माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या म्हटल्या की, विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्रसारखी मोठी नावे डोळ्यासमोर येतात. मात्र या क्षेत्रातही अनेक प्रकारच्या सेवा देणाऱ्या (व्हर्टिकल्स) विविध कंपन्या आहेत. तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढतच असल्याने आगामी काळात नवीन आणि अद्ययावत तंत्रज्ञान असलेल्या कंपन्या शोधणे म्हणून आवश्यक ठरते. अशीच तंत्रज्ञानात प्रगत असलेली इन्शुरन्स टेक्नॉलॉजीमधील आघाडीची कंपनी म्हणून मॅजेस्कोचे नाव घेता येईल. गेली २० वर्षे कंपनी जवळपास सर्व प्रकारचे म्हणजे जीवन विमा तसेच सर्वसाधारण विमा कंपन्यांच्या विविध योजनांसाठी सॉफ्टवेअर तयार करते. जागतिक स्तरावर मान्यता असलेली मॅजेस्को बहुतांशी मोठय़ा बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी आपले सॉफ्टवेअर देते. उत्तर अमेरिका, युरोप, आखाती देश तसेच दक्षिण पूर्व आशिया इ. देशांत मॅजेस्कोने आपले स्थान पक्के केले आहे. सन लाइफ, हेरिटेज, टोकिओ मरिन, एएमए तसेच यूएस अश्युअर अशी काही मोठय़ा ग्राहकांची नावे कंपनीच्या पटलावर आहेत. गेल्या आर्थिक वर्षांतील कंपनीची कामगिरी तितकीशी चांगली नाही. अमेरिका तसेच इंग्लंडमधील खराब कामगिरीचा कंपनीच्या आर्थिक निकषांवर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येते. शेवटच्या तिमाहीत कंपनीच्या उलाढालीत ७.१ टक्के घट झाली असून नक्त नफ्यावरही परिणाम झालेला दिसतो. मात्र गेल्या तिमाहीत कंपनीचे १५ मोठे ग्राहक आता सेवा (सपोर्ट) यादीत दाखल झाले आहेत. कंपनी आगामी काळात आपल्या व्यवसाय विस्तारीकरणासाठी काही कंपन्या ताब्यात घेण्याची शक्यता असून येत्या दोन वर्षांत कंपनीच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा अपेक्षित आहे.

सध्या खराब निकालांमुळे मॅजेस्कोचा शेअर ३२० रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. मध्यमकालीन गुंतवणुकीसाठी हा शेअर ५० टक्के परतावा देऊ  शकेल. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला थोडीशी मरगळ आली असली तरीही मॅजेस्कोसारखे काही कंपन्यांचे शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटतात.

arth1-chart1

सूचना : प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.