गुंतवणूक करताना सर्वप्रथम आर्थिक ध्येय निश्चित करणे जरूरी असते. ध्येयपूर्ततेची वेळ जेव्हा येते तेव्हा त्यासमयीच्या बाजारभावाप्रमाणे गुंतवणूक काढून घेणे नक्कीच योग्य ठरते. बाजाराचे मूल्यांकन अजून वाढेल, म्हणून थांबणे योग्य होणार नाही.

अलिकडे बरेच जण प्रश्न विचारतात की, बाजाराचा निर्देशांक उच्चांकाला आहे असे असताना शेअर बाजारात केलेली किंवा इक्विटी म्युच्युअल फंडात केलेली गुंतवणूक काढून घेण्याची योग्य वेळ आहे काय? किंवा आता गुंतवणूक करावयाची असल्यास कशा प्रकारे करावी?

मागील लेखांमध्ये नमूद केल्याप्रमाणे गुंतवणूक करताना सर्वप्रथम आपले आर्थिक ध्येय निश्चित करणे जरूरी असते. आता जर असे काही अर्थिक ध्येय हे पूर्तीच्या जवळ आले असेल, जसे की मुलाच्या उच्च शिक्षण. त्यासाठी काही गुंतवणूक तुम्ही पूर्वीच करून ठेवली होती आणि आता मुलाचा परीक्षेचा निकाल लागला आहे. तो उच्च शिक्षणासाठी अर्ज करणार आहे व त्यासाठी तुम्हाला आता पैशाची गरज लागेल. अशा वेळी आताच्या बाजारभावाप्रमाणे गुंतवणूक काढून घेणे नक्कीच योग्य ठरेल. अशा वेळी बाजाराचे मूल्यांकन अजून वाढेल व काही महिन्यानंतर गुंतवणूक काढून घेतल्यास अधिक फायदा होऊ  शकेल, असे असले तरी देखील आपण थांबणे योग्य होणार नाही. कारण आपली ध्येयपूर्ती झालेली आहे व योग्य वेळी आपली गुंतवणूक आपल्या गरजेस उपयोगी पडणार आहे. परंतु ध्येयपूर्तीसाठी अजून काही काळ असल्यास केवळ बाजाराचे मूल्यांकन वाढले आहे व गुंतवणूक चांगला मोबदला देईल म्हणून गुंतवणूक काढून घेऊ  नये. हा निर्णय किती काळ अजून तुमच्या ध्येयपूर्तीसाठी बाकी आहे यावरही अवलंबून आहे. तथापि, नफा नोंदवून काढून घेतलेली गुंतवणूक अल्पशा काळासाठी कशी बाजूला ठेवता येईल जेणेकरून ती गरजेनुसार उपलब्ध होईल ते आपण पाहू.

आर्थिक नियोजनानुसार गुंतवणुकीच्या बाबतचे योग्य निर्णय वार्षिक आढाव्यादरम्यान घेण्यात येतात. गुंतवणुकीचा वार्षिक आढावा घेताना गुंतवणुकीच्या विभागणीचा आढावा घेण्यात येतो. त्यामुळे गुंतवणुकीचे पुन:संतुलन करण्यात येते. त्याचबरोबर हे करताना अर्थिक नियोजनकार या गोष्टीचा आढावा घेतात की कोणते अर्थिक ध्येय हे पूर्ततेच्या जवळ पोहोचले आहे. समजा एखाद्या गुंतवणुकीच्या ध्येय पूर्ततेला ६ ते १२ महिनेच राहिले आहेत. व त्यासाठी केलेली गुंतवणूक ही इक्विटी किंवा इक्विटी म्युच्युअल फंडात असल्यास, आहे त्या बाजारभावाप्रमाणे ती काढून घेऊन सुरक्षित ठेवीमध्ये काही काळासाठी ठेवण्याचा सल्ला देण्यात येतो. येथे मुदत ठेवी (एफडी) आपण सर्व जण जाणतोच. लिक्विड फंड व अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड म्हणजे काय ते आपण येथे पाहू.

लिक्विड फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये ज्यांच्या परिपक्वतेची मुदत काही दिवसांची १ ते ९१ दिवस इतकी असते अशा कोषागार बिले (ट्रेझरी बिल्स), कंपन्याचे जमा प्रमाणपत्रे (सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्स) यांचा समावेश असतो. अल्ट्रा शॉर्ट टर्म फंडाचा १ आठवडा ते ६ महिन्यांच्या परिपक्वतेची मुदत असलेला पोर्टफोलिओच असतो. तुम्ही नफा नोंदवून काढून घेतलेली गुंतवणुकीची रक्कम आपापल्या कालावधीच्या गरजेनुसार तुम्ही अशा फंडामध्ये गुंतवू शकता. शिवाय अशा प्रकाच्या फंडामध्ये कुलूपबंद कालावधी (लॉक-इन पिरियड) नसतो त्यामुळे अशी गुंतवणूक कधीही काढून घेऊ  शकता. अशा फंडामध्ये केलेल्या गुंतवणुकीचा मोबदला हा बँकेच्या बचत खात्यामधून मिळणाऱ्या व्याजापेक्षा नक्कीच जास्त असतो. तसेच ज्या दिवशी आपणास लिक्विड फंडामध्ये केलेल्या गुंतवणुकीतील पैशाची गरज पडेल त्याच्या आदल्या दिवशी आपण काढून घेण्यासाठी विनंती अर्ज (रिडम्प्शन रिक्वेस्ट) दुपारी ३:०० वाजण्याआधी दिल्यास, दुसऱ्या दिवशी आपल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात.

वरील दुसऱ्या प्रश्नाचे उत्तरही यातच दडले आहे. बाजाराचे मूल्यांकन बरेच वाढले असताना आता गुंतवणूक कशाप्रकारे करावी? तर अशा बाजारभावात ठोक रक्कम दीर्घकाळासाठी गुंतवणूक करताना वरील नमूद केलेल्या म्युच्युअल फंडामधील लिक्विड फंड किंवा शॉर्ट टर्म फंडामध्ये गुंतवून हळूहळू सिस्टेमॅटिक ट्रान्सफर द्वारे (एसटीपी) इक्विटी फंडात गुंतवू शकता. कारण सध्याच्या उच्चांक गाठलेल्या बाजारामध्ये आपण हा अंदाज बांधू शकत नाही की मूल्यांकन अजून किती वाढेल किंवा कधी खाली येईल.

We don’t have to be smarter than the rest; we have to be disciplined than the rest. यात सांगितल्याप्रमाणे, चातुर्याने गुंतवणूक करण्यापेक्षा शिस्तबद्धपणे केलेली गुंतवणूक ही फायदा करवून देऊ  शकते. महत्वाचे म्हणजे ही गुंतवणूक करताना त्याला ध्येय जोडले असल्यास अशी गुंतवणूक ही ध्येयपूर्तीच्या वेळेस गरजेला उपयोगी पडू शकते.

  • लेखक आर्थिक नियोजनातील ‘सीएफपी’ पात्रताधारक व सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत. त्यांच्याशी ई-मेल kiran@fingenie.in वर संपर्क साधता येईल