या सदरात आर्थिक नियोजन म्हणजे काय व आर्थिक नियोजन कसे करावे हे टप्याटप्याने जानेवारी २०१६ पासून आपण पहिले. आर्थिक नियोजनातील ध्येयांचे महत्व, प्रत्येकाची जोखीम घेण्याची क्षमता व जोखीम घेण्याच्या क्षमतेप्रमाणे मालमत्तेची निवड, गुंतवणूक, विमा व्यवस्थापन, आपत्कालीन खर्चाचे नियोजन, गुंतवणुकीचे विविध पर्याय व त्याचबरोबर करनियोजन, निवृत्ती नियोजन  व शेवटी  मागील लेखात स्थावर जंगम मालमत्तेचे नियोजन कसे करता येईल येथपर्यंत आपण पहिले.

हे सर्व केल्यानंतर आर्थिक नियोजनात आखलेल्या आराखडयानुसार सर्व व्यवस्थित झाले आहे किंवा नाही, हे वेळोवेळी पडताळून पाहणे जरुरीचे असते. तसेच काळानुसार होणारे बदल जसे की, कालांतराने ध्येयांमध्ये बदल होतात, गुंतवणुकीतील अनुभवामुळे जोखीम घेण्याच्या क्षमतेत बदल होतो, तसेच मिळकतीत बदल झाल्यामुळे राहणीमानाचा दर्जा बदलतो, या सर्व गोष्टी वेळोवेळी पडताळून पाहण्यासाठी व त्याप्रमाणे नियोजन आराखडय़ात त्या समाविष्ट करून घेण्यासाठी आर्थिक नियोजनाचे पुनरावलोकन करणे अत्यंत महत्त्वाचे असते. तसेच आर्थिक नियोजनाचा नुसता आराखडा बनवणे पुरेसे नाही तर त्याची अंमलबजावणीही योग्य प्रकारे व्हायला हवी.

व्यक्तिगणिक किंवा कुटुंबागणिक प्रत्येक आर्थिक नियोजनाचा आराखडा निरनिराळा असतो. प्रत्येकाची ध्येय वेगळी, जोखीम क्षमता वेगळी, मिळकत व खर्च वेगळे, त्या त्या प्रमाणे आर्थिक नियोजकाला प्रत्येक नियोजनाचा आराखडा हा वेगवेगळा तयार करावा लागतो. प्रत्येकाच्या नियोजन आराखडय़ाप्रमाणे त्या त्या गोष्टीची अंमलबाजावणी करावी लागते.

सुरुवातीला आर्थिक नियोजकाला तुम्ही सर्व माहिती दिल्यानंतर जेव्हा प्रत्यक्षात आर्थिक नियोजनाचा आराखडा तयार करून तो तुमच्या समोर सादर करतो त्याचवेळी त्या आर्थिक नियोजनाचे पुनरावलोकन करण्याबद्दल काही विशिष्ट कालावधी निश्चित केला जातो. त्यावेळी आर्थिक नियोजकाने दिलेल्या सल्ल्यानुसार सर्व गोष्टी पार पाडल्या गेल्या आहेत किंवा नाही, काय बाकी आहे किंवा झालेल्या गोष्टींचे अवलोकन तसेच एखादे ध्येय पूर्ण झाले असल्यास गुंतवणुकीत करावे लागणारे बदल यासारख्या गोष्टीचा नियोजनाच्या पुनरावलोकनात आढावा घेतला जातो. आर्थिक नियोजनाचे पुनरावलोकन हे सहा महिन्यांनी किंवा किमान वर्षांतून एकदा तरी करणे गरजेचे असते व ते तसे केले गेले पाहिजे.

विशेषत: जोखीम घेण्याच्या क्षमतेप्रमाणे केलेली मालमत्तेची विभागणी व त्याचे गुंतवणुकीतून होणारे चढ उतार याचे अवलोकन वेळो वेळी केले गेले पाहिजे व त्याचा योग्य तो समतोल सतत राखला गेला पाहिजे. जसे कि सुरुवातीच्या काही वर्षांत केली गेलेली इक्विटीमधील गुंतवणूक ही बाजारभावातील चढत्या क्रमामुळे काही वर्षांतच नफा झाल्यास, अशा गुंतवणुकीचा पुन्हा जोखीम क्षमतेप्रमाणे समतोल साधला गेला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाच्या अनुषंगाने त्या त्या जीवनाच्या पायरीप्रमाणे नियोजनामध्ये बदल करावा लागतो. या सर्व गोष्टींचा समावेश आर्थिक नियोजनाच्या पुनरावलोकनात केला जातो.

त्यामुळे नुसते एका वर्षी आर्थिक नियोजनाचा आराखडा करून थांबू नये तर सातत्याने त्याचे अवलोकनही करावे.

या सदरात मागे दिल्याप्रमाणे आपण योग्य प्रकारे अर्थिक नियोजन केल्यास आपली वेगवेगळी स्वप्न पूर्ण करू शकतो. त्यामुळे  Making good decisions is a crucial skill at every level – Peter Drucker अर्थात प्रत्येक स्तरावर योग्य निर्णय घेणे हे एक महत्वाचे कौशल्य आहे – पीटर ड्रकर. यासाठी योग्य त्या अर्थ नियोजकाचा सल्ला आपले अर्थ नियोजन करण्यासाठी घेऊन, त्याला योग्य तो मोबदला घ्यावा.

अर्थनियोजनावरील हे सदर इथेच थांबवीत आहोत. वर्षभरात तुम्हा वाचकांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला, भरपूर प्रोत्साहनही मिळाले त्याबद्दल आभार. तुमचे प्रश्न, शंका-कु शंकांना उत्तरे देताना मलाही आणखीन नवीन गोष्टी जाणून घेता आल्या.

किरण हाके kiranhake@fingenie.co.in

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लेखक आर्थिक नियोजनातील ‘सीएफपी’ पात्रताधारक व सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.