फ्रँकलिन इंडिया ब्लूचीप फंड

शिशिर्तुच्या पुनरागमे,

एकेक पान गळावया

का लागता मज येतेसे

न कळे उगाच रडावया.

पानांत जी निजली इथे

इवली सुकोमल पाखरेअ,

जातील सांग अता कुठे?

निष्पर्ण झाडित कापरे!

शिशिरागमनामुळे वृक्षांची पानगळ होते. ८ नोव्हेंबर रोजी निश्चलनीकरणाची घोषणा झाल्यापासून प्रमुख बाजार निर्देशांकांची अवस्थासुद्धा शिशिर ऋतूत पानगळ अनुभवणाऱ्या वृक्षांप्रमाणे झाली आहे. १ जानेवारी २०१६ रोजी सेन्सेक्स २६,१०१, निफ्टी ७,९३८ अंशांवर खुला झाला होता. बाजाराची वाटचाल खालच्या दिशेने होत मागील कॅलेंडर वर्षांत २९ फेब्रुवारी या दिवशी अर्थसंकल्प सादर होत असताना सेन्सेक्स २२,४९४, निफ्टी ६,८२५ या पातळ्यांवर बाजाराने तळ गाठला, तर ८ सप्टेंबर २०१६ या दिवशी सेन्सेक्स २९,०७७ आणि निफ्टी ८,९६० या शिखरावर होता. वर्षभराचा विचार केल्यास बाजार १ जानेवारी २०१६ रोजी ज्या पातळीवर होता तिथून बाजाराचा प्रवास वर-खाली होत वर्षअखेरीला तो त्याच पातळीच्या आसपास स्थिरावला. इतिहासात बाजाराचे मूल्यांकन या पातळीवर असताना केलेल्या गुंतवणुकीवर एका वर्षांत वार्षिक १२ टक्के, तीन वर्षांत १५ टक्के व पाच वर्षांत १८ टक्के परतावा मिळाल्याचे दाखले देता येतील; परंतु विद्यमान परिस्थितीचा विचार करता एका वर्षांत १० टक्के, तीन वर्षांत १२ टक्के व पाच वर्षांत १४ टक्के परताव्याची अपेक्षा ठेवता येईल.

मागील दोन वर्षे मिड कॅप समभागांच्या मूल्यांकनात वाढ झाल्यामुळे विद्यमान मूल्यांकन गुंतवणूकयोग्य पातळीपेक्षा अधिक आहे. विद्यमान सेन्सेक्सच्या किमतीचे उत्सर्जनाशी गुणोत्तर (पी/ई) १९.६ पट आहे. लार्ज कॅप समभागांचे विद्यमान मूल्यांकन लक्षात घेता ग्राहकोपयोगी वस्तू, औषधनिर्माणसारख्या उद्योगातील कंपन्यांचा अपवाद वगळता बहुतांश लार्ज कॅप गुंतवणूक पातळीवर आहेत. साहजिक लार्ज कॅपकेंद्रित म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास वरील परतावा मिळण्याची शक्यता असल्याने या सदराचा वर्षांरंभ लार्ज कॅप फंडाने करावासा वाटतो. फ्रँकलिन इंडिया ब्लूचीप फंड या लार्ज कॅप फंडाने मागील २३ वर्षांत ३६ पट संपत्ती निर्माण केलेली असल्याने या फंडाची आजच्या शिफारसीसाठी निवड केली. १ डिसेंबर १९९३ रोजी पहिली एनएव्ही जाहीर झालेल्या या फंडात या दिवशी १ लाखाच्या गुंतवणुकीचे मूल्य ८४,९७,७१२ असून परताव्याचा वार्षिक दर २२.२९ टक्के आहे. लार्ज कॅप फंड गटात २३ वर्षांत संपत्तिनिर्मिती करणाऱ्या फंडात दुसरा क्रमांक लागतो.

डिसेंबर १९९३ पासून दरमहा १,००० ‘सिप’च्या माध्यमातून २,६४,०००च्या गुंतवणुकीचे ३१ डिसेंबर २०१६च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार बाजारमूल्य २४,२५,५१२.०२ इतके असून परताव्याचा वार्षिक दर १७.५६ टक्के इतका आहे.

फ्रँकलिन टेम्पलटन या फंड घराण्याचे मुख्य गुंतवणूक अधिकारी (समभाग) असलेले आनंद राधाकृष्णन हे २००७ पासून या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. आनंद राधाकृष्णन यांची ख्याती गुंतवणूकदार समुदायात अव्वल मूल्यांकन असणारे व दर्जेदार समभाग वेचण्यात पटाईत अशी आहे. फंडाच्या पहिल्या पाच गुंतवणुकांपैकी तीन गुंतवणुका बँकांच्या समभागात असून भारती एअरटेल व इन्फोसिस हे अन्य समभाग आहेत. बँका, संगणक प्रणाली, वाहन उद्योग औषधनिर्माण व ग्राहकोपयोगी टिकाऊ  वस्तू ही गुंतवणूक असलेली आघाडीची पाच उद्योग क्षेत्रे आहेत. फंडाच्या गुंतवणुकीच्या परिघात १०० समभागांचा समावेश असून एका वेळी यापैकी ४०-४५ समभागांचा समावेश फंडाच्या गुंतवणुकीत असतो. भांडवलीवृद्धीची शक्यता, व्यवसायास अनुकूल वातावरण मागील वृद्धीच्या तुलनेत भविष्यात व्यवसायवाढीची शक्यता व गुंतवणूक करतेवेळी समभागाचे मूल्यांकन या निकषांवर ही निवड केली जाते. हा विचार करतेवेळी व्यवस्थापनाचा दर्जा, भांडवली परतावा समभागावरील परतावा व्यवसायाची शाश्वत वृद्धी यांचा प्रामुख्याने विचार केला जातो. समभागांची निवड करताना समभागांच्या रोकड सुलभतेला प्राधान्य दिले जाते, जेणेकरून समभागांची खरेदी-विक्री करणे सोयीचे होते.

निश्चलनीकरणानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे लार्ज कॅप समभागांच्या उत्सर्जनात (ईपीएस) घट होण्याची शक्यता आहे. उत्सर्जनात घट झाल्यामुळे समभागांच्या किमतीत घसरण झाली तरी दोन तिमाहीनंतर सर्वप्रथम लार्ज कॅप समभागांच्या किमती वर जातील. निश्चलनीकरणानंतर मागणी घटल्याने किमती कमी होतील व महागाईचा दर नियंत्रणात राहील असा आशावाद व्यक्त होत आहे. मंदावलेल्या अर्थव्यवस्थेस उभारी देण्यासाठी काही अल्पकालीन तर दीर्घकालीन धोरणांची घोषणा आगामी अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे. निश्चलनीकरणानंतर सरकारचे कर संकलन १४ टक्कय़ांनी अधिक झाल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले. सरकारला मिळालेल्या या अतिरिक्त महसुलाचा वापर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी खर्च होण्याची शक्यता असल्याने लार्ज कॅप कंपन्या या सरकारी धोरणांच्या लाभार्थी असतील; परंतु सध्या ५६ डॉलर प्रति पिंप या पातळीवर रेंगाळणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमतीचा प्रवास साठ डॉलरच्या जवळ पोहोचला तर अर्थव्यवस्थेबाबतचे सर्व अंदाज फोल ठरण्याचीच शक्यता अधिक आहे.

एखाद्या म्युच्युअल फंडांचे विश्लेषण करताना फंड व्यवस्थापकाने गुंतवणुकीवर परतावा मिळविताना किती जोखीम घेतली हे पाहणे आवश्यक असते. मागील १० वर्षांतील वार्षिक प्रमाणित विचलन १६ ते २३ टक्के दरम्यान आहे. ३, ५, १० व १५ वर्षांचे प्रमाणित विचलन अनुक्रमे ४.९ टक्के, १९.६३ टक्के, १६.३७ टक्के व २३.५१ टक्के आहे.

सोबतच्या आलेखात १ जानेवारी २००० पासून दरमहा ५,००० गुंतवणुकीची रक्कम व ३० डिसेंबर २०१६च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार बाजारमूल्य दर्शविले आहे. १ जानेवारी २००० रोजी सुरू केलेल्या सिपमार्फत १०.२० लाखांच्या गुंतवणुकीचे बाजारमूल्य ५८.२१ लाख आहे. मागील २३ वर्षांत फंडाने गुंतवणुकीत सातत्य राखले असून फंड गुंतवणूकदारांसाठी संपत्तिनिर्मिती करण्यात यशस्वी ठरला आहे. मुलांच्या शिक्षण, सेवानिवृत्तीनंतरच्या उदरनिर्वाहासाठी करावयाच्या तरतुदी यांसारख्या दीर्घकालीन वित्तीय ध्येयांसाठी हा फंड योग्य गुंतवणूक साधन आहे.

arth06

वसंत माधव कुलकर्णी Shreeyachebaba @gmail.com

(अस्वीकृती: या स्तंभात वापरलेली माहिती व आकडेवारी ही उपलब्ध माहिती स्रोतांपासून घेतली आहे. या लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)