नोटाबंदीच्या अनपेक्षित घोषणेनंतर पारंपरिक बचतीचे गाठीशी असणे, मित्रपरिवार आणि हातउसने घेऊन वैद्यकीय मदत उभी करणे असे सर्वसामान्यांचे आपत्कालीन प्रसंगीचे उपायही कुचकामी व दगा देणारे ठरल्याचे अनुभवास आले. खरे तर अशा अकल्पित स्थितीत आलेले आजारपण हाती रोकड नसलेल्या अनेकांसाठी महासंकटच! परंतु ‘रोखीशिवाय बिले भरता येणे’ म्हणजे कॅशलेस सेवा आज भारतात सर्वच आरोग्यविमा कंपन्या ग्राहकांस पुरवत आहेत, त्याची महती यानिमित्ताने तरी सर्वसामान्यांना पटावी..

निश्चलनीकरणाच्या निर्णयातून निर्माण झालेल्या गोंधळ-गैरसोयीतून आर्थिक जीवनातील ‘जोखीम’ आणि ‘अनिश्चितते’लाही अधोरेखित केले आहे. मानवी जीवनातील सतत होणाऱ्या स्थित्यंतरांनुसार नियोजन करताना अनपेक्षित संकटांना गृहीत धरूनच गणिते मांडावी लागतात. गुंतवणूकदाराला व्यावहारिक लवचीकता आत्मसात करावी लागते. सामान्यजन विमा हप्त्याद्वारे होणारा ‘खर्च’ वाचवू पाहतात आणि आरोग्यविम्याकडे पाठ करतात किंवा तो पुरत्या प्रमाणात घेत नाहीत. विम्याचा हप्ता सतत वाढताना बघून काहींना हा ‘बोजा’ अमान्य, असह्य़ भासतो. वरिष्ठ नागरिकांना आरोग्यविम्याचे संरक्षण वरदान न वाटता ‘एक आर्थिक सापळा’ वाटतो. काही अंशी ही वस्तुस्थिती अमान्य करता येत नाही. परंतु विमा संरक्षण ही जोखीम नियोजनांतील वादातीत पर्यायी व्यवस्था आहे. कारण जन्म, व्याधी, मृत्यू, अपघात, अर्थसंकट यांचे अचूक भविष्य वर्तविता येत नाही. वस्तुनिष्ठ व्यावहारिक तजवीज करावयाची असेल तर खर्चाचे महागाईच्या निर्देशांकांनुसार अंदाजपत्रक बनवणे ही ‘एकमेव’ मुभा ग्राहकाच्या हाती आहे. थोडक्यात कोणत्याही आíथक संकटावर स्वार होण्याकरिता आíथक उद्दिष्टांनुसार निर्णय घेणे, सातत्य ठेवणे आणि ‘बदल’ स्वीकारण्याची लवचीकता बाळगणे गरजेचे आहे. सध्याच्या चलनतुटवडय़ाच्या स्थितीत रुग्णांची होणारी गरसोय, नातेवाईकांची धावपळ याविषयी बातम्या ऐकू येत आहेत. आपत्कालीन तजवीज म्हणून आजही पारंपरिक पद्धतीने हाताशी पसा ठेवण्याची रीत आपल्याकडे मोठय़ा प्रमाणात आहे. जोखमीचे व्यवस्थापन करताना आपण मृत्यू, अपघात व आजारपण अशा अकल्पित आíथक संकटांचे वेध घेऊन नियोजन करीत असलो तरी बाजारातील अनिश्चितता मात्र लक्षात घेत नाही.

Expect the best, plan for the worst and prepare to be surprised  या उक्तीनुसार सकारात्मक आणि तर्कशुद्ध उपाययोजनेद्वारे कुटुंबाची आíथक विवंचनांमुळे होणारी ओढाताण आटोक्यात ठेवता येऊ शकते. आरोग्यविम्याचे कवच घेताना नेहमी ग्राहक विमा हप्ता, सुरक्षा कवचाची रक्कम, आजारांची यादी, मर्यादित दाव्यांची यादी किंवा विमा कंपनीची दावे निवारणाची (क्लेम सेटलमेंट) प्रकाशित टक्केवारी हे निकष लक्षात घेतो. त्यामुळे कर वजावट, जोखमीचे व्यवस्थापन अशी अल्पकालीन लक्ष्ये साध्य होतात. परंतु सर्वसमावेशक नियोजन होतेच असे नाही! नोटाबंदीच्या अनपेक्षित घोषणेनंतर पारंपरिक बचतीचे गाठीशी असणे, मित्रपरिवार आणि हातउसने घेऊन वैद्यकीय मदत उभी करणे असे सर्वसामान्यांचे जोखीम व्यवस्थापन हे धोकादायक व दगा देणारे असल्याचे अनुभवास आले. ‘रोखीशिवाय बिले भरता येणे’ म्हणजे कॅशलेस – रोकडरहित सेवा आज भारतात सर्वच आरोग्यविमा कंपन्या ग्राहकांस पुरवत आहेत. अत्यंत बिकट वैद्यकीय आणीबाणी कोणत्याही शहरात, कोणत्याही देशात, अवेळी उदभवू शकते! रुग्णाला अपरिचित गावातही वैद्यकीय गरज उद्भवू शकते. त्यामुळे नेकवर्क हॉस्पिटल्समधील रोकडरहित सेवा मोलाची ठरते. कॅशलेस मेडिकल सेवेची उपाययोजना नियोजित दावे आणि आपत्कालीन दावे या दोन्ही वैद्यकीय खर्चाना संरक्षण देते. नेटवर्क हॉस्पिटलच्या यादीत संपूर्ण देशातील वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या हॉस्पिटलांचा समावेश असतो. त्यामुळे अपघाती वैद्यकीय आणीबाणीतही या विम्याची मदत होते. रेल्वे अपघात, रस्त्यांवरील अपघात, हृदयरोगामुळे अचानक उद्भवणारी आणीबाणी, आगीमुळे होणारे अपघात अशा अत्यंत नाजूक क्षणात रुग्णाचे ‘रोकडरहित विमाछत्र’ बराच मानसिक-आíथक ताण नाहीसा करते.

नियोजित वैद्यकीय सेवेसाठीसुद्धा रोकडरहित सेवा उपलब्ध आहेत. रुग्णाला काही उपचार लगेचच करावयाचे असल्यास जसे मोतििबदू शस्त्रक्रिया, आस्थिविषयक शस्त्रक्रिया यांचा खर्च लक्षात घेऊन हॉस्पिटलला आणि विमा कंपनीला पूर्वसूचना देता घेते. त्यामुळे अचानक बचतीतून खर्च न होता व्यवहार करणे शक्य होते. स्थिर उत्पन्न नसणाऱ्या कुटुंबप्रमुखास, वरिष्ठ नागरिकांस तसेच अनेक  आíथक जबाबदाऱ्यांना तोंड देणाऱ्या मध्यमवर्गास रोकडरहित मेडिक्लेम अपेक्षित संरक्षण देते. संपत्ती निर्माण करताना सुखवस्तू आणि उत्तम मिळकत असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ‘संपत्ती संरक्षण’ करण्याकरिता आरोग्यविम्यातील रोकडरहित सेवा उपयोगी पडते. बाजारातील अनिश्चिततेमुळे गुंतवणुकांतील परतावे अपेक्षित स्तरांवर पोहोचत नसताना मोठी वैद्यकीय आणीबाणी उद्भवली तर गुंतवलेली संपत्ती ‘तोटा’ सहन करून खर्च करावी लागते. म्हणजेच सर्वसामान्य चाकरमान्यांपासून यशस्वी व्यापारीवर्गासही रोकडरहित मेडीक्लेम सेवा वित्तीय संरक्षण देते.

सध्या सर्वच आरोग्यविमा कंपन्या ‘हेल्थ कार्ड’ ग्राहकास देतात. टोल फ्री क्रमांकाद्वारे विमा कंपनीला चोवीस तास संपर्क करणे शक्य आहे. हॉस्पिटलमधील बिले भरण्याच्या कक्षेत विमा दाव्यासाठी संपर्क कक्ष असतो. त्यामुळे आणीबाणीत गरसोय होत नाही.

बदल हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तो स्वीकारणे हेच शहाणपणाचे ठरते. संकटासोबतच एक संधी निर्माण होते. संकटावर स्वार झाल्याने ती संधी अनपेक्षित वरदानही ठरू शकते. त्यामुळे बदलल्या काळानुसार संधींचा वापर करून गुंतवणूकदार भविष्यातील जोखमींचे संकट लीलया पेलू शकतो.

कॅशलेस मेडिक्लेम थोडक्यात महत्त्वाचे..

१.     ग्राहकाने आरोग्यविमा कंपनीने दिलेले हेल्थ कार्ड नेहमी जवळ बाळगावे.

२.     कुटुंबातील प्रत्येकास टोल फ्री क्रमांकांची कल्पना द्यावी.

३.     आपत्कालीन दाव्यांसाठी करावी लागणारी पूर्वतयारी कुटुंबातील प्रत्येकास लक्षात आणून द्यावी.

४.     ‘प्री-अ‍ॅथोरायझेशन फॉर्म’ भरताना लागणारी माहिती आधीच नोंदवून ठेवावी.

५.     रोकडरहित सेवेत अंतर्भूत नसलेले खर्च कोणते यांची आगाऊ कल्पना असावी.

भक्ती अनिल रसाळ- bhakteerasal@gmail.com

लेखिका ‘सीएफपी’ पात्रताधारक आहेत.