गुंतवणूकदारांच्या सबलीकरणाचा जागर पुन्हा येत्या शुक्रवारपासून
अर्थव्यवस्थेने फेर धरून उभारीकडे कूच केली असताना, प्रत्येक गुंतवणूकदारांचे सबलीकरण घडलेच पाहिजे. दमदार अर्थवृद्धीचा लाभ हा वाढीव परताव्याच्या रूपात प्रत्येक गुंतवणूकदारांच्या वाटय़ाला यायलाच हवा.. तर मग हा गुंतवणुकीचा मार्ग कोणता, गुंतवणुकीतून जास्त आणि तरीही सुरक्षित परताव्याच्या उत्तरासाठी ‘लोकसत्ता अर्थसल्ला’चा गुंतवणूक जागर येत्या शुक्रवार, २३ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होत आहे. ‘कोटक म्युच्युअल फंड’ प्रस्तुत हा कार्यक्रम यशवंत नाटय़मंदिर, मनमाला टँक रोड, माटुंगा (प.) येथे सायंकाळी ६ वाजता योजण्यात आला आहे.
वयाच्या चाळीशीतही स्व-मालकीचे घर, गाडी घेण्याचे स्वप्न साकारता येऊ शकते. अर्थात सुयोग्य आर्थिक नियोजन केले जायला हवे. म्हणूनच या कार्यक्रमात ‘आर्थिक नियोजनातून स्वप्नपूर्ती’ या विषयावर सनदी लेखाकार तृप्ती राणे या मार्गदर्शन करतील. विशेषत: एक स्त्री नियोजनकार या नात्याने त्या स्त्रियांच्या हाती कुटुंबाच्या वित्तीय गुंतवणुकीची किल्ली सोपविल्यास कोणती किमया घडू शकते याचे सोदाहरण दाखले उपस्थितांपुढे मांडतील.
आजची गुंतवणूक ही भविष्यासाठी तजवीज असते. उत्पन्न व खर्चाचा मेळ घालून दरमहा किती बचत यासाठी करावी आणि हा पैसा गुंतवायचा तर तो नेमका कुठे, असा सर्वसामान्यांना पुढे स्वाभाविक प्रश्न असतो. आजच्या घडीला किमान जोखीम पैलू असलेला आणि अल्पतम गुंतवणुकीतून दीर्घ मुदतीत चांगली संपत्ती निर्माण करणारा गुंतवणुकीचा पर्याय म्हणून म्युच्युअल फंडांकडे पाहिले जाते. म्हणूनच ‘म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे फायदे’ या विषयावर या कार्यक्रमांत ‘अर्थ वृत्तान्त’चे स्तंभलेखक आणि गुंतवणूकविषयकसल्लागार वसंत माधव कुलकर्णी यांचे उपस्थितांना मार्गदर्शन होईल.
‘थेंबे थेंबे तळे साचे’ या प्रचलित म्हणीप्रमाणे योग्य गुंतवणुकीचे दीर्घावधीसाठी सातत्य राखल्यास इच्छित संपत्तीनिर्मिती कुणालाही शक्य आहे. ‘लोकसत्ता’ने यासाठीच आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूकदारांच्या सजगतेसाठी निरंतर प्रयत्न सुरू ठेवले आहेत. ‘लोकसत्ता-अर्थसल्ला’च्या उपक्रमांतून सोप्या भाषेत, सुबोध उदाहरणांसह, तज्ज्ञांकडून दिले जाणारे मार्गदर्शन उपस्थितांना निश्चितच उपयुक्त ठरेल. शिवाय आपले नेमके प्रश्न तज्ज्ञांना विचारण्याची संधीही असेल.
सभागृहाच्या आसनक्षमतेनुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य तत्त्वावर प्रवेश दिला जाईल आणि तो पूर्णपणे विनामूल्य असेल, याची इच्छुकांनी नोंद घ्यावी.
केव्हा, कुठे ?
शुक्रवार, २३ सप्टेंबर २०१६, सायं. ६.०० वा.
स्थळ : यशवंत नाटय़मंदिर, मनमाला टँक रोड, माटुंगा (प.), मुंबई</p>
: तज्ज्ञ मार्गदर्शक :
* तृप्ती राणे
(अर्थनियोजनातून स्वप्नपूर्ती)
* वसंत माधव कुलकर्णी
(म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे फायर्दे)
अस्वीकृती: Mutual fund investments are subject to market risk. Please read the offer documents carefully before investing.
प्रवेश खुला व विनामूल्य