भारतात लॅमिनेटेड टय़ूबच्या उत्पादनास सर्वप्रथम सुरुवात करणारी एस्सेल प्रोपॅक, गेल्या तीस वर्षांत खऱ्या अर्थाने ग्लोबल कंपनी झाली आहे. बारा देशांत २५ अत्याधुनिक कारखान्यांतून विविध प्रकारचे पॅकेजिंग करणाऱ्या या कंपनीत २६०० कर्मचारी कार्यरत आहेत. वर्षभरात सुमारे ६०० कोटी टय़ूबचे उत्पादन करणाऱ्या एस्सेलचा जगभरातील टय़ूबच्या बाजारपेठेत ३३ टक्के हिस्सा आहे. गेल्या तीस वर्षांत कंपनीने कामगिरीत सातत्य राखून आधुनिक तंत्रज्ञान आणि गुणवत्तेच्या जोरावर आपल्या उत्पादनांची श्रेणी सतत वाढती ठेवली आहे. लॅमिनेटेड टय़ूब, सिमलेस प्लास्टिक टय़ूब, लॅमिनेशन्स, कॅप्स आणि डिस्पेन्सिंग सिस्टीम, इ. उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या एस्सेलने आता इटेन, इग्नाइट आणि ग्रीन मेपल लीफ अशी नवी इको फ्रेंडली उत्पादने बाजारात आणली आहेत. लॅमिनेटेड टय़ूबचे उत्पादन करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी असा लौकिक असलेल्या एस्सेलची बाजारपेठ वाढतीच राहणार आहे. याचं मुख्य कारण म्हणजे भारतातही ग्राहकोपयोगी वस्तूंची (एफएमसीजी) वाढत असलेली बाजारपेठ हे आहे. सप्टेंबर २०१६ अखेर संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने २०१.८३ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १६.९४ कोटींचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत हा निकाल तितकासा चांगला नसला तरीही जगभरातील आणि भारतातील वाढती बाजारपेठ पाहता आगामी काळात कंपनीच्या आर्थिक कामगिरीत भरीव वाढ होईल अशी अपेक्षा आहे. एफएमसीजी वस्तूंसाठी शहरी-निमशहरी भागातून वाढती मागणी यामुळे पॅकेजिंग व्यवसायाची आशिया खंडातील बाजारपेठ २०२० पर्यंत वेगात वाढेल अशी अपेक्षा आहे. उत्तम गुणवत्ता तसेच अनुभवी व्यवस्थापन यामुळे एस्सेल प्रोपॅक मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य वाटतो.

05

अजय वाळिंबे stocksandwealth@gmail.com

सूचना: लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) प्रस्तुत सदरात सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती एक टक्क्य़ांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कु ठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. या सदरातून वर्षभरात सुचविलेल्या कंपन्यांचा आढावा दर तिमाहीस प्रसिद्ध करण्यात येतो.