत्पादित कर्ज असलेली फेडरल बँकेसारख्या कर्ज वितरण करणाऱ्या कंपन्यातून गुंतवणूक केली. २०१३ ते २०१४ दरम्यान टप्प्याटप्प्याने बचावात्मक उद्योगांतील गुंतवणूक कमी करताना आर्थिक आवर्तनाशी निगडित असलेल्या बँका आणि वाहन उद्योगातील कंपन्यांतून गुंतवणूक वाढविली. याच दरम्यान जिनसांचे भाव आणि विशेषत: कच्च्या तेलाचे भाव कोसळत असताना केर्न इंडियासारखा समभाग वगळला तर तेल घसरणीचा लाभार्थी असलेल्या तेल वितरण क्षेत्रातील हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइलचा समावेश गुंतवणुकीत करण्यात आला. हे ‘सेक्टोरल रोटेशन’ इतर फंडापेक्षा लवकर केल्याचा फायदा फंडाला २०१४ च्या निवडणूकपश्चात आलेल्या तेजीने मिळवून दिला. धातू क्षेत्रातील समभागांनी तळ गाठला तेव्हा योग्य वेळी हिंदाल्को आणि हिदुस्थान झिन्कसारख्या धातू उद्योगातील कंपन्यांचा समावेश केला. मागील पाच वर्षांपासून गुंतवणुकीत असलेले बायर क्रॉपसायन्स, मदरसन्स सुमी सिस्टम्ससारख्या समभागांनी चार ते आठ पट वाढ नोंदविली आहे.
फंड व्यवस्थापकाचे खरे कौशल्य तेजीत नव्हे तर मंदीत अनुभवता येते. घसरत्या बाजारात गुंतलेल्या मुदलात कमीत कमी घट व्हावी म्हणून निधी व्यवस्थापक आखत असलेल्या धोरणांत निधी व्यवस्थापकाचे कौशल्य जोखता येते. २००८ आणि २०१३ या दोन्ही वर्षांत फंडाच्या मालमत्तेत झालेली घट निर्देशांकापेक्षा कमी होती. २००४ ते २००७ आणि २०१४ ते २०१७ या कालावधीत फंडाने निर्देशांकापेक्षा अधिक वृद्धीदराची नोंद केली. वाढत्या एनएव्ही बरोबरच दिवसेंदिवस हा फंड अधिक प्रगल्भ होत असल्याचे अनुमान फंडाच्या स्टँडर्ड डेव्हिएशन आणि शार्प रेशो होत असलेल्या बदलांतून काढता येते. अन्य फंडाच्या तुलनेत फंडाचा निधी व्यवस्थापन खर्च कमी आहे. मुलांचे शिक्षण, सेवा निवृत्ती नियोजन यांसारख्या दीर्घ कालावधीसाठी कराव्या लागणाऱ्या नियोजनबद्ध गुंतवणुकीसाठी या परिपक्व गुंतवणूक साधनाचा समावेश गुंतवणूकदारांनी आपल्या म्युच्युअल फंडाच्या यादीत करावयास हवा.
वसंत माधव कुलकर्णी
shreeyachebaba@gmail.com