आजकालच्या धकाधकीच्या जीवनात कधीही कुठलाही कठीण प्रसंग ओढवू शकतो व अशा परिस्थितीत आपल्या पश्चात आपली मालमत्ता आपल्या जिवलगांना मिळण्यासाठी त्यांना फार त्रास पडू नये असे जर आपल्याला वाटत असेल तर इच्छापत्र करून ठेवणे अतिशय जरुरी आहे..

आर्थिक नियोजनात एखाद्या व्यक्तीच्या मालमत्तेचे वाटप त्याच्या इच्छेप्रमाणे त्याच्या पश्चात त्याच्या वारसदारांपर्यंत कायदेशीर व बिनदिक्कत पोहोचण्यासाठी त्याचे इच्छापत्र किंवा मृत्युपत्र बनविण्यात येते. हे इस्टेट प्लानिंग अर्थात स्थावर-जंगम मालमत्ता नियोजनात मोडते. आर्थिक नियोजनात कर नियोजन, निवृत्ती नियोजन इत्यादी करणे जसे जरुरी आहे तसेच स्थावर-जंगम मालमत्तेचे नियोजनही तितकेच महत्त्वाचे आहे. परंतु स्थावर-जंगम मालमत्तेचे नियोजन करण्याचा गांभीर्याने विचार केला जात नाही.

या अविचाराची साधारणपणे काही कारणे दिली जातात किंवा जे गैरसमज आहेत ते म्हणजे :

१) इच्छापत्र किंवा मृत्युपत्र तेच लोक बनवतात ज्याच्याजवळ गडगंज संपत्ती असते.

२) तरुण किंवा मध्यमवयीन लोकांचा असा समज असतो की, अजून आमच्यासाठी मृत्युपत्र बनविण्यासाठी पुष्कळ वेळ आहे.

३) इच्छापत्र बनविण्याची आम्हाला गरज नाही, आम्ही सर्व ठिकाणी नॉमिनेशन करून ठेवले आहे

भारतातील वारसाहक्काचे कायदे हे विविध जाती व धर्मानुसार वेगवेगळे आहेत. अशा परिस्थितीत जर आपले इच्छापत्र किंवा मृत्युपत्र बनविले गेले नसेल तर आपल्या पश्चात आपल्या संपत्तीचे वाटप असे होऊ  शकते की जे तुम्हाला तुमच्या हयातीत मान्य झाले नसते. काही काही ठिकाणी उदाहरणार्थ व विशेषकरून स्थावर मालमत्तेमध्ये जरी नॉमिनेशन करून ठेवले असेल आणि मृत्युपत्र बनवले नसेल तरी वारसा हक्क कायद्याप्रमाणे नॉमिनीशिवाय इतर वारसदार आपला हक्क सांगू शकतात. मग कायद्याने निकाल लागेपर्यंत ती मालमत्ता कोणीही वापरू शकत नाही.

तरुण व मध्यमवयीन लोकांनी हा विचार करायला हवा की, आजकालच्या धकाधकीच्या जीवनात कधीही कुठलाही कठीण प्रसंग ओढवू शकतो व अशा परिस्थितीत आपल्या पश्चात आपली मालमत्ता आपल्या जिवलगांना मिळण्यासाठी त्यांना फार त्रास पडू नये असे जर आपल्याला वाटत असेल तर इच्छापत्र करून ठेवणे अतिशय जरुरी असते. उदारणार्थ एका अविवाहित व्यक्तीने त्याच्या विविध ठिकाणी असलेल्या गुंतवणुकीत जसे की- विमा, म्युच्युअल फंड, बँक एफडी यातील नॉमिनेशन आपल्या आईच्या नावावर करून ठेवले आहे. १०-१२ वर्षांनंतर या व्यक्तीला अचानक मृत्यू ओढवला व त्या वेळी त्यांची आई हयात नाही. दरम्यान, लग्न होऊन त्यांना दोन मुले आहेत. त्यांनी मृत्युपत्र बनविले नाही. आता अशा परिस्थितीत त्यांच्या पत्नीला त्यांच्याच हक्काचे पैसे मिळविण्यासाठी किती त्रास होऊ  शकतो याचा विचार करा.

आर्थिक नियोजनात गुंतवणूक करताना अगदी सुरुवातीपासूनच या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. त्यामुळे काही गोष्टींची आधीच काळजी घेतल्यामुळे जेव्हा सर्वात शेवटी आपण इच्छापत्र बनवतो त्यात फार काही अडचणी येत नाही व ते उचित प्रकारे बनवता येते.

स्थावर-जंगम मालमत्तेचे नियोजन हे मुख्यत: दोन प्रकारे करण्यात येते :

१) इच्छापत्र किंवा मृत्युपत्र :

इच्छापत्र किंवा मृत्युपत्र बनवणे ही स्थावर-जंगम मालमत्तेचे नियोजन करण्याची पारंपरिक पद्धत आहे. वर सांगितल्याप्रमाणे इच्छापत्र म्हणजे आपल्या पश्चात आपल्या मालमत्तेची विभागणी आपल्या इच्छेप्रमाणे कुणाला कशी करण्यात यावी याचे कायदेशीर पत्र. इच्छापत्र हे एका सध्या कागदावर आपण चांगल्या मन:स्थितीत असताना बनविण्यात यावे. त्यावर दोन साक्षीदारांच्या सह्य़ा असणेही जरुरीचे असते. साक्षीदार इच्छापत्रातील वारसदारांपैकी नसावेत. माणसाच्या जीवनात येणाऱ्या बदलानुसार जसे की मुलांचा जन्म, नवीन स्थावर मालमत्तेची खरेदी अशा कारणांमुळे ज्यांचे इच्छापत्र बनविले आहे त्यांना त्यांच्या हयातीत ते कधीही बदलून नवीन बनवता येते. इच्छापत्र कायदेशीर रजिस्टर करून ठेवणे केव्हाही चांगले, परंतु तशी अट नाही.

२) विश्वस्त संस्था (ट्रस्ट) :

एखाद्या कुटुंबातील मालमत्तेची विभागणी करण्यासाठी एक संस्था नेमण्यात येते. जेथे ही मालमत्ता त्या संस्थेसाठी नेमलेल्या विश्वस्ताकडे सुपूर्द करण्यात येते. जेणेकरून त्या मालमत्तेचा उपभोग त्या संस्थेच्या लाभधारकांना त्यांच्या हक्काच्या प्रमाणात त्यांना घेता येईल. जेव्हा मालमत्ता थेट लाभधारकांना सुपूर्द करता येऊ  शकत नाही अशा वेळी त्यांच्यासाठी विश्वस्त संस्था नेमण्यात येते. जसे की अजाण (Minor) बालकाच्या नावे करण्यात येणारी मालमत्ता तो मोठा किंवा सुजाण (Major) होईपर्यंत त्याच्यासाठी नेमण्यात आलेल्या विश्वस्ताकडे सुपूर्द करण्यात येते. विश्वस्त संस्था ही ज्याने निर्माण केली त्याच्या हयातीतच त्याचा व्यवहार पाहत नाही, तर त्यांच्या मृत्युपश्चातही संस्था ठरवून दिलेल्या विभागणीनुसार व्यवहार सांभाळते.

स्थावर-जंगम मालमत्तेच्या नियोजनात करण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या बाबी :

१) इच्छापत्र बनविणे

२) विश्वस्त संस्थेतील लाभधारकांची खाती उघडून स्थावर-जंगम मालमत्तेचे कर नियोजन करणे

३) लाभधारकांपैकी अजाण बालकांच्या पालकाची नेमणूक

४) मृत्युपत्राच्या नियमाच्या देखरेखीसाठी व्यवस्थापकाची नेमणूक करणे

५) लाभधारकांची नेमणूक किंवा त्यातील फेरबदल इत्यादी

वर सांगितल्याप्रमाणे फार विचार न करता, आहे त्या स्थावर-जंगम मालमत्तेचे नियोजन लवकरात लवकर करून घेणे. त्यासाठी योग्य वेळेची वाट पाहू नये. सर्वात आधी पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतील नॉमिनेशन आताच्या गरजेनुसार आहे किंवा नाही ते पडताळून पाहा. ते तसे नसल्यास योग्य तो बदल करून घ्या. मृत्युपत्र नेमके व उचित बनण्यासाठी आतापासूनच पुढील कुठलीही गुंतवणूक करताना काळजी घ्या.

स्थावर-जंगम मालमत्तेच्या नियोजनात करण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या बाबी :

१ इच्छापत्र बनविणे

२ विश्वस्त संस्थेतील लाभधारकांची खाती उघडून स्थावर-जंगम मालमत्तेचे कर नियोजन करणे

३ लाभधारकांपैकी अजाण बालकांच्या पालकाची नेमणूक

४ मृत्युपत्राच्या नियमाच्या देखरेखीसाठी व्यवस्थापकाची नेमणूक करणे

५ लाभधारकांची नेमणूक किंवा त्यातील फेरबदल इत्यादी

किरण हाके kiranhake@fingenie.co.in

लेखक हे ‘सीएफपी’ पात्रताधारक अर्थ नियोजनकार आणि ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.