देशातील अग्रगण्य बँक या नात्याने स्टेट बँकेने मोठय़ा प्रमाणात आपल्या व्यवसायात डिजिटलायझेशन करणे आवश्यक आहे. परंतु त्याचबरोबर आपल्या ग्राहकांना डिजिटली साक्षर करणेही तितकेच गरजेचे आहे. बँकेच्या शाखा- सेवासुविधांचे तंत्रज्ञानाधारित आधुनिकीकरण सुरू असताना, बँकेच्या नावाने बोटे मोडत शाखेबाहेर पडणारा सामान्य खातेदार समाधानाने बाहेर पडेल हे पाहिले जावे..

राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळ प्रश्न विचारू लागला. ‘‘राजा, सर्वसाधारणपणे स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी असलेल्या व्यक्तीला मुदतवाढ देण्याचा प्रघात नाही. सरकारने त्याला अपवाद करताना विद्यमान अध्यक्षांना एक वर्षांची मुदतवाढ दिली. ही मुदतवाढ देणे किती योग्य किंवा कसे या प्रश्नाचे उत्तर तू सांगितले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील,’’ वेताळाने राजाला सांगितले.

‘‘या वर्षी सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा, रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आणि स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांची मुदत संपणार होती. यापैकी सिन्हा आणि भट्टाचार्य यांना सरकारने प्रत्येकी एका वर्षांसाठी मुदतवाढ दिली आहे. स्टेट बँकेच्या विद्यमान अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा इतिहास रचला तसेच मुदतवाढ मिळण्याचा प्रघात नसताना अपवाद म्हणून मुदतवाढ मिळवून दुसरी ऐतिहासिक कामगिरी केली. सामान्यत: स्टेट बँकेच्या अध्यक्षांची नेमणूक तीन वर्षांसाठी केली जाते. बाईंची नेमणूक ७ ऑक्टोबर २०१३ रोजी तीन वर्षांसाठी केली गेली होती. त्यांचा अध्यक्षपदाचा पहिला कालावधी ६ ऑक्टोबपर्यंत होता. सरकारने त्यांना एक वर्षांसाठी किंवा पुढील आदेश निघेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. नियमाला अपवाद असतात व अपवादाने नियम सिद्ध होतो हे खरे असले तरी अपवादाची कारणे जाणून घेणे आवश्यक असते. स्टेट बँकेत पाच सहयोगी बँकांचे व भारतीय महिला बँकेचे विलीनीकरणाचे काम शेवटच्या टप्प्यात असल्याने धोरण सातत्य राहण्यासाठी विद्यामान अध्यक्षांना मुदतवाढ दिल्याचे सरकारचे म्हणणे आहे,’’ राजा उत्तरादाखल म्हणाला.

सध्या स्टेट बँकेच्या भारतात १६,५०० शाखा व विदेशात ३६ देशांमध्ये १९१ शाखा आहेत. विलीनीकरणानंतर  ५० कोटी ग्राहक असलेली व एकंदर २२,५०० शाखा ५८,००० स्वयंचलित रोकड यंत्रे असलेली ही बँक होईल. मालमत्तेच्या क्रमवारीत स्टेट बँकेचा जगात ४५ वा क्रमांक असेल. भारतातील एका बँकेला जगातील पहिल्या पन्नास बँकांत स्थान मिळण्याची ऐतिहासिक कामगिरी बाईंच्या कारकीर्दीतच होणार आहे. म्हणून नियमाला अपवाद करून त्यांना मुदतवाढ मिळाली. अरुंधती भट्टाचार्य यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आपल्या मुदतवाढ मिळालेल्या कालावधीत अनुत्पादित कर्जाना आवर घालणे ही दुसरी महत्त्वाची गोष्ट असेल असे सांगितले. जणू पुढील एका वर्षांचा रोडमॅप बाईंनी सांगितला. भट्टाचार्य यांनी बँकिंग क्षेत्राच्या डिजिटलायझेशनमुळे बँकेच्या ५० कोटी ग्राहकांना स्टेट बँकेच्या सेवांचा आनंद घेता येईल असे सांगितले.

डिजिटलायझेशनमुळे बँकिंगचे स्वरूप बदलले आहे. नव्याने बँकेत खाते उघडणारे ९० टक्के ग्राहक पारंपरिक ब्रांच बँकिंग न करता इंटरनेट बँकिंग करतात. नव्याने बँकिंग उद्योगात आलेल्या आयडीएफसी बँकेचे ही एकही स्वयंचलित रोकड यंत्र न लावण्याचे धोरण डिजिटल बँकिंगचे महत्त्व अधोरेखित करते. त्यामुळे देशातील अग्रगण्य बँक या नात्याने स्टेट बँकेने मोठय़ा प्रमाणात आपल्या व्यवसायात डिजिटलायझेशन करणे आवश्यक आहे. परंतु त्याचबरोबर आपल्या ग्राहकांना डिजिटली साक्षर करणेही तितकेच गरजेचे आहे. पूर्वी आजोबा आपल्या पेन्शन खात्याचे पास बुक स्वत: भरून आणत असत. बँकेच्या शाखेत स्वयंचलित प्रिंटर बसविल्यामुळे आजोबांना खात्यात रक्कम जमा झाली का हे जाणून घेण्यासाठी नातवाची मदत घ्यावी लागते. खेरीज बँकेत गेल्यावर बारकोड वाचून छपाई करणारा प्रिंटर सुरू असेलच याची खात्री देता येत नाही. डिजिटलायझेशनच्या बरोबरीने आपला ग्राहक डिजिटली साक्षर करण्याकडे बाईंनी लक्ष देणे जरुरीचे आहे. गरज असेल तेव्हा आपले पासबुक भरून घेता येईल. तो दिवस बँकेच्या ग्राहकांच्या दृष्टीने सुदिन असेल. आज बँकेचे अनेक वैयक्तिक ग्राहक केवळ नाइलाज म्हणून स्टेट बँकेच्या सेवांचा लाभ घेत आहेत. दुर्दैवाने प्रिंटर नादुरुस्त असणे, कर्मचारी रजेवर असणे किंवा अन्य कारणांनी बँकेत पुन्हा पुन्हा खेपा घालायला लागणे हे स्टेट बँकेच्या ग्राहकाचे दुर्दैव आहे. बँकेने सामान्य बचत खातेधारक बँकेच्या शाखेच्या बाहेर पडतांना बँकेच्या नावाने बोटे मोडत बाहेर पडतो आहे तो समाधानाने बाहेर पडेल हे पाहिले तरी ही मुदतवाढ बँकेच्या सत्कारणी लागली म्हणायचे,’’ राजा म्हणाला. अशा तऱ्हेने राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला.

पुंगीवाला –  gajrachipungi @gmail.com